अनाथ ओसाड डोंगर बोडका
कधी बंदी मुजोर गनिमांचा
सोडवूनी मज पाशातून
घडविलेस कधी काळ्या पाषाणातून
आज वृधत्वाच्या नकोश्या खुणा
मनास देती लाखो डागण्या
परी भग्न शरीराने आजही उभा
टेहाळत चहुकडे विस्तीर्ण सुभा
भेटावयास येतात कैकजण
प्रत्येकापरी आगळे कारण
ओढ अनामिक लागते जीवाला,
नजर धुंडाळते परत धन्याला
निःशब्द होवुनि त्यांस सुनावतो
टापा दऱ्यात दुमदूमलेल्या
कुणास जागा दाखवितो
भगवा जोमात फडकवलेल्या
थारोळ्यात दिसतात कुणास
आहुत्या बाजी, तानाजीच्या
अन बखरीत नोंद नसलेल्या
शेकडो झुंजार मर्द मावळ्यांच्या
निश्चिंत होऊनी पहुडतो मी
गतवैभवाच्या सांगत कथा
शल्य नसते मग मज संपण्याचे
रमतो पुसुन साऱ्याच व्यथा
- Yogesh