शिकवण
---------------------------------------
सकाळीच ऑफिसला येण्यासाठी बस पकडली आणि योगायोगाने बसायला जागाही लगेच मिळाली. अवघा दहा पंधरा मिनिटांचाच प्रवास करायचा होता आणि डोक्यात कुठला विचारही चालू नव्हता. अशा वेळी नेहमी करतो त्याच प्रमाणे खिडकीतून बाहेर काय सुरु आहे हे बघायला सुरवात केली. पाउस अगदी खोबरं किसावं तसा पडत होता. म्हणजे थेंब जमिनीवर येण्याआधीच वरच्यावर फुटून हवेतच विखुरला जात होता. त्याच वेळी रस्त्याच्या कडेला एक रिक्षा उभी केलेली दिसली. रिक्षावाला रिक्षाच्या मागे जावून हातातल्या फडक्याने रिक्षा पुसत होता. वास्तविक हे अगदी स्वाभाविक आणि रोज नजरेस पडणारं चित्र असलं तरी जे काही मला दोन क्षणात दिसलं ते नक्कीच धक्कादायक होतं..विचार करायला लावण्याजोगं होतं.
त्या रिक्षावाल्याने एका काखेत कुबडीचा आधार घेतला होता आणि डाव्या पायाच्या पँटचा लोंबणारा भाग गुडघ्याच्या वरपर्यंत दुमडून गाठ मारून ठेवलेला होता. एका पायाने पूर्ण अधू असूनही तो इतक्या गर्दीतून रिक्षा चालवतो हि नक्कीच कौतुकास्पद बाब आहे आणि आलेल्या व्यंगावर मात करून जगण्यासाठी जो संघर्ष चालू आहे त्यातून नक्कीच काहीतरी शिकण्यासारखं आहे असं मला वाटत राहिलं. आज आजूबाजूला निराश झालेले पुष्कळजण आपण पाहतो किंवा बहुतांशी आपणसुद्धा त्या निराशेचा कधी न कधी एक बळी ठरलेलो असतो. शिकूनही नोकरी न मिळाल्याने नैराश्यग्रस्त होऊन घरीच बसून राहणारे आपल्या आजूबाजूला अगदी सहज दिसतात. पण मिळेल त्या परिस्थितीत तोडगा काढून लढत लढत पुढे जाणारे फार कमी दिसतात.
न जाणो कधी अशी वेळ अचानक आल्यावर माणूस नक्कीच खचत असेल. निराश होत असेल....अगदी जीव द्यावा असासुद्धा विचार मनात येत असेल. याचवेळी आधार देणारा हात फार गरजेचा असतो. याच मानसिक आधारावर हळू हळू जिद्द जोम धरू लागते ...वाढते ...फुलते. मला तरी वाटतं अशा कठीण परीक्षेच्या वेळी देव नक्कीच कुठल्या ना कुठल्या रुपात आधार आपल्या पुढे उभा करत असतो..पण बऱ्याच वेळा हा हातच ओळखता येत नाही. डोळ्यांवर ओढलेल्या दुःखाच्या कातड्यामुळे हे हात झिडकारले जातात आणि मग आपणच आपले दुःख अजूनच गहिरे करीत जातो.
शाळेत असताना एक धडा होता त्याची जाणीव मात्र मला प्रकर्षाने झाली. बाळू नावाचा एक विद्यार्थी अशाच कुठल्यातरी प्रसंगात आपले दोन्ही हात गमावतो पण नंतर मात्र निराश न होता पायाच्या बोटांच्या कुंचल्यात ब्रश पकडून चित्र काढायला शिकतो. ओबढधोबढ रेषांना हळू हळू आकार येऊ लागतो आणि जिद्दीच्या जोरावर तो एक चित्रकार बनतो. हि कथा असो किंवा अगदी एक पाय नसूनही निष्णात नृत्य करणारी सुधा चंद्रन असो ... आलेल्या दुःखावरही जिद्दीने मात करून पुढे लढत जाण्याची श्रीभगवत् गीतेतली शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणलेल्या या उदाहरणातून हेच तर आपल्याला शिकण्यासारखे आहे.
जगण्याचा नवनवा अर्थ कळण्यासाठी ती वेळ दरवेळी प्रत्यक्ष यावी लागतेच असे नाही तर ती आजूबाजूला घडणाऱ्या छोट्याछोट्या गोष्टींतूनही समजून घ्यावी लागते हे मात्र अगदी खरे.
~योगेश
mitra todlasssssssss.... so simple but effective --- Vijay
ReplyDelete