वाड्यातल्या तळघरात त्याच्या आजोबांनी खजिना लपवला आहे अशी कुणकुण त्याने लहानपणापासुनच ऐकली होती. आजोबांनी त्यांच्या नंतरच्या काळात सावकारकी करुन बरीचसा पैसा, सोनं-नाणं जमवुन ठेवलं होतं. पण ते कुठे आहे हे कधिच कुणला सापडलं नव्हतं. शेवटी ते रहस्य आजोबांबरोबरच अचानक संपलं.
कुमार लहान असताना त्याचे वडील तळघरात सारखं काही तरी शोधायचे हे त्याला कळायचं...पण काय शोधायचे हे त्याला कळत नव्हतं. त्याला फक्त तळघरातुन त्यांच्या गड्याने त्याच्या वडीलांचं शरीर उचलुन बाहेर आणलेलं आठवत होतं...आणि आठवत होता तो त्यांच्या तोंडातुन गळ्यावर ओघळणारा फेस.
त्यांना नागाने दंश केला होता हे त्याला बराच मोठा झाल्यावर कळालं. पुढे पुढे तर त्याचे आजोबा नाग होऊन तळघरात लपलेत अशी कुणकुण सुद्धा त्याला ऐकु येऊ लागली. तो साधारण बारा-तेरा वर्षाचा असताना अशीच अजुन ऐक पाहीलेली घटना त्याच्या मनात घट्ट चिकटुन बसलेली होती. त्यांच्या गड्याचा देहसुद्धा त्याच्या वडीलांसारखाच तळघरातुन उचलुन आणला होता आणि त्याच्या तोंडातुन सुद्धा ओघळत होता तसाच फेस. तो नोकर सुद्धा खजिना शोधायचाच प्रयत्न करत होता हे त्याला आजीकडुन समजलं. तेव्हापासुन त्याने खजिन्याचं जे नाव टाकलं ते अगदी आता वाड्यात परत येईपर्यंत.
पण आता पैश्याची अडचण तर आली होतीच आणि निशाला गप्पा-गप्पांतुन सांगितलेल्य़ा गोष्टींनी तिच्या मनावर फार विलक्षण परिणाम झाला होता. तीने त्याला तळघरात जायला एका परीने भागच पाडलं होतं. दोघे दबकत दबकत दोनच दिवसांपुर्वी आत उतरले होते. तिकडे जाऊन टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी सगळीकडे पाहणी केली होती. कुठे कुठे उकरल्याच्य़ा खुणा तशाच टिकुन होत्य़ा. कुदळ-फावडं, घमेलं सगळं सामान तिथेच अस्ताव्यस्त पडलं होतं. कुबट अंधाऱ्या खोलीत गुदमरुन मरतो की काय असं वाटत असतानाच त्याच्या पायावरुन एक थंडगार स्पर्श वळवळत गेला आणि एकच शिरशिरी त्याच्या मस्तकापर्यंत गेली. ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत तो बाहेर पळाला होता.
आपली काही आता आत जायची छाती नाही असं त्याने निशाला निक्षुन पुन्हा पुन्हा सांगीतले होतं आणि दुसऱ्याच दिवशी तीने त्याला उपाय सुचवला होता. आज तर ती तो उपाय घेवुनच आली होती.
क्रमशः
(पुढील भाग - कौल )
No comments:
Post a Comment