काळजी.
--------------------
चटका देणारं उन कमी होऊन दिवस कलायला झाला तसंतसं किसनाचं चित्त अजुनच थाऱ्यावर राहीनासं झालं. मघापासुन लिंबाच्या झाडाखाली बसलेला किसना दिवस मावळायला रग्गड दोन तास उशीर असला तरी उठला. खांद्यावरचं फडकं डोक्याला गुंडाळत तसाच शेजारच्या खोपटात शिरला. कोपऱ्यातला विळा उचलुन जसा आत गेला तसाच वाकुन बाहेर आला. झाडाखाली ठेवलेल्या माठातुन तांब्याभर पाणी घेतलं. दोनचार चुळा भरुन लांब पिचकारी मारली आणि उरलेलं पाणी घटघट संपवुन थेट रानाकडे जायला निघाला.
"कुठं चाललास रे बाबा येळमाळचं? " गोठ्याशेजारीच सावलीत बसलेली म्हातारी म्हणाली.
"येतो जरा घास कापुन" तिच्याकडे न बघतच तो पुढे निघाला.
म्हातारीने पुन्हा डोळ्यांची मिचमिच करत गुडघ्यात तोंड घातलं आणि तशीच बसुन राहीली.
हौसा आणि मंगला अजुन बाजारातुन घरी परतायला उशीर होता. त्यामुळे आज त्यांच्या सोबतीविनाच तो रानात शिरला. विहीरीकडेने दोन चार तुकड्यांत उगीच हिरवं गवत उगवलं होतं. तो त्यातच खाली बसुन भरभर गवत कापु लागला. सराईतासारखं तो दोन पायावर हळुहळू पुढे सरकु लागला तसतसं त्याच्या शेजारी गवताचा ढीग होऊ लागला. हात सरसर चालत होते पण त्याचं मन दुसरीकडेच गुंतलं होतं.
आता मोजुन महिना राहीला होता मंगलाच्या लग्नाला. कालपरवाची शेंबडी पोर चांगली दहावी पास होऊन वर्षभर घरीच होती आणि अचानक सोन्यासारखं स्थळ आयतंच चालुन आलं होतं. मुलगा शेजारच्याच गावात राहणारा होता. चांगली पाच-सहा एकर शेती, चार-पाच म्हशी. अधुनमधुन शेतीचा सीझन नसतान तो तसा मुंबईलासुद्धा कामासाठी जात होता. हौसाचं फारच चाललं होतं ...नोकरीवाला शोधा ...नोकरीवाला शोधा म्हणुन. पण आता दहावीपास पोरीला नोकरीवालं स्थळ यायचं तरी कुठुन ?
किसनाने स्वतःचीच समजुत काढली.
तीन-चार गुरांना पुरेल एवढं गवत कापुन पडलं होतं. त्याने ते सगळं गोळा करुन मुटकुळीत उचललं आणि सरळ घरापुढच्या गोठ्यात आला. म्हातारीने एकदा मान वर करुन मिचमिच्या डोळ्यांनी आवाजाच्या दिशेने पाहीलं आणि पुन्हा गुडघ्यात मान घालुन बसुन राहीली.
एव्हाना हौसा आणि मंगला बाजारातुन घरी आल्या होत्या. बाबु जवळच अंगणात एकटाच गोट्या खेळत बसला होता. किसना गुरांना खायला घालुन पुन्हा लिंबाखाली येऊन बसला.
"या हप्त्यात लग्नाचा बस्ता बांधुन घ्यावा म्हणतोय. आता महिन्यावरच आलय लगिन."
हौसाने आतुन बाहेर येत विचारलं ," पैश्याची जुळवाजुळव झाली का समदी?"
"व्हईल हळुहळु. मंडपाची , वाजंत्र्याची सुपारी दिलीय आधीच. बस्ता तेवढा उरकुन घ्यावा म्हणतोय"
"बघा आता तुमच्या सोईवर. मी बाईमाणुस काय सांगणार?"
हौसा जशी बाहेर आली तशीच आत गेली.
आज रात्री बाबासाहेब पाटलांंच्या वाड्यावर भिशी फुटायची होती. काय चोविस-पंचविस हजाराची भिशी जेवढ्यात पडेल तेवढ्यात उचलावी असं बऱ्याच दिवसापासुन किसनानं ठरवलं होतं. त्याचपाई सकाळपासुन त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं . हळूहळू अंधार पडला आणि हौसानं त्याच्यापुढे गरमगरम भाकरीचं ताट आणुन ठेवलं. जेमतेम अर्धी भाकर खाल्ली आणि तसाच हात धुवु लागला. हात धुवायला आणि बाहेरुन आवाज यायला एकच गाठ पडली.
"किसनराव ..ओ किसनराव. आज यायचं नाही का म्हणलं वाड्यावर. आठ वाजत आले की राव." बबन्या बाहेर वाटेवरच उभा राहुन ओरडत होता.
मळका पायजमा, कुर्ता आणि तशीच मळकी टोपी घालुन तो त्याची वाट बघत उभा होता.
"हे काय निघालो लगेच." असे म्हणून त्याने तांब्या खाली ठेवला. "येतो गं" म्हणुन तसंच खांद्यावरचं फडकं डोक्याभोवती गुंडाळून तो बबनसोबत निघाला. कच्ची पायवाट पकडुन ते थोड्याच वेळात डांबरी सडकेला येऊन मिळाले आणि तशीच वाट पकडुन पुढे चालत राहीले.
बाबासाहेबांचा वाडा दुरुनच नजरेत भरत होता. घराचं नाव नुसतं चमचम करत होतं. हे दोघेही तिथे येऊन पोहचले. ऐसपैस पडवीतच बाबासाहेब सुपारी कातरत बसले होते.
"बसा किसनराव. बस की बबन्या." सुपारी कातरतच ते म्हणाले. कातरलेली सुपारी त्यांनी दोघांच्यापुढे केली. त्यांनी ती थोडी थोडी सुपारी उचलुन तोंडात टाकली आणि बाबासाहेबांनी त्यांचा पानसुपारीचा डबा बंद करुन बाजुला ठेवला. दोनचार क्षण असेच शांततेत गेले आणि त्यांनीच विचारलं.
"किसनराव, लेकीच्या लग्नाची तयारी कुठवर आली?"
"ही काय सुरुच आहे अजुन."
"काय मदत बिदत लागली तर मागा म्हणलं आमच्याकडे. आमच्याच लेकीचं लगिन असल्यासारखं आहे."
"त्यासाठीच साहेब आज जरा लवकर आलोय." बबन्या मध्येच म्हणाला.
"लवकर कशापाई?"
"काय तेवढी भिशी आज किसनाला उचलु द्या. आल्या सरशी त्याच्याभी लेकीचं लगिन होऊन जाईल".
"मग आम्ही कवा नाही म्हणतोय. आता येऊ दे की समद्यांना. मग बघु कितीला फुटते भिशी. जी काय नियमाप्रमाणे फुटल ती तर द्यावीच लागल की नाही?"
किसनाअगोदर बबन्यानेच दोन हात जोडुन "तुमचीच कृपा पाटील" असे म्हणल्यासारखे केले.
हळूहळू पडवीत एक एक माणुस येऊ लागलं तसतशी पडवी भरु लागली. दहा बारा डोकी जमल्यावर बबन्याच म्हणाला, "पाटील आता होऊन जाउ द्या की सुरु. आमचं किसनराव ताटकाळल्यात की कवापासुन". किसना बळच कसंनुसं हसला. इतक्यात तिकडे धडपडत बाबु पवार येऊन दाखल झाला. गडी नुसता तराट झाला होता. तोंडाचा तर दुरपर्यंत वास येत होता.
"च्या मायला या बाब्याच्या..चोविस तास नशेतच फिरतय गावभर. हा ईकडं आल्यावर आमची पोरंबाळं, बयामाणसं घपाघप ओकायला लागतात. याला पुढल्या वर्षीपासनं साफ कटाप करुन टाकु. " बाबासाहेब तिरमिरीतच बोलले.
बाबुवर तर त्याचा काहीच परीणाम झाला नाही. तो तिथेच झोकांड्या खात एका खांबाचा आधार घेऊन खाली बसला. हातात वही पेन घेऊन थोडे फार मागचे हिशेब बघुन बाबासाहेबानी बोली सुरु करण्यास संमती दिली, " आपली चोविस हजाराची भिशी या महिन्याची . कोण लावतय मग पहिली बोली?"
बाबासाहेबांनी असं बोलल्याबोलल्याच पहिला आकडा आला बाविस हजाराचा. किसनाला तर नड होतीच. चोविस ला तीन हजार काही जास्त व्याज नाही असा विचार करुन त्याने आकडा सांगितला, " एकविस हजार".
इतक्यात अजुन एक जणाने पुढचा आकडा सांगितला , "साडे वीस".
किसना काही बोलणार इतक्यात बाबु पवाराने अचानक झोपेतुन जागे झाल्यासारखा मध्येच आवाज दिला, "अठरा हजार".
किसनाने एकदा बबन्याकडे पाहीलं ...बाबासाहेबांकडे पाहीलं आणि म्हणाला "साडे सतरा"
पलिकडुन अजून एक आवाज आला , "सतरा"
बाबु पवार तयार होताच.. त्याने पुढचा आकडा सांगितला ," सोळा".
दोन मिनिटं शांततेत गेली. बाबासाहेब विचारु लागले " हा आकडा फायनल समजायचा का? "
किसनाने बबन्याकडे पाहीलं. बबन्याने डोळ्यानेच त्याला खुण केली. त्याने मनात विचार केला 'चोविसला आठ हजार व्याज म्हणजे इतकंही काही वाईट नाही.' इतक्यात कुणीतरी मध्येच पिन सोडली " पंधरा".
कोण बोललं तिकडे किसना बघणारच इतक्यात खांबाला टेकुन बसलेला बाबु पुन्हा बोलला " चौदा"
किसनाने पुन्हा एकदा मनाशीच गणित जुळवले आणि म्हणाला " तेरा पाचशे"
बाबु ..."बारा पाचशे"
आता मात्र किसनाला प्रश्न पडला. हे तर निम्म्याला निम्म व्याज झालं होतं. इतक्यात बाबासाहेब म्हणाले " आज काही मजा येत नाही राव बोलीला. काय इन मिन दोन तिन टाळकीच लागलीत आवाज द्यायला. किसना तुला रे काय झालं आता .आज भिशी उचलायची म्हणत होता नव्ह."
--------------------------------------------------------
क्रमश:
good Yogesh!!
ReplyDeletechangali jamtie!!
:)
keep it up!
Mast!!!!
ReplyDelete