Thursday, October 21, 2010

अपूर्ण

        जे जे हवे ते ते वेळेवर मिळत गेल्यामुळे कुठल्याही गोष्टीची किंमत त्या त्या वेळी कळलीच नाही. पुष्कळ गोष्टींसाठी घ्यावी लागलेली मेहनत कारणीभूत असेलच पण मेहनत घेऊनही बरेच जण यश-अपयश या द्वंद्वात फसताना पहायला मिळाले. माझ्यापुढचा मार्ग मात्र नेहमीच सुकर राहिला होता. याचे मूळ कारण म्हणजे जास्त इच्छा , जास्त अपेक्षा  कधीच नव्हत्या. जे जे पुढे येईल त्याला सामोरे जात राहणे एवढ्यातूनच प्रवास सुरु होता.

        परंतु सर्व काही सुरळीत चालले , विनासायास चालले कि जे सुरु आहे त्यापेक्षा अधिक काही तरी , किंवा वेगळे काही तरी मिळवण्याची इच्छा होते. आणि मग त्या इच्छांसाठी वेगवेगळे मार्ग शोधता शोधता माणूस त्यात इतका अडकून जातो कि  नको असलेल्या गोष्टीसुद्धा त्याला कराव्या लागतात.
मला देखील एका ठराविक वळणावर असेच वाटू लागले होते. आपण दैनंदिन जीवनातल्या त्याच त्याच गोष्टी का करतो, कशासाठी करतो असे प्रश्न पडू लागले. हा जो सर्व आटापिटा चालू आहे त्याचा नक्की काय उपयोग हेही कळत नव्हते आणि आज सुद्धा पूर्ण कळाले आहे असेहि मी म्हणणार नाही. त्या दिवसांत मी भयंकर अस्वस्थ होतो. जगण्याचे प्रयोजन कळत नव्हते. आपण सुद्धा चाकोरीतील वाट चालतो आहे आणि दुसरे काही तरी करावे असे राहून राहून वाटत होते. दुसरे काही तरी..वेगळे काही तरी. प्रत्यक गोष्टीत नैराश्य पसरत होते, नकारात्मकता  वाढत होती  आणि उत्तर मात्र मिळत नव्हते. असंच एकदा नेहमीप्रमाणे मित्राशी चर्चा झाली. त्याला बोलता बोलता सहज बोलून गेलो कि या सर्वांचे उत्तर अध्यात्माशिवाय मिळणार नाही. तेव्हा त्याने मला एक साधारण कथा सांगितली होती.

        एक गिर्यारोहक नवनवीन शिखरे चढत जातो..एक चढून झाले कि दुसरे त्याहून उंच, तिसरे त्याहून उंच. त्याला एक संन्यासी विचारतो. 'तू इतकी शिखरे का चढतोस ?'
गिर्यारोहक - पहिले सर केले कि दुसरे त्याहून उंच असलेले मला खुणावते. मग वाटत हे हि सर करावे...
संन्यासी - म्हणजे तू असंतुष्ट आहेस.
गिर्यारोहक -  असेनही. तुम्ही तप करता का?
संन्यासी - हो. अनेक प्रकारची अवघड तपे सुद्धा केली आहेत. 
गिर्यारोहक - मग पहिले तप केल्यावर तुम्हाला का वाटले दुसरे एखादे करावे म्हणून?
संन्यासी - आत्मशांतीसाठी ...परमेश्वर प्राप्तीसाठी.
गिर्यारोहक - मी हि तसेच आत्मशांतीसाठी प्रयत्न करतो आहे. . आणि ज्या दिवशी वाटेल आता कुठलेच उंच शिखर राहिले नाही त्या दिवशी ती मला नक्कीच मिळेल. जसे तुम्हाला विविध तापांची शिखरे पार केल्यावर वाटणार आहे अगदी तसेच.

          यात कोण बरोबर कोण चूक हा भाग निराळा. मात्र माझ्या शंकेचे समाधान काही झाले नाही . तेव्हा शेवटी त्याने मला श्रीमद्‍भगवद्‍गीता वाचण्याचा सल्ला दिला. त्याच्या मते गीता म्हणजे संघर्ष करण्याचा उत्कृष्ट सल्ला आणि निदान त्यामुळे तरी नकारात्मकता थोडी फार कमी होईल असे त्याला वाटले. ती चर्चा तशीच हवेत विरून गेली. वेगळे काही तरी शोधणे, वेगळे काही तरी करणे या चक्रात मी अडकतच  गेलो आणि एका टप्प्यावर मात्र प्रकर्षाने जाणवायला लागले...कि आपली कोणी तरी फरफट करीत आहे. मी हे करीन मग त्यामुळे तसे होईल असे वाटत असतानाच अचानक दुसरे काही तरी घडू लागले .

         शांत बसून विचार केल्यावर मग जाणवायला लागलं कि आपल्या हातात तसं काहीच नाही. हळू हळू 'हजारो ख्वाईशे ऐसी , के हर ख्वाईश पे दम निकले' आणि या प्रत्येक इच्छेपाई होणारी फरपट कळू लागली.
इतक्यात २-३ वेगवेगळ्या व्यक्तींची संपर्क आला आणि त्यांच्याकडून गीतेविषयी पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागले. मित्राने दिलेल्या सल्ल्याला एव्हाना ४-५ वर्ष होऊन गेली होती.

                                                                                                         

                                                                                                    ----------अपूर्ण

1 comment:

  1. I exactly know what you are talking about. Khup jasta relate karu shakatey me ithe.

    ani mazya mate he vichar manat yena suddha ek prayojan asta tumala antarmukh karnyacha. ani mag pudhe janyacha.

    Ha blog manje "been there..done that" zalay mala :) update kelas ki sangshil parat.

    ReplyDelete