Thursday, November 25, 2010

खजिना (भाग २) - गावी येण्यामागचे कारण

        वाड्याची जागा आणि त्या वाड्याला चिकटुन असलेला जमिन जुमला यावर स्वतःचा काहीच हक्क नाही हे अजुन कुमारला माहीतच नव्हतं. थोडे दिवस म्हातारीच्या पुढे पुढे केल्यावर ती विरघळेल..तीला तरी त्याच्याशिवाय कोण आहे हे निशाने त्याला पुन्हा पुन्हा पटवुन दिल्यावरच त्याने गावचा मार्ग धरला होता. तसं पाहीलं तर त्याला गावी परत आणन्यासाठी निर्मलाबाईंनी आजपर्यंत दिलेली मोकळीकच कारणीभुत ठरली होती.

        कुमारने तळघरातल्या खोलीपर्यंत पुन्हा एक चक्कर मारली. त्याला निवांत बसवत नव्हतं. ती खोली त्याला सारखी खुणावत होती. तो अनिच्छेनेच पुन्हा पडवीत येवुन वाडा न्याहाळत बसला. निर्मलाबाईंचा वाडा तसा साधा पण भल्यापैकी मोठा होता. काळ्याभोर दगडांत केलेलं ते बांधकाम होतं. अंदाजे पन्नास साठ वर्षापुर्वीचा वाडा आता बराचसा झिजला होता. मध्ये मध्ये थोडा ढासळायलासुद्धा लागला होता. जमेल तशी निर्मलाबाई आणि बापट स्वतःच्या देखरेखीखाली त्याची डागडुजी करुन घ्यायचे. आता खाली मोठं तळघर आणि तळघरातुन वरच्या खोलीपर्यंत थेट पहिल्या मजल्यापर्यंत दगडी जिना होता. पहिल्या मजल्यावरच्या खोल्या बंदच असायच्या. निर्मलाबाईंना म्हातारपणात जीना चढवायचा नाही त्यामुळे त्या तिथच खालच्या एका खोलीत रहायच्या.

        संध्याकाळचे चार वाजले तरी निशाचा पत्ता नव्हता. कुमारही बसुन बसुन कंटाळला होता. त्याला काही दिवसांपुर्वीच्याच घटना किती वेगात घडल्या त्या आठवू लागल्या.
" कुमार तु काय करायचे ठरवले आहेस? " निशाने त्याची सिगारेट त्याच्या हातातुन काढुन घेत विचारलं.
"काय करुन मी आता तुच सांग? कुठलाच पर्याय उरलेला दिसत नाही." कुमार वैतागला होता.
"असं करुन कसं चालेल? त्यातुन बाहेर निघायला नको का?"
"अगं सत्तर लाखांची रक्कम आहे. माझ्यासारख्या काही न करणाऱ्या माणसाने कुठुन आणायचे इतके?" वैतागुन त्याने तेव्हा संभाषण बंद करायचा प्रयत्न केला होता.

क्रमशः
(पुढील भाग - बादशहा)

No comments:

Post a Comment