चप्पा चप्पा हे गाणं तसं उडत्या चालीत सुरु होतं आणि शेकोटीभोवती नाचणारे तरुण पाहून एक आनंदाची party feeling तयार होते. गाण्याच्या मूळ अर्थाकडे त्यामुळेच बऱ्याचवेळा दुर्लक्ष होतं. आज थोडंसं या गाण्याविषयी.
त्यापूर्वी माचीस सिनेमाची पार्श्वभूमी. माचीस सिनेमा साधारण १९८२ च्या काळात घडतो. अमृतसर मंदिरात operation ब्लू स्टार झालंय. इंदिरा गांधींची हत्या झालीय. शिखांचं हत्याकांड झालंय. सरकारची पंजाब मध्ये दडपशाही सुरु आहे आणि त्यामुळे पंजाबी तरुण सरकारच्या अत्याचाराविरोधात पेटून उठलाय. या सूड भावनेतून आतंकवाद तयार होतोय. हे चार तरुण सुद्धा या सूड भावनेतून एकत्र आलेत.
हे गाणं सुरु होतं ते आगीच्या दृश्याने , धूर धुमसतोय आणि नंतर शेकोटी दिसते. एकदम उत्साही आवाजात गाणं सुरु होतं - "चप्पा चप्पा चरखा चले". आता चरखाच का?
चरखा साधारण क्रांतीचं प्रतीक म्हणून वापरलंय. (स्वातंत्र्य आंदोलन). हि आग/शेकोटी पंजाबी तरुणांच्या मनात पेटलेली आहे आणि ती प्रतीकात्मक आहे.
औनी बौनी यारियाँ तेरी , बौनी बौनी बेरियों तले
- किती दिवसांची मैत्री ते माहित नाही. आज ना उद्या पोलिसांच्या हाती लागून सगळं संपणार किंवा आत्मघाती हल्ल्यात. बोराचं झाड खुरटं असतंय आणि काटेरी. अश्या आयुष्याच्या सावलीत मैत्री फुलतेय.
आता हे तरुण हसत हसत क्रांती साठी तयार झालेत आणि ते इतर तरुणांना आव्हान करत आहेत.
गोरी चटकोरी जो कटोरी से खिलाती थी , जुम्मे के जुम्मे जो सुरमे लगाती थी
कच्ची मूंडेर के तले , चप्पा चप्पा चरखा चले...
अरे झूठी मूठी मोइने , हाय हाय मोइने
झूठी मूठी मोइने रसोई में पुकारा था , लोहे के चिमटे से लिपटे को मारा था
ओये बीबा तेरा चूल्हा जले , चप्पा चप्पा चरखा चले...
या दोन कडव्यांमध्ये पंजाबी तरुणींच्या आठवणी आहेत. "ओये बीबा तेरा चूल्हा जले" या ओळीला चंद्रचूड शेकोटीमधलं एक पेटतं लाकूड उचलतो. ते पुन्हा शेकोटी भोवती गोल फिरतात आणि तो ते लाकूड पुन्हा जागेवर ठेवतो. या ओळींमध्ये आग येते ती चुलीमधली. जी उदरनिर्वाहासाठी आवश्यक आहे.
आता गाण्याचा मूड बदलतो आणि थोडा भावनिक होतो.
चुन्नी लेके सोती थी कमाल लगती थी , बीबा बीबा वे हाय
चुन्नी लेके सोती थी कमाल लगती थी , पानी में जलता चराग लगती थी
बीबा तेरी याद न टले , चप्पा चप्पा चरखा चले
इथे सुद्धा चिराग आहे. पुन्हा आग. पण हि नुकसान करणारी नाही. ती दिव्याची शांत ज्योत आहे. या कडव्याच्या शेवटी चंद्रचूड भावनिक होऊन निघून जातो. आता उरलेले आगीभोवती नाच सुरु ठेवतात.
आणि शेवटच्या ओळी ज्या पूर्ण गाण्यावर कळस ठरतात.
गोरियों के पैरों तले , पीली पीली मेहँदी जले
चप्पा चप्पा चरखा चले...
पंजाबी तरुण हा तरुणपण सोडून क्रांतीसाठी सर्वस्व सोडून आलाय. आता पंजाबी तरुणींच्या ऐन तारुण्यात त्यांच्या नशिबात ओली मेहंदी नाहीये. मेहंदी सुकून पिवळी पडलीय. आणि या वाळलेल्या मेहंदीच्या आगीवरून त्यांना खडतर आयुष्य चालायचंय.
चप्पा चप्पा चरखा चले - प्रत्येक कोपऱ्यावर , गल्ली गल्लीत आग पेटलीय, चरखा फिरतोय.
गुलजार लिखित / दिग्दर्शित , विशाल भारद्वाज च्या संगीताने नटलेली ही एक अप्रतिम कलाकृती. जे काही थोडं गुलजारचं आकलन झालं ते सगळ्यांपर्यंत पोहचावं एवढाच हेतू. मधल्या ओळींचा अर्थ मुद्दाम टाळलाय. कुणाला काही यात सुधारणा करावी वाटली किंवा अर्थ चुकीचा वाटला तर जरूर प्रतिक्रिया कळवा.
~ योगेश भागवत
जाता जाता - या गाण्यात आग प्रतीकात्मक वापरलीय तर “छोड आये हम वो गलियां” मध्ये पाणी
No comments:
Post a Comment