-------------------------------------------------------------------------
"किसनाच्या मुलीचे लग्न जवळ येऊन ठेपले आहे आणि त्यासाठी त्याची पैश्यांची जुळवाजुळव सुरु आहे. आज बाबासाहेबांच्या वाड्यावर फुटणारी भिशी उचलायचा त्याचा बेत आहे. संध्याकाळी बबन त्याला घेवून थोडे लवकरच बाबासाहेबांच्या वाड्यावर येतो आणि भिशी उचलण्यासंबधी बोलणी करतो. सगळी मंडळी जमल्यावर बाबु तिथे दारू पिवून येतो. बाबासाहेब त्याला पुढच्या वर्षी काढून टाकायचे ठरवतात. भिशीच्या बोलीला सुरुवात होते आणि हळू हळू बोली उतरायला लागते. किसना विचारात पडतो तेव्हा बाबासाहेब त्याला पुढील बोली लावण्यासंबधी विचारतात."
------------आता पुढे
-------------------------------------------------------------------------
"हां पाटील उचलायची तर होती पर हे निम्म्याला निम्मं व्याज व्हायला बसलय...परवडायचं तरी कसं? "
"बघ मग.. बाब्या तयार आहेच बसलेला. पुन्हा तुझ्या लेकीचं लग्न. कोण द्यायचं रे हात उसनं तुला. आजकाल लायसन शिवाय सावकारी राहीली नाही बाबा. आणि काही लिहुन द्यायचं पैश्य़ाच्या बदल्यात म्हणजे आपल्या जीवावर येतय."
बबन्याच इतक्यात म्हणाला ," बाबासाहेब म्हणतात ते खरंय. किसनराव लावा पुढची बोली."
"बारा" त्याच्या तोंडुन जरा सावकाशच पुढचा आकडा निघाला.
"तुझं काय रे बाबु? " बाबासाहेबांनी बाबुला विचारलं.
"मला इचारलं व्हय. माझं अकरा."
किसनाला कसंतरीच झालं. बबन्यानं त्याच्य़ा खांद्यावर हात ठेवला. किसनानं एकवार त्याच्य़ाकडे पाहीलं आणि बाबुला म्हणाला ," बाबुराव , लेकीचं लगिन आहे राव माझ्या. लई नड आलिय. एवढी भिशी मिळाली तर बस्ता तरी उरकल या हप्त्यात. तेवढं या महिन्यात मला उचलु द्या. पुढच्या महिन्यात बघा तुम्ही उचला."
बाबु गडी तापलेलाच होता. आधिच हातभट्टीची फुल्ल ढोसुन आल्यामुळे त्याचे डोळे एकदम लाल जर्द झाले होते. " अरे बाबा किसना, माह्यावाला एक बैल गहाळ पडलाय बघ औताला. तेवढा त्याला बाजार दाखवुन नविन घ्यायचाय. नाहीतर काही कामच व्हायचं नाही बघ शेतीचं. आपलीबी ही एवढीच बोली. याच्यापुढे आपल्यातबी काही दम नाही.
बबन्या किसनाच्या कानात हळुच म्हणाला , "ह्ये प्येताड थकलय आता. टाका पुढची बोली आणि घे करुन एकदाची."
"असं म्हणतोस..." किसनाला जरा पटल्यासारखं झालं. तो म्हणाला "साडे दहा".
तराट झालेला बाबु कुठे गप्प बसतोय. तो लगेच म्हणाला " दहा".
किसना कळवळला. म्हणाला " बाबु..आरं बैलाचं काय घेउन बसलाईसा. पाहीजे तर माझा बैल तुझ्याकडे पाठवतो औताला. तेवढं घे बाबा सांभाळुन."
"जमणार नाही. पुन्हा तु हवा तेव्हा बैल द्यायचा नाहीस. आज हे काम ..उद्या ते काम असा म्हणत राहशील.. आणि माझी जमिन राहील बाबा तशीच. नेमका माझ्याच कामाच्या टाईमाला तु बैल घेऊन जायला लागशील तर कसं व्हईल."
"माझा शब्द राहीला बाबु. मी काय कुणाला फसवणारा माणुस नाही"
"जमणार नाही . पार कागद करुन दिलास तरीबी जमणार नाही. "
इतका वेळ शांत असलेल्या किसनाच्या डोक्यात तिडीक गेली. तिरमिरतच तो उठला. "नाही भीशी तर नाही. आयला हे निम्म्याच्या वर व्याज भरुन भीशी उचलावी लागतीय. माझा मी करीन काही बाही...नाहीतर ठेविन तोपतोर पोरीला घरीच."
बबन्या लगेच उठला आणि जात असलेल्या किसनाचा हात धरला. बाबासाहेब स्वतः खुर्चीतुन उठुन आले. " किसनराव..अहो किती चिडायचं. त्यो बाबु प्येताड ये. त्याला काय कळतय. त्याला घेऊ सांभाळुन. त्ये प्यालय म्हणुन त्याला काही कळेना झालय."
"अहो बाबासाहेब..चोविस हजाराची भिशी दहात घ्यायची म्हणजे चौदा व्याज भरायचं. "
"करावं लागतं बाबा अडीनडीला. कुठे जमिन नी घर लिहुन देण्यापरीस तर बरच हाय ना. आणि परत आपल्या भिशीत एखादा हप्ता कधी लेट झाला तरी कोणाला काय बोललो आहे का आपण? नाही. "
त्यांनी किसनाचा हात धरुन त्याला पुन्हा खाली बसवलं आणि ते बाबुकडे वळले. "बाब्या...तुला काय रोग आला रे? भीशी उचलुन तु दारुच पिणार हाईस आणि इथुन मागे कवा तु शेती करुन बोंब पाडली ती आता पाडणार हाईस? त्या बिचाऱ्याच्या पोरीचं लगिन हाये. त्याला आपुनी मदत करायची की आडवं लावुन धरायचं?
इतकी तुला हुक्की आली असलच शेतीची तर त्याचा बैल लिहुन घे . काय तुला वापरायचा असल महिना ...सहा महिना तो वापर. आणि ही भीशी सुद्धा सोडुन दे."
"मी आपल्यापुढे काय बोलणार पाटील?" बाबु नशेतच लाचारासारखं हसला.
बाबासाहेब किसनाला " दहाला करुन टाका तुम्ही फायनल" असं म्हणत त्यानी पेटीतून दहा हजार काढुन त्याच्या हातात दिले.
"तुमचे लई उपकार झाले बघा बाबासाहेब. गरीबाला तुमच्याशिवाय वाली नाही बघा या गावात" बबन्या हात जोडत म्हणाला.
भिशी फुटली तशी सगळी मंडळी घराकडे पांगली. गाव एकदम सामसुम झाला. किसनाला घरी सोडुन बबन्या नेहमीच्या वाटेने न जाता आडवाटेने पुन्हा सडकेला आला आणि तालुक्याच्या दिशेने चालु लागला. तिथुन मैल -दोन मैल चालत गेल्यावर नविनच ढाबा उघडला होता. बाबासाहेबांची मोटर सायकल बाहेर दारातच उभी होती. एका खाटेवर तकियाला टेकुन बाबासाहेब बसलेलेच होते. बबन्याही त्यांच्या पुढे जाऊन बसला. तिखट जाळ लाल लाल मटणाचं ताट समोर आलं. बाटल्यांची झाकणं उघडली गेली. इतक्यात दुरुन बाबु पवार झोकांड्या खात येताना दिसला.
" आज मान यांचा बाबासाहेब. एखादी बाटली जास्त पाजा..नाहीतर पुन्हा बरळायचं गावात जाऊन." बबन्या बाटली ग्लासात रिकामी करत म्हणाला.
"अगदी खरं बोलला बघा. अहो ते काय आणि तुम्ही काय? आमच्या शब्दाबाहेर थोडीच हैत? आजच्या सारखीच कामं करा. असं दहा हजाराला चौदा चौदा हजार व्याज देणारं गिऱ्हाईक शोधुन आणा आणि रोज म्हटलं तरी पार्ट्या झोडा."
जोरजोरात हसतच ताटातल्या मटणाचा फन्ना उडु लागला. रिकाम्या बाटल्या बाजुला पडु लागल्या. बाबु तर थोड्यातच तिथच तराट होऊन आडवा पडला होता. त्याच वेळी किसना घरातच या कुशीवरुन त्या कुशीवर होत होता. बस्त्याची तर सोय झाली आणि आता लग्नाची कशी होईल याच काळजीत बिचारा तळमळत होता.
-योगेश भागवत.
No comments:
Post a Comment