Friday, August 26, 2011

जमा-खर्च

कधी तरी खरडलेल्या चार ओळी 


जमा-खर्च
---------------

निशी-दिन, पाप-पुण्य, बरं-वाईट
एकाच अर्थाचे अनेक शब्द
लपाछुपी सुरुच..
एकमेकांशी..
कि माझ्याशी..?

लक्तरं झालीत..
भुतकाळाची पानं उलटुन उलटुन ...
दर वेळेस चुकतोय हिशोब.
आणि लागतच नाहीये ताळमेळ..
पुन्हा पुन्हा केलेल्या जमाखर्चाचा.

क्षणाक्षणाला पडतेच आहे भर
त्याच त्याच शब्दांची
भविष्यातुन भुतकाळात..
ज्यात आहे फक्त एकच रेघ...
अस्पष्ट..
वर्तमानाची.

~योगेश

Monday, May 30, 2011

इथेच आहे कान्हा


अजुन हलती वाऱ्यावरती वेळुची बेटे
अजुन घुमते शीळ अवचित कानावरती येते
सत्य असो वा भास मनाचा , स्वप्न असो वा भाव जनांचा
अजुन येथे मुरली वाजते , इथेच आहे कान्हा सांगते
 ... इथेच आहे कान्हा ॥१॥

अजुन पुजल्या जाती येथे मातेसमान गाई
नैवेद्याचा घास भक्तीने तीला भरविला जाई
बिलगता तीज वासरु प्रेमाने , फुटतो तीलाही पान्हा
दिसतो इथेही  कान्हा ..
सत्य असो वा भास मनाचा , स्वप्न असो वा भाव जनांचा
अजुन येथे मुरली वाजते , इथेच आहे कान्हा सांगते
 ... इथेच आहे कान्हा ॥२॥

अजुन दिसती तान्हुल्यांत येथे , बाळकृष्णाच्या लीला
भुलले जाती अजुन येथे , तान्हुल्यांच्या हसण्याला
द्वापारातल्या कथा कलियुगात , आठवल्या जाती पुन्हा
दिसतो इथेही  कान्हा ...
सत्य असो वा भास मनाचा , स्वप्न असो वा भाव जनांचा
अजुन येथे मुरली वाजते , इथेच आहे कान्हा सांगते
 ... इथेच आहे कान्हा  ॥३॥

                        - योगेश भागवत

Saturday, April 2, 2011

प्रेमळ धरणी , काय म्हणुनी , संतप्त इतकी झाली ?

(जपान मध्ये नुकताच भूकंप आणि त्सुनामीमुळे जो कहर झाला त्यावर आधारित काही ओळी)

प्रेमळ धरणी , काय म्हणुनी , संतप्त इतकी झाली ?
खवळला सागर , ग्रासले नगर , दैना अजुनी झाली.

प्रगती पथावर होतो आम्ही , कौतुक होते अम्हास याचे
काय खुपते मातेस अमुच्या , भान नव्हते अम्हास त्याचे
गुन्हा ठरवावे याला केवळ , चूक का इतकी मोठी झाली ?
प्रेमळ धरणी , काय म्हणुनी , संतप्त इतकी झाली ?

जीवन व्हावे सुखकर म्हणुनी , थोडासाच घातला होता घाव
ठाऊक जरी होते अम्हा , याचेच निसर्ग ऐसे नाव
निसर्गास वरदान म्हणावे , तर शापवाणी कैसी झाली ?
प्रेमळ धरणी , काय म्हणुनी , संतप्त इतकी झाली ?

पुराणात वर्णिले ज्याला , त्याच प्रलयाची हि का नांदी ?
पंचभूतानी बनली सृष्टी , हि धरा तर त्याची फांदी
पंचभूताहुनी श्रेष्ठ झालो , ऐसी तुलना तरी कैसी झाली ?
प्रेमळ धरणी , काय म्हणुनी , संतप्त इतकी झाली ?

~योगेश




Wednesday, March 30, 2011

गल्ली to दिल्ली ( गट्ट्याकाव्य )

काल परवापर्यंत आमच्या गल्लीत प्रसिद्ध असणारा गट्ट्या आज online भेटला.
गट्ट्या ने डिग्री मिळवून मिळवून सर्व विद्यापीठांना त्राही माम करून सोडले होते हे आपल्याला माहित असेलच. नसल्यास येथे सदर वृत्तांत वाचावा.
http://mazilekhani.blogspot.com/2010/05/blog-post.html

तर गटटया दिल्लीत आहे असे कळताच वियोगला गट्ट्याच्या तोडीचे काव्य लगेचच स्फुरले.


आधी  नासाविली  गल्ली  ,मग  देखियेली  दिल्ली
ठेविली  पक्ष्यांत  जणू ,  कुणी  माठ  बिल्ली
हो  हो  हो
आधी  नासाविली  गल्ली  ,मग  देखियेली  दिल्ली

मोठी  रचली  आहे  तिजोरी ,
त्यात  भरल्या  आहेत  विजारी ,
परी ..सापडेना  त्याला  कधी  किल्ली
हो  हो  हो
आधी  नासाविली  गल्ली  ,मग  देखियेली  दिल्ली

खाई रोज  रोज  हा  अंडा ,
हाती  घेवूनी  उभा हा  दंडा ,
परी  सापडेना  त्याला  कधी  गिल्ली
हो  हो  हो
आधी  नासाविली  गल्ली  ,मग  देखियेली  दिल्ली

अचानक  सापडली  त्यास  गिल्ली ,
गिल्लीखालीच  हो  होती  किल्ली ,
परी  वाकताच  नाडीची.. गाठ झाली  ढिल्ली
हो  हो  हो
आधी  नासाविली  गल्ली  ,मग  देखियेली  दिल्ली

~वियोग

Tuesday, January 11, 2011

काळजी ( भाग २)

मागील भागात आपण वाचले - 
-------------------------------------------------------------------------
"किसनाच्या मुलीचे लग्न जवळ येऊन ठेपले आहे आणि त्यासाठी त्याची पैश्यांची जुळवाजुळव सुरु आहे. आज बाबासाहेबांच्या वाड्यावर फुटणारी भिशी उचलायचा त्याचा बेत आहे. संध्याकाळी बबन त्याला घेवून थोडे लवकरच बाबासाहेबांच्या वाड्यावर येतो आणि भिशी उचलण्यासंबधी  बोलणी करतो. सगळी मंडळी जमल्यावर बाबु तिथे दारू पिवून येतो. बाबासाहेब त्याला पुढच्या वर्षी काढून टाकायचे ठरवतात. भिशीच्या बोलीला सुरुवात होते आणि हळू हळू बोली उतरायला लागते. किसना विचारात पडतो तेव्हा बाबासाहेब त्याला पुढील बोली लावण्यासंबधी विचारतात."
------------आता पुढे
-------------------------------------------------------------------------

"हां पाटील उचलायची तर होती पर हे निम्म्याला निम्मं व्याज व्हायला बसलय...परवडायचं तरी कसं? "
"बघ मग.. बाब्या तयार आहेच बसलेला. पुन्हा तुझ्या लेकीचं लग्न. कोण द्यायचं रे हात उसनं तुला. आजकाल लायसन शिवाय सावकारी राहीली नाही बाबा. आणि काही लिहुन द्यायचं पैश्य़ाच्या बदल्यात म्हणजे आपल्या जीवावर येतय."

बबन्याच इतक्यात म्हणाला ," बाबासाहेब म्हणतात ते खरंय. किसनराव लावा पुढची बोली."
"बारा" त्याच्या तोंडुन जरा सावकाशच पुढचा आकडा निघाला.

"तुझं काय रे बाबु? " बाबासाहेबांनी बाबुला विचारलं.
"मला इचारलं व्हय. माझं अकरा."

किसनाला कसंतरीच झालं. बबन्यानं त्याच्य़ा खांद्यावर हात ठेवला. किसनानं एकवार त्याच्य़ाकडे पाहीलं आणि बाबुला म्हणाला ," बाबुराव , लेकीचं लगिन आहे राव माझ्या. लई नड आलिय. एवढी भिशी मिळाली तर बस्ता तरी उरकल या हप्त्यात. तेवढं या महिन्यात मला उचलु द्या. पुढच्या महिन्यात बघा तुम्ही उचला."

बाबु गडी तापलेलाच होता. आधिच हातभट्टीची फुल्ल ढोसुन आल्यामुळे त्याचे डोळे एकदम लाल जर्द झाले होते. " अरे बाबा किसना, माह्यावाला एक बैल गहाळ पडलाय बघ औताला. तेवढा त्याला बाजार दाखवुन नविन घ्यायचाय. नाहीतर काही कामच व्हायचं नाही बघ शेतीचं. आपलीबी ही एवढीच बोली. याच्यापुढे आपल्यातबी काही दम नाही.

बबन्या किसनाच्या कानात हळुच म्हणाला , "ह्ये प्येताड थकलय आता. टाका पुढची बोली आणि घे करुन एकदाची."
"असं म्हणतोस..." किसनाला जरा पटल्यासारखं झालं. तो म्हणाला "साडे दहा".
तराट झालेला बाबु कुठे गप्प बसतोय. तो लगेच म्हणाला " दहा".

किसना कळवळला. म्हणाला " बाबु..आरं बैलाचं काय घेउन बसलाईसा. पाहीजे तर माझा बैल तुझ्याकडे पाठवतो औताला. तेवढं घे बाबा सांभाळुन."

"जमणार नाही. पुन्हा तु हवा तेव्हा बैल द्यायचा नाहीस. आज हे काम ..उद्या ते काम असा म्हणत राहशील.. आणि माझी जमिन राहील बाबा तशीच. नेमका माझ्याच कामाच्या टाईमाला तु बैल घेऊन जायला लागशील तर कसं व्हईल."

"माझा शब्द राहीला बाबु. मी काय कुणाला फसवणारा माणुस नाही"

"जमणार नाही . पार कागद करुन दिलास तरीबी जमणार नाही. "

इतका वेळ शांत असलेल्या किसनाच्या डोक्यात तिडीक गेली. तिरमिरतच तो उठला. "नाही भीशी तर नाही. आयला हे निम्म्याच्या वर व्याज भरुन भीशी उचलावी लागतीय. माझा मी करीन काही बाही...नाहीतर ठेविन तोपतोर पोरीला घरीच."

बबन्या लगेच उठला आणि जात असलेल्या किसनाचा हात धरला. बाबासाहेब स्वतः खुर्चीतुन उठुन आले. " किसनराव..अहो किती चिडायचं. त्यो बाबु प्येताड ये. त्याला काय कळतय. त्याला घेऊ सांभाळुन. त्ये प्यालय म्हणुन त्याला काही कळेना झालय."
"अहो बाबासाहेब..चोविस हजाराची भिशी दहात घ्यायची म्हणजे चौदा व्याज भरायचं. "

"करावं लागतं बाबा अडीनडीला. कुठे जमिन नी घर लिहुन देण्यापरीस तर बरच हाय ना. आणि परत आपल्या भिशीत एखादा हप्ता कधी लेट झाला तरी कोणाला काय बोललो आहे का आपण? नाही. "

त्यांनी किसनाचा हात धरुन त्याला पुन्हा खाली बसवलं आणि ते बाबुकडे वळले. "बाब्या...तुला काय रोग आला रे? भीशी उचलुन तु दारुच पिणार हाईस आणि इथुन मागे कवा तु शेती करुन बोंब पाडली ती आता पाडणार हाईस? त्या बिचाऱ्याच्या पोरीचं लगिन हाये. त्याला आपुनी मदत करायची की आडवं लावुन धरायचं?
इतकी तुला हुक्की आली असलच शेतीची तर त्याचा बैल लिहुन घे . काय तुला वापरायचा असल महिना ...सहा महिना तो वापर. आणि ही भीशी सुद्धा सोडुन दे."
"मी आपल्यापुढे काय बोलणार पाटील?" बाबु नशेतच लाचारासारखं हसला.

बाबासाहेब किसनाला " दहाला करुन टाका तुम्ही फायनल" असं म्हणत त्यानी पेटीतून दहा हजार काढुन त्याच्या हातात दिले.
"तुमचे लई उपकार झाले बघा बाबासाहेब. गरीबाला तुमच्याशिवाय वाली नाही बघा या गावात" बबन्या हात जोडत म्हणाला.

भिशी फुटली तशी सगळी मंडळी घराकडे पांगली. गाव एकदम सामसुम झाला. किसनाला घरी सोडुन बबन्या नेहमीच्या वाटेने न जाता आडवाटेने पुन्हा सडकेला आला आणि तालुक्याच्या दिशेने चालु लागला. तिथुन मैल -दोन मैल चालत गेल्यावर नविनच ढाबा उघडला होता. बाबासाहेबांची मोटर सायकल बाहेर दारातच उभी होती. एका खाटेवर तकियाला टेकुन बाबासाहेब बसलेलेच होते. बबन्याही त्यांच्या पुढे जाऊन बसला. तिखट जाळ लाल लाल मटणाचं ताट समोर आलं. बाटल्यांची झाकणं उघडली गेली. इतक्यात दुरुन बाबु पवार झोकांड्या खात येताना दिसला.

" आज मान यांचा बाबासाहेब. एखादी बाटली जास्त पाजा..नाहीतर पुन्हा बरळायचं गावात जाऊन." बबन्या बाटली ग्लासात रिकामी करत म्हणाला.
"अगदी खरं बोलला बघा. अहो ते काय आणि तुम्ही काय? आमच्या शब्दाबाहेर थोडीच हैत? आजच्या सारखीच कामं करा. असं दहा हजाराला चौदा चौदा हजार व्याज देणारं गिऱ्हाईक शोधुन आणा आणि रोज म्हटलं तरी पार्ट्या झोडा."

जोरजोरात हसतच ताटातल्या मटणाचा फन्ना उडु लागला. रिकाम्या बाटल्या बाजुला पडु लागल्या. बाबु तर थोड्यातच तिथच तराट होऊन आडवा पडला होता. त्याच वेळी किसना घरातच या कुशीवरुन त्या कुशीवर होत होता. बस्त्याची तर सोय झाली आणि आता लग्नाची कशी होईल याच काळजीत बिचारा तळमळत होता.


-योगेश भागवत.

Wednesday, January 5, 2011

काळजी (भाग १)

काळजी.
--------------------


चटका देणारं उन कमी होऊन दिवस कलायला झाला तसंतसं किसनाचं चित्त अजुनच थाऱ्यावर राहीनासं झालं. मघापासुन लिंबाच्या झाडाखाली बसलेला किसना दिवस मावळायला रग्गड दोन तास उशीर असला तरी उठला. खांद्यावरचं फडकं डोक्याला गुंडाळत तसाच शेजारच्या खोपटात शिरला. कोपऱ्यातला विळा उचलुन जसा आत गेला तसाच वाकुन बाहेर आला. झाडाखाली ठेवलेल्या माठातुन तांब्याभर पाणी घेतलं. दोनचार चुळा भरुन लांब पिचकारी मारली आणि उरलेलं पाणी घटघट संपवुन थेट रानाकडे जायला निघाला.

"कुठं चाललास रे बाबा येळमाळचं? " गोठ्याशेजारीच सावलीत बसलेली म्हातारी म्हणाली.
"येतो जरा घास कापुन" तिच्याकडे न बघतच तो पुढे निघाला.
म्हातारीने पुन्हा डोळ्यांची मिचमिच करत गुडघ्यात तोंड घातलं आणि तशीच बसुन राहीली.

हौसा आणि मंगला अजुन बाजारातुन घरी परतायला उशीर होता. त्यामुळे आज त्यांच्या सोबतीविनाच तो रानात शिरला. विहीरीकडेने दोन चार तुकड्यांत उगीच हिरवं गवत उगवलं होतं. तो त्यातच खाली बसुन भरभर गवत कापु लागला. सराईतासारखं तो दोन पायावर हळुहळू पुढे सरकु लागला तसतसं त्याच्या शेजारी गवताचा ढीग होऊ लागला. हात सरसर चालत होते पण त्याचं मन दुसरीकडेच गुंतलं होतं.

आता मोजुन महिना राहीला होता मंगलाच्या लग्नाला. कालपरवाची शेंबडी पोर चांगली दहावी पास होऊन वर्षभर घरीच होती आणि अचानक सोन्यासारखं स्थळ आयतंच चालुन आलं होतं. मुलगा शेजारच्याच गावात राहणारा होता. चांगली पाच-सहा एकर शेती, चार-पाच म्हशी. अधुनमधुन शेतीचा सीझन नसतान तो तसा मुंबईलासुद्धा कामासाठी जात होता. हौसाचं फारच चाललं होतं ...नोकरीवाला शोधा ...नोकरीवाला शोधा म्हणुन. पण आता दहावीपास पोरीला नोकरीवालं स्थळ यायचं तरी कुठुन ?
किसनाने स्वतःचीच समजुत काढली.

तीन-चार गुरांना पुरेल एवढं गवत कापुन पडलं होतं. त्याने ते सगळं गोळा करुन मुटकुळीत उचललं आणि सरळ घरापुढच्या गोठ्यात आला. म्हातारीने एकदा मान वर करुन मिचमिच्या डोळ्यांनी आवाजाच्या दिशेने पाहीलं आणि पुन्हा गुडघ्यात मान घालुन बसुन राहीली.
एव्हाना हौसा आणि मंगला बाजारातुन घरी आल्या होत्या. बाबु जवळच अंगणात एकटाच गोट्या खेळत बसला होता. किसना गुरांना खायला घालुन पुन्हा लिंबाखाली येऊन बसला.

"या हप्त्यात लग्नाचा बस्ता बांधुन घ्यावा म्हणतोय. आता महिन्यावरच आलय लगिन."
हौसाने आतुन बाहेर येत विचारलं ," पैश्याची जुळवाजुळव झाली का समदी?"
"व्हईल हळुहळु. मंडपाची , वाजंत्र्याची सुपारी दिलीय आधीच. बस्ता तेवढा उरकुन घ्यावा म्हणतोय"
"बघा आता तुमच्या सोईवर. मी बाईमाणुस काय सांगणार?"
हौसा जशी बाहेर आली तशीच आत गेली.

आज रात्री बाबासाहेब पाटलांंच्या वाड्यावर भिशी फुटायची होती. काय चोविस-पंचविस हजाराची भिशी जेवढ्यात पडेल तेवढ्यात उचलावी असं बऱ्याच दिवसापासुन किसनानं ठरवलं होतं. त्याचपाई सकाळपासुन त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं . हळूहळू अंधार पडला आणि हौसानं त्याच्यापुढे गरमगरम भाकरीचं ताट आणुन ठेवलं. जेमतेम अर्धी भाकर खाल्ली आणि तसाच हात धुवु लागला. हात धुवायला आणि बाहेरुन आवाज यायला एकच गाठ पडली.

"किसनराव ..ओ किसनराव. आज यायचं नाही का म्हणलं वाड्यावर. आठ वाजत आले की राव." बबन्या बाहेर वाटेवरच उभा राहुन ओरडत होता.
मळका पायजमा, कुर्ता आणि तशीच मळकी टोपी घालुन तो त्याची वाट बघत उभा होता.

"हे काय निघालो लगेच." असे म्हणून त्याने तांब्या खाली ठेवला. "येतो गं" म्हणुन तसंच खांद्यावरचं फडकं डोक्याभोवती गुंडाळून तो बबनसोबत निघाला. कच्ची पायवाट पकडुन ते थोड्याच वेळात डांबरी सडकेला येऊन मिळाले आणि तशीच वाट पकडुन पुढे चालत राहीले.

बाबासाहेबांचा वाडा दुरुनच नजरेत भरत होता. घराचं नाव नुसतं चमचम करत होतं. हे दोघेही तिथे येऊन पोहचले. ऐसपैस पडवीतच बाबासाहेब सुपारी कातरत बसले होते.
"बसा किसनराव. बस की बबन्या." सुपारी कातरतच ते म्हणाले. कातरलेली सुपारी त्यांनी दोघांच्यापुढे केली. त्यांनी ती थोडी थोडी सुपारी उचलुन तोंडात टाकली आणि बाबासाहेबांनी त्यांचा पानसुपारीचा डबा बंद करुन बाजुला ठेवला. दोनचार क्षण असेच शांततेत गेले आणि त्यांनीच विचारलं.

"किसनराव, लेकीच्या लग्नाची तयारी कुठवर आली?"
"ही काय सुरुच आहे अजुन."
"काय मदत बिदत लागली तर मागा म्हणलं आमच्याकडे. आमच्याच लेकीचं लगिन असल्यासारखं आहे."
"त्यासाठीच साहेब आज जरा लवकर आलोय." बबन्या मध्येच म्हणाला.
"लवकर कशापाई?"
"काय तेवढी भिशी आज किसनाला उचलु द्या. आल्या सरशी त्याच्याभी लेकीचं लगिन होऊन जाईल".
"मग आम्ही कवा नाही म्हणतोय. आता येऊ दे की समद्यांना. मग बघु कितीला फुटते भिशी. जी काय नियमाप्रमाणे फुटल ती तर द्यावीच लागल की नाही?"
किसनाअगोदर बबन्यानेच दोन हात जोडुन "तुमचीच कृपा पाटील" असे म्हणल्यासारखे केले.

हळूहळू पडवीत एक एक माणुस येऊ लागलं तसतशी पडवी भरु लागली. दहा बारा डोकी जमल्यावर बबन्याच म्हणाला, "पाटील आता होऊन जाउ द्या की सुरु. आमचं किसनराव ताटकाळल्यात की कवापासुन". किसना बळच कसंनुसं हसला. इतक्यात तिकडे धडपडत बाबु पवार येऊन दाखल झाला. गडी नुसता तराट झाला होता. तोंडाचा तर दुरपर्यंत वास येत होता.

"च्या मायला या बाब्याच्या..चोविस तास नशेतच फिरतय गावभर. हा ईकडं आल्यावर आमची पोरंबाळं, बयामाणसं घपाघप ओकायला लागतात. याला पुढल्या वर्षीपासनं साफ कटाप करुन टाकु. " बाबासाहेब तिरमिरीतच बोलले.
बाबुवर तर त्याचा काहीच परीणाम झाला नाही. तो तिथेच झोकांड्या खात एका खांबाचा आधार घेऊन खाली बसला. हातात वही पेन घेऊन थोडे फार मागचे हिशेब बघुन बाबासाहेबानी बोली सुरु करण्यास संमती दिली, " आपली चोविस हजाराची भिशी या महिन्याची . कोण लावतय मग पहिली बोली?"

बाबासाहेबांनी असं बोलल्याबोलल्याच पहिला आकडा आला बाविस हजाराचा. किसनाला तर नड होतीच. चोविस ला तीन हजार काही जास्त व्याज नाही असा विचार करुन त्याने आकडा सांगितला, " एकविस हजार".
इतक्यात अजुन एक जणाने पुढचा आकडा सांगितला , "साडे वीस".
किसना काही बोलणार इतक्यात बाबु पवाराने अचानक झोपेतुन जागे झाल्यासारखा मध्येच आवाज दिला, "अठरा हजार".

किसनाने एकदा बबन्याकडे पाहीलं ...बाबासाहेबांकडे पाहीलं आणि म्हणाला "साडे सतरा"
पलिकडुन अजून एक आवाज आला , "सतरा"
बाबु पवार तयार होताच.. त्याने पुढचा आकडा सांगितला ," सोळा".
दोन मिनिटं शांततेत गेली. बाबासाहेब विचारु लागले " हा आकडा फायनल समजायचा का? "

किसनाने बबन्याकडे पाहीलं. बबन्याने डोळ्यानेच त्याला खुण केली. त्याने मनात विचार केला 'चोविसला आठ हजार व्याज म्हणजे इतकंही काही वाईट नाही.' इतक्यात कुणीतरी मध्येच पिन सोडली " पंधरा".
कोण बोललं तिकडे किसना बघणारच इतक्यात खांबाला टेकुन बसलेला बाबु पुन्हा बोलला " चौदा"

किसनाने पुन्हा एकदा मनाशीच गणित जुळवले आणि म्हणाला " तेरा पाचशे"
बाबु ..."बारा पाचशे"

आता मात्र किसनाला प्रश्न पडला. हे तर निम्म्याला निम्म व्याज झालं होतं. इतक्यात बाबासाहेब म्हणाले " आज काही मजा येत नाही राव बोलीला. काय इन मिन दोन तिन टाळकीच लागलीत आवाज द्यायला. किसना तुला रे काय झालं आता .आज भिशी उचलायची म्हणत होता नव्ह."

--------------------------------------------------------
क्रमश: