Thursday, August 19, 2010

जाग

जाग
==============================
वृक्षजन्माचा प्रवास , डोळ्यांदेखत सायास ||१||
चिमटीने खुडीला देठ ,  झाला विशाल तो वट ||२||
नाजुकशी होती काया, अता देई अम्हा छाया ||३||
ऐसा घडुनी यावा योग , दृष्टांताने यावी जाग ||४||

Thursday, August 12, 2010

मुखी आळवूया विठ्ठल

(सर्व संतांची क्षमा मागून मित्रासोबत झालेल्या चर्चेत सुचलेल्या ओळी मांडल्या आहेत)


मुखी आळवूया विठ्ठल

हरिनामाचा झेंडा घेवूनी हाती , मुखी आळवूया विठ्ठल
चराचरी जो वसला येथे , जाणू मिळोनिया विठ्ठल  ||धृ ||

शब्दा मिळवूनी शब्द , जुळुनी यावा भाव अंगी
टाळा भिडवूनी टाळ , रंगुनी जावे पांडुरंगी
हरीचे कीर्तन श्रवण करोनी , मुखी आळवूया विठ्ठल ||१||
चराचरी जो वसला येथे , जाणू मिळोनिया विठ्ठल

पाउल जुळवुनी पाउल , चालुनी जाऊ वाट मोठी
संतांची वाणी गाऊन , अभंग खेळवू ओठी
धुलीसम राहुनी तेथे चरणी , मुखी आळवूया विठ्ठल ||२||
चराचरी जो वसला येथे , जाणू मिळोनिया विठ्ठल

आप पर भाव जावो निघोनी , दिसो तुझ्यातला विठ्ठल
सगुण निर्गुण म्हणती जयाला , कळू दे अम्हांस तो विठ्ठल
तोवर चरणी मिठी मारोनी ,  मुखी आळवूया विठ्ठल ||३||
चराचरी जो वसला येथे , जाणू मिळोनिया विठ्ठल



~योगेश

शेवटी तुकोबांच्या म्हणण्याप्रमाणे

बोलिली लेकुरे , वेडी वाकुडी उत्तरे ||
क्षमा करा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध||
नाही विचारिला , अधिकार मी आपुला ||
तुका म्हणे ज्ञानेश्वरा , राख पायापैं किंकरा ||    

Tuesday, August 3, 2010

ऑडिशन

लवकर येतो म्हणूनही तो काल उशिराच आला...
त्याची वाट बघण्यातच झालेलं जागरण...
डोळ्यांखाली काळी वर्तुळही झालीत ...
हि गर्दी अजूनही ढिम्मच...

पियुला सकाळीच कसबसं  तयार केलंय
ऐकताच नव्हती अगदी
दोन फटकेही द्यावे लागले
फारच रडत होती............
हल्ली शाळेत जाताना फारच दंगा करते
...लहान आहे अजून
होईल शांत हळूहळू
पण ......तोपर्यंत माझं काय?

सकाळी सकाळी त्याचं आवरून द्यायचं
शेवटी घाई झालीच ना...
इथे तर एवढी गर्दी जमलीय
हि ऑडिशन तरी व्यवस्थित व्हायला हवी
हि जाहिरात मिळायलाच हवी

ती तर फारच भाव खातेय
खाणारच म्हणा
अलीकडे फारच  चलती आहे तिची
पाच सहा वर्षांपूर्वी माझ्यापुढे उभी सुद्धा नसती राहिली
गर्दी काहीच कमी होत नाहीये अजून
हल्ली जी उठते ती मॉडेल व्हायला येते.


फारच उशीर झालाय आता
घाई गडबडीत काही खाल्लेलसुद्धा नाही सकाळी
पियुची शाळेतून यायची वेळ सुद्धा होत आलीये
..माझी ऑडिशन आज चांगली व्हायलाच हवी

घड्याळ काही थांबत नाही
ती आली असेल शाळेतून
काकूंना सांगितलंय
आजच्या दिवस तेवढं ठेवा तिला
त्यांनाही त्रास होतोय
पाळणाघराशिवाय पर्याय नाही
..हो.त्याला आवडत नसलं तरीही

येईलच आता माझा नंबर
एकदा फोने करावा का तिला

.....
........
छे..फारच रडते आहे.
सांगूनही काही ऐकत नाही.
'तू लवकर घरी ये' एवढंच म्हणतेय.
काकुनांही फारच त्रास....

शेवटी ज्याची भीती होती तेच झालं.
चेहऱ्यावर एक्स्प्रेशंस  येत नाहीत  म्हणे
मला तर जगणंच नको झालंय
नुसतंच अडकून पडले आहे
आता निदान घरी तरी लवकर जायला हवं.
जाहिरात काय??? तिलाच मिळणार.


लिफ्टसुद्धा नेमकी आजच बंद
काकू प्लीज दरवाजा उघडा लवकर
'पियू पियू...बाळा काय झालं?
आता आलेना मी....रडायचं नाही.
गालपण बघ किती लाल झालेत.
रडू नको बाळा ....
आता कध्धी कध्धी नाही जाणार हां तुला सोडून'

आणि बाळाच्या इवल्या मिठीत
तिच्या डोळ्यांचा बांध कधी फुटला
तिचं तिलाच कळालं नाही
अपयश , इर्षा , चिडचिड ..सगळ वाहून चाललं  होत
तिथे उरली होती फक्त एक आई .......
आपल्या बाळाच्या मिठीत.


************
 योगेश