Monday, November 22, 2010

खजिना (भाग १) - गावी आगमन

         कुमारला स्वतःच्या गावी आजीकडे इतक्या तातडीने यावे लागेल असे कधीच वाटले नव्हते. त्याला त्याच्या आजीने लहानपणापासूनच घरापासुन दुर हॉस्टेलमध्ये ठेवले होते. तो लहान असतानाच त्याचे वडील वारले आणि त्याची आई त्याला निर्मलाबाईंकडे सोडून निघुन गेली. निर्मलाबाईंनी त्यानंतरच्या आयुष्यात कधी तीचे नाव सुद्धा काढले नाही की कुमारला सुद्धा कधी त्याची गरज भासली नाही. उडाणटप्पु रंगेल आयुष्यात त्याला निर्मलाबाईंचीच आठवण यायला वेळ मिळायचा नाही तिथे कधीच माया न दिलेल्या आईची काय कथा.

         कुमार आज एकटाच निर्मलाबाईंच्या सोबत होता. निशा संध्याकाळपर्यंत येणार असल्यामुळे त्याचा रिकामा वेळ त्याला खायला उठला होता. निर्मलाबाईंचाही अजुन तसा काही विशेष त्रास नव्हता. दुपारचे जेवण वगैरे आटपुन, भांडी विसळुन गडी केव्हाचाच निघुन गेला होता. कुमार गावी यायच्या आधीपर्यंत हा गडीच चोवीस तास बाईंच्या सोबत असायचा. औषधांच्या, जेवणाच्या , फिरायच्या सगळ्या वेळा तो चोख सांभाळून स्वयंपाक पाणी याकडे लक्ष पुरवायचा. पण कुमार आल्यापासुन त्याने गड्याचे काम फक्त स्वयंपाकघर आणि घरातल्या इतर कामापुरतेच मर्यादीत ठेवुन बाईंची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली होती. हा मुलगा अचानक शहरातुन येतो काय? आजीशी इतका प्रेमळ वागतो काय? निर्मलाबाईंसाठी सारेच एक कोडे होते. निर्मलाबाईंनी तसा गेल्या काही दिवसात त्याला काहीच जाणवु न देता विचारण्याचा प्रयत्न केला होता पण कुमारने थातुरमातुर उत्तरे देऊन त्यांना गप्प केलं होतं.

         बापट वकीलांकडुनच त्यांना थोडाफार सुगावा लागला होता. कुमारच्या येण्यामागचं कारणही अचानक उफाळलेली माया नसुन त्याचा कुठलातरी डाव आहे हे त्यांना पुरतं कळुन चुकलं होतं. बापट वकील हे बाईंच्या अतीशय जवळ्चे आणि त्यासुद्धा सर्व निर्णय त्यांना विचारुनच घेत असत. बापट घरी येताच थेट बाईंच्या खोलीत जात. त्या दिवशी सुद्धा नेहमीप्रमाणे ते त्यांना भेटले होते.

" का रे बापटा...सगळ काही ठीक ना?"
"सगळं काही ठीक चाललय बाई"
"तो कुमार परत का आलाय आता या म्हातारीकडे? शहराची हाव सुटली की काय?"
"काही कल्पना नाही तरीपण एक सांगेन सांगेन म्हणता राहुनच गेलं"
"मग सांगुन टाक आता"
"कुमार वाड्यात आला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच मला भेटला होता. वाड्यासकट थोडीफार जमिन आहे ती विकुन किती पैसे सुटतील हे विचारत होता".
"छान..खाणच चुकली म्हणायची. यांचा तरी काय दोष म्हणा? पण माझ्या हयातीतच यांच्या योजना सुरु झाल्या बापट"
" हो ना. मलाही तसाच संशय आला आपला म्हणुनच तुम्ही मागच्या वर्षी सगळी प्रॉपर्टी ट्र्स्टच्या नावे केलीत हे मी अजुन त्याला सांगीतलच नाहीये. "

"हे एक बरं केलत. चला जाऊ द्या...आपलच पोरगं आहे. त्याला जर वाटलच बसुन खावं तर खाऊ द्यात..पण विकुन पैसा करायचा प्रयत्न केला तर मृत्युपत्रात ठरल्याप्रमाणे त्याला ती विकु न देणे आणि सर्व प्रॉपर्टी रीतसर ताब्यात घेणे हे तुमचे काम तुम्हीच नीट करा. त्याच्या आजोबांनी पुंजी न पुंजी जमा करुन बांधलाय हो हा वाडा...हा असा फुकाफुकी विकु नाही देणार मी.." बोलता बोलताच त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. 


क्रमशः
(पुढील भाग - गावी येण्यामागचे कारण)

1 comment: