कालातीत
--------- --------- --------- --------- ---------
जसं खाण्यासाठी काहीही विशेष शिकवावं लागलं नाही तसं टि.व्ही पाहण्यासाठीही काही विशेष करावं लागलं नाही. अगदी लहानपणीच कमीत कमी दहा बारा जणांच्या घोळक्यात बसुन टि.व्ही. बघायला सुरुवात झाली. पुढे-मागे घरात ब्लॅक अॅंड व्हाईट दाखल झाला. अगदी कुणालाही आवडता हिरो विचारला की फक्त अमिताभ बच्चनचं नाव घेतलं जायचं. अॅंग्री यंग मॅन व्यतिरीक्तही अजुन वेगळे बोटावर मोजण्याइतके हिरो लोकांच्या मनात होते. अगदी कुणाबरोबरही टेस्ट मॅच असली तरी सुनिल गावसकरच्या शतकाकडे डोळे लावुन बसणाऱ्यांची संख्याही तेवढीच होती. अगदी आम्हाला काहीही कळत नसताना टि.व्ही. समोर जाऊन वडीलांना गावसकरने किती रन केले हे विचारलं जायचं. गावसकर आणि कपिलदेव हे दोनच खेळाडु आम्हाला ओळखता यायचे. त्याचे कारणही तसेच होते. पामोलिव का जवाब नही..बुस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी ...किंवा दिनेश दिनेश दिनेश या सारख्या जाहीरातीतुन फक्त हे दोघेजणच दिसायचे. तीच गोष्ट अभिनेत्रींची. लक्स म्हंटलं की हेमा मालीनी किंवा श्रीदेवी हि ठरलेली होती.
हळु हळु म्हणा किंवा लवकर म्हणा काळ बदलत गेला. ब्लॅक अॅंड व्हाईट चा जाऊन कलरचा काळ आला. लक्स साबण लावता लावता श्रीदेवी पाठोपाठ माधुरी दिक्षीत टब मध्ये उतरली आणी तिच्यासारखीच निघुन गेली. अगदी जुही चावला , मनिषा कोईराला या सगळ्यांना दुर सारत ऐश्वर्या ही आली आणि आता ऐश्वर्या ची आंघोळ उरकायच्या आतच कटरीनाही पाण्यात उतरली. आवडता हिरो म्हणुन अमिताभ म्हणण्याचा जमाना गेला आणि खानांचा जमाना जाऊन आता शाहीद कपुर, ह्रितीक रोशन....आणि अजुनही बरेच काही पर्याय उप्लब्ध झाले. तेंडुलकरला देव मानत आमची पिढी वाढली इतकेच नाही तर त्याच्या बऱ्याचश्या खेळींची आठवण आजही ताजी आहे. मग ती शारजा मधील वादळी झंजावाती खेळी असो की अगदी अलिकडेच काढलेल्या २०० धावा असोत. तेंडुलकर पाठोपाठही नाही म्हणायला बरेच जण आले. अगदी कांबळी , जडेजा , द्रविड , गांगुली , युवराज , सेहवाग. काहीजण तर कधिच पडद्याआड गेले तर काही जण जाण्याच्या तयारीत आहेत. तेंडुलकर मात्र आजही त्याच किंवा त्याच्यापेक्षा जास्त उमेदीनेच रन्स बनवतो आहे..शतक ठोकतो आहे. विचार केला तर कळतं तोही माणुसच आहे..कधितरी त्यालाही बॅट खाली ठेवाविच लागेल.
जर काळ त्याच्या गतीने चालतोच आहे... कालचं आज , आजचं उद्या, उद्याचं परवा जर काहीच राहत नाही तर कधि कधि वाटतं अशी कोणती गोष्ट आहे जी अजुनही टिकुन आहे. कुठली अशी गोष्ट आहे जी आजही तितकीच नवी वाटते. फार काही विचार करावा लागला नाही. माणसाची वृत्ती-प्रवृत्ती तर अजुनही तीच टिकुन आहे. काळ कितीही बदलला तरीही.. अगदी माणुस चंद्रावर पोहोचला तरीही. पण या व्यतिरीक्तही काही गोष्टी आहेत ज्या आजही तितक्याच ताज्या वाटतात.
सुदैवाने आमच्या बालपणी आजी-आजोबांना देण्यासाठी बराच वेळ शिल्लक असायचा. व्हिडिओ गेम , केबल , किंवा ट्युशन्स यांच्या जाळ्यापासुन पिढी दुरच होती. तेव्हा पुस्तकांतुन भेटायच्या फार आधीच सर्व संत मंडळी आजोबांच्या गोष्टींमधुन भेटली होती. अगदी ज्ञानोबा, तुकोबा, मुक्ताई पासुन थेट चांगदेव, विसोबा खेचर यांच्यापर्यंत. मग ते अगदी संत गोरा कुंभाराच्या घरी कच्चे मडके -पक्के मडके तपासण्यापासुन असो किंवा संत एकनाथांच्या घरी पाणी भरणाऱ्या पांडुरंगाच्या कथेतुन असो. थोडेफार अभंग आणि रामदास स्वामींचे मनाचे श्लोकही त्यांनी आमच्याकडुन पाठ करवुन घेतले होते. पुढे पुढे फार सुंदररीत्या बनवलेल्या मराठीच्या पुस्तकातुन पद्य विभागात कायमच संताची अभंगवाणी थोडीफार वाचावयास मिळाली ..थोडीफार समजत गेली.
आज मात्र कधी कधी जर त्या अभंगाच्या ओव्या आठवल्या तर वाढत्या अनुभवातुन अजुनच गहन अर्थ समोर येत जातो. ’नाही निर्मळ ते मन । काय करील साबण’ , ’देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या’ , ’जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले’ या म्हणण्यामागचा अर्थ थोडाफार अजुन उलगडत जातो. आणि मग यांना अभंग असे का म्हणतात हे अजुनच प्रकर्षाने जाणवायला लागतं. जे भंग होत नाही ते अभंग. या न भंगणाऱ्या ओळींंमधुन किती मोठे तत्वज्ञान या मंडळींनी आपल्यासमोर ठेवले आहे आणि ते सुद्धा आपल्या मराठी भाषेत. लोकांनी अतोनात त्रास देऊनही इतक्या सुलभतने संतानी हे तत्वज्ञान आपल्याला आपल्या भाषेत उपलब्ध करुन दिले आहे ही नक्किच आपली पुर्वपुण्याई असली पाहीजे. त्यामुळेच अगदी १२ व्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरीच काय तर हरीपाठ सुद्धा आजही बदलत्या काळात योग्य मार्ग दाखवण्याची शक्ती बाळगतो. म्हणुनच आजही जुन्या पिढीतुन आलेला दिंडीचा वारसा त्याच जोमाने सुरु आहे.
काळ त्याच्या गतीने पुढे जातोच आहे...संदर्भ त्यांच्या गतीने बदलतच आहेत.. पण कालबाह्य न होता आजही या ओव्या..हे अभंग.. काळावर मात करुन कालातीत ठरले आहेत.
~योगेश भागवत.
chhaan lihile aahes!
ReplyDeletekeep it up!
:)
he visit karun bagh
http://amrut-dhaaraa.blogspot.com/
Khup chan! mala athavan aali eka frnd chi jo nehami manto -
ReplyDeleteSamarth Ramdas jar twitter var aste tar me tyana follow kela asta!
actually A-Bhanga aahe baryach goshti! good one.