चकवा
-------------------------
काळीभोर जमीन
हिरवीगार शेते
छोटी छोटी बैठी घरे
सगळंच जाऊन पडले प्लॉट
दूरदुरून आले आणि राहिले तिथे मजूर
इमारती पूर्ण होईतोवर.
उच्चभ्रूंच्या त्या वसाहतीत ...
ते यायच्या आधीच
नांदले मजुरांचे संसार,
मिसळली गेली सिमेंट-मातीत
तीन दगडांच्या चुलीतली राख.
खांबाना बांधलेल्या झोळीत झुलणारी मुले...
आज दुसऱ्या ठिकाणी करत आहेत हेच काम.
आणि तिथे बांधलेल्या झोळीत
आता झोके घेताहेत त्यांची मुले.
आताची उच्चभ्रू वसाहत,
मजुरांचा संसार..
कि त्या आधीचे छोटे गाव
काय जास्त चांगलं होतं?
विचार करूनही नाही सुचत भरभर.
संसाराची गरज तर सर्वांची सारखीच असेल ना?
आणि परिपुर्णता...
ती तरी कधी कुणाची झाली?
बहुधा काही परिपुर्ण नाही..
म्हणूनच तर परिवर्तन...
क्षणा क्षणाला ... मना मनाला
टाळू म्हंटलं ...
तरीही टाळता न येणारं हे परिवर्तन.
आपणही याचाच एक भाग असलो,
तरी ते.. न जाणवू देणारं हे परिवर्तन.
आणि नाही म्हंटलं...
तरीही चकव्यासारखं फिरून फिरून..
पुन्हा तिथेच आणणारं...
हेच परिवर्तन.
~योगेश
No comments:
Post a Comment