Friday, June 25, 2010

उगम

उगम
---------------------

शोधसी दिशा दाही , मानवा....फिरूनही ज्या तू पाही
कळला का तुज उगम दिशांचा , कि कुठेच दिसला नाही

शोधसी काळही तिन्ही , मानवा....जगुनही जे तू पाही
कळला का तुज उगम काळांचा , कि कुठेच दिसला नाही

शोधसी देवही ऐसा , मानवा...धर्मातही जो तू पाही
कळला का तुज उगम ईशाचा , कि कुठेच दिसला नाही

नकोच शोधू दूर कुठेही , मानवा... हे विश्वही पुरेच नाही
दिशा असो वा काळ असो हा , आपणातुनी देवही दूर नाही

~योगेश

Thursday, June 24, 2010

चेहरा

चेहरा
_________


रंग कुणाचा तुला न कळला, सांगतो तुझा चेहरा
संग कुणाचा तुला न रुचला, सांगतो तुझा चेहरा


गर्द निळाई, घन वनराई,
मनभर दाटे जी मनराई
अवखळ पाणी, खळखळ करुनी ,
मनभर वाहे जी तरुणाई
संग तयांचा तुला लाभला, सांगतो तुझा चेहरा


गुलाब ताजे, हवेसे ओझे ,
गुलाबी गालांवरती साजे
बोचरे काटे, तयांचे नाते,
नकळत मनास हळव्या बोचे
संग तयांचा तुला न रुचला, सांगतो तुझा चेहरा



~योगेश

Thursday, June 17, 2010

तोडगा

तोडगा

------------------------
            फार फार वर्षांपुर्वीपासुन असली तरी अगदी अलीकडची म्हणण्यासारखी सुद्धा गोष्ट आहे. आटपाट नावाच्या नगरीत घराणेशाहीशी निगडीत लोकशाही बेमालुम मिसळुन गुण्यागोविंदाने नांदत होती. राज्यात बऱ्यापैकी रस्ते बनवले होते. रस्त्याच्या दुतर्फा वड-पिंपळाची पुरातन कालापासुन आलेली झाडे जोपासण्यात आली होती. पर्यावरण मंत्र्याना अगदी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यासाठीही जागा उप्लब्ध नव्हती. त्यामुळे पर्यावरण मंत्र्याना आपले पद नष्ट होते की काय अशी भीती वाटु लागली होती. लवकरच याचा सोक्षमोक्ष तो काय लावावा म्हणुन त्यांनी आपल्या बंगल्यात पार्टी आयोजीत केली आणि त्यात त्यांच्या परम मित्रांना आंमत्रीत केले. उद्योग मंत्री , कामगार मंत्री आणि दळणवळण मंत्री यांच्यासकट त्यांची पार्टी सुरु झाली आणि थोड्या वेळातच त्यांनी मुद्द्याला हात घातला.

प.मं :- सध्या फारच गोची झाली आहे. हे पद लवकरच नष्ट होणार आहे अशी भीती निर्माण झाली आहे. तसा पद असुनही फार काही उपयोग नाहीच आहे म्हणा. चरायला मोकळे कुरण देखील उप्लब्ध नाही. उगीच झाडांची गणती करणे, फांद्या छाटणे अश्या किरकोळ कामातुन छाटछुट भागवावी लागते.

उ.मं :- अहो काय सांगायचं?? स्वतःचं दुःख तेवढं तुम्हाला मोठं दिसतं. इकडे आमची सुद्धा काही वेगळी गत नाही. उद्योग बंद व्हायच्या मार्गावर आलेत. बाहेरच्या उद्योगांच्या स्पर्धेत आपण फार मागे पडलो आहोत आणि आपल्याच मालाला बाजारपेठ मिळेनाशी झाली आहे. सगळ्या मालकांनी उद्योग बंद करायचे ठरवले आहे.

का.मं :- बरोबर आहे. कामगार सुद्धा कामाच्या बाबतीत गार पडत चालले आहेत. नुसता पगार वाढवुन हवा. सगळ्यांनी मिळुन युनियन बनवली आहे. पार झीट आणली आहे बोंबाबोंब करुन.

द.मं :- आमचं दुःखही थोडंफार हेच आहे. जुन्या काळी बनवलेले डांबरी रस्ते आजही चांगले ठणठणीत आहेत. नविन काही काम नाही. उगीच आपले कुठे पाईपलाईन करण्यासाठी कुठे रस्ता उकर, परत बुजव अशी फुटकळ कामं करण्यात मलई शोधावी लागते आहे.

                     असा सगळ्यांनी एकमेकांसमोर दुःखाचा पाढा वाचल्यानंतर त्यांच्यात बरीच चर्चा झाली. पेगवर पेग रिचवले गेले. पार्टी संपली पण थोड्याच दिवसात कामगारांच्या एक नाही तर चार पाच युनियन्स सुरु झाल्या . त्यांचे आपापसातच झगडे सुरु झाले. या झगड्यातच सध्याचे उद्योग बंद पडले आणी कामगार बेकार होऊन नगरीतले उद्योग धडाधड बंद पडले. घरी बसलेल्या कामगारंची उपासमार होऊ लागली.

                  काही दिवसांतच नविन दुचाकी गाडी बनवणारी कंपनी नगरीत सुरु होणार अशी घोषणा झाली. सगळ्यांना काम मिळेल अशी आश्वासने देण्यात आली. कंपनी सुरु झाली आणि कामगारांची नोकरी मिळवण्यासाठी रांग लागली. जागा कमी आणि लोकं फार अशी स्थिती झाली. शेवटी सगळ्या युनियन्स कडुन टेण्डर घेण्यात आले. जी युनियन कमी किंमतीत काम करुन देईल त्यांच्या कामगारांना काम. एका युनियनने टेंडर जिंकले आणि त्यांनी त्यांचे कामगार आत घुसवले. आता पगार वाटपाचा प्रश्नच नव्हता. कंपनी दर महिन्याला युनियनला ठराविक रक्कम देऊ लागली आणि युनियनच कामगारांना त्यातुन पगार वाटु लागली. हळुहळु युनियन हा शब्द नष्ट होऊन कॉन्ट्रॅक्टर हा नविन शब्द रुढ झाला. थोड्या कामगारांचा प्रश्न सुटला म्हणुन कामगार मंत्र्याचीही पाठ थोपटली गेली.पुर्विच्या काळी जिथे मोटर सायकली एक-दोनच दिसायच्या त्या आता दहा-पंधरा दिसु लागल्या. कामगारांवरचा खर्च कमी केल्यामुळे उत्पादन थोडे स्वस्त झाले होते.

                  हळुहळु एकाला दोन- दोनाला चार अश्या वेगवेगळ्या ब्रॅंडच्या दुचाकी बनवणाऱ्या कंपन्या सुरु झाल्या. नवनविन कॉन्ट्रॅक्टर उतरले. लोकांना काम मिळत गेले. स्पर्धा वाढली. दुचाकींच्या किंमती अजुनच कमी होऊ लागल्या. रस्त्यावर कुणीच चालेनासे झाले. हळुहळु चारचाकी बनवणाऱ्या कंपन्या उतरल्या. कामगार कमी पडु लागले म्हणुन दुसऱ्या नगरीतुन येऊन इथे राहु लागले. त्यांच्या राहण्याचा प्रश्न म्हणुन जंगले तुटु लागली. टेकड्या सपाट होऊ लागल्या. बकाल झोपडपट्ट्या वाढु लागल्या. सुलभ कर्ज उप्लब्ध होऊन स्वस्तात मोटर कार मिळु लागल्या. रस्ते कमी पडु लागले.

                   लवकरच सध्याचे रस्ते कमी पडतात म्हणुन नविन रस्ते बनवले गेले. सध्याचे रस्ते पुन्हा कॉंक्रीटचे बनवण्यात आले. रस्ता रुंदीकरणात बरीच झाडे कापली जाऊ लागली. रस्तेही असे की चार महीन्यात चार वेळा दुरुस्त करावे लागत. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे गाड्या लवकर खराब होऊन लोक पुन्हा नविन गाड्या घेऊ लागले.

                      इकडे झाडे कमी होऊन उष्णता भयंकर वाढली म्हणुन पर्यावरण मंत्र्यानी वृक्ष लागवडीचे काम हाती घेतले. पेपरात फोटो येऊ लागले. पुढच्या वर्षी परत त्याच खड्ड्यांत वृक्षारोपण करण्यात येऊ लागले. नद्या स्वच्छ करण्यासाठी करोडोंचे प्रोजेक्ट राबवण्यात येऊ लागले. सारे काही सुरळीत सुरु झाले. रोज या चारही मित्रांना भेटणे मुश्कील होऊन गेले. आता कधिकधीच पार्ट्या झडतात.

               आता इकडेच बघा ना. हा नगरीतला मुख्य चौक. चार दिशांना जाण्यासाठी इथुनच रस्ते फुटतात. आज यावर पोलिसांची वर्दळ दिसते आहे. सगळ्या दुचाकी आणि चारचाकी रस्त्याच्या एका कडेला अडवुन धरल्या आहेत.

हा बघा रस्ता क्रमांक एक वरुन पुर्वेकडे गाड्यांचा तांडा गेला. हा दळणवळण मंत्र्यांचा. तिकडे फार दुर नविन उड्डाणपुल बनवायचा आहे. त्याचा आज कोनशिला समारंभ.

हा बघा रस्ता क्रमांक दोन वरुन पश्चिमेकडे गाड्यांचा तांडा गेला. हा उद्योग मंत्र्यांचा. तिकडे फार दुर एक नविन कारखाना सुरु होणार आहे. त्याचे आज भुमीपुजन.

हा बघा रस्ता क्रमांक तीन वरुन उत्तरेकडे गाड्यांचा तांडा गेला. हा कामगार मंत्र्यांचा. तिकडे एक कारखान्यात चार पाच कॉन्ट्रॅक्टरच्या लेबर्समध्ये प्रोब्लेम झाला आहे. तो मिटवुन एक नविन कामगार वसाहत सुरु होणार आहे. त्याचे आज भुमीपुजन.

हा बघा रस्ता क्रमांक चार वरुन दक्षिणेकडे गाड्यांचा तांडा गेला. हा पर्यावरण मंत्र्यांचा. तिकडे फार दुर एक पर्यावरण पोषक गृहप्रकल्प सुरु होणार आहे..नेचर होम्स. त्याचे आज भुमीपुजन.
                      पोलिस आता रस्ता लगेच मोकळा करतील. चारही बाजुंनी गाड्या एकदम वेड्यावाकड्या पुढे येतील. प्रत्येकाचा अर्धा तास मोडल्यामुळे प्रत्येकाला लवकर पोहचायची घाई आहे. त्यामुळे पुन्हा वाहतुक कोंडी होणार आहे. आणि अजुन थोडावेळ तरी चित्रविचित्र हॉर्न्सच्या आवाजात मोठमोठ्या वाहनांनी सोडलेल्या काळ्या धुरात हे चित्र अदृश्य होणार आहे. प्रत्येकालाच याची सवय झाली आहे. पार्टीत काढलेला तोडगा भयंकर यशस्वी झाला आहे आणि त्या तोडग्यामुळेच या आटपाट नगरीत सारे काही सुरळीत चालु राहणार आहे.




-Yogesh Bhagwat
                      -***-

Friday, June 11, 2010

हुरहुर

         प्रेमभंग झालेली माणसे प्रेम सोडून या जगात जणू दुसरे काहीच अस्तित्वात नाही या भावनेने निदान काही दिवस तरी जगत असतात. लवकरच त्यांना त्यातला फोलपणा कळून येतो आणि ते परत भानावर येतात. परंतु 'ते' काही दिवस ते मनाने एकटेच दूरवर भटकत असतात. जुन्या आठवणींनी मध्येच त्यांच्या जखमा भळभळून येतात.

याच स्थितीचे वर्णन करणारी हि एक कविता .


हुरहुर
--------------

रानोमाळ दुर दुर
भटकतो वेडा पीर
काळजात सले त्याच्या
आठवांची हुर हुर

       ठेचाळुनी पाय कधी
       रक्ताळते भेग जुनी
       ओघळुनी थेंब थेंब
       वाहतो हा महापुर

सादळतो थेंब आणि
डागाळते वाट त्याची
पुसु पाही डाग तिथे
आसवांची भुर भुर

      प्रेम आणि प्रेमभंग
      सोडुनही आहे काही
      दिसे त्याला अजुनी ना
      डोळे जरी भिर भिर

रानोमाळ दुर दुर
भटकतो वेडा पीर
काळजात सले त्याच्या
आठवांची हुर हुर



~योगेश

Monday, June 7, 2010

कालातीत

कालातीत
--------- --------- --------- --------- ---------

              जसं खाण्यासाठी काहीही विशेष शिकवावं लागलं नाही तसं टि.व्ही पाहण्यासाठीही काही विशेष करावं लागलं नाही. अगदी लहानपणीच कमीत कमी दहा बारा जणांच्या घोळक्यात बसुन टि.व्ही. बघायला सुरुवात झाली. पुढे-मागे घरात ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट दाखल झाला. अगदी कुणालाही आवडता हिरो विचारला की फक्त अमिताभ बच्चनचं नाव घेतलं जायचं. अ‍ॅंग्री यंग मॅन व्यतिरीक्तही अजुन वेगळे बोटावर मोजण्याइतके हिरो लोकांच्या मनात होते. अगदी कुणाबरोबरही टेस्ट मॅच असली तरी सुनिल गावसकरच्या शतकाकडे डोळे लावुन बसणाऱ्यांची संख्याही तेवढीच होती. अगदी आम्हाला काहीही कळत नसताना टि.व्ही. समोर जाऊन वडीलांना गावसकरने किती रन केले हे विचारलं जायचं. गावसकर आणि कपिलदेव हे दोनच खेळाडु आम्हाला ओळखता यायचे. त्याचे कारणही तसेच होते. पामोलिव का जवाब नही..बुस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी ...किंवा दिनेश दिनेश दिनेश या सारख्या जाहीरातीतुन फक्त हे दोघेजणच दिसायचे. तीच गोष्ट अभिनेत्रींची. लक्स म्हंटलं की हेमा मालीनी किंवा श्रीदेवी हि ठरलेली होती.

               हळु हळु म्हणा किंवा लवकर म्हणा काळ बदलत गेला. ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट चा जाऊन कलरचा काळ आला. लक्स साबण लावता लावता श्रीदेवी पाठोपाठ माधुरी दिक्षीत टब मध्ये उतरली आणी तिच्यासारखीच निघुन गेली. अगदी जुही चावला , मनिषा कोईराला या सगळ्यांना दुर सारत ऐश्वर्या ही आली आणि आता ऐश्वर्या ची आंघोळ उरकायच्या आतच कटरीनाही पाण्यात उतरली. आवडता हिरो म्हणुन अमिताभ म्हणण्याचा जमाना गेला आणि खानांचा जमाना जाऊन आता शाहीद कपुर, ह्रितीक रोशन....आणि अजुनही बरेच काही पर्याय उप्लब्ध झाले. तेंडुलकरला देव मानत आमची पिढी वाढली इतकेच नाही तर त्याच्या बऱ्याचश्या खेळींची आठवण आजही ताजी आहे. मग ती शारजा मधील वादळी झंजावाती खेळी असो की अगदी अलिकडेच काढलेल्या २०० धावा असोत. तेंडुलकर पाठोपाठही नाही म्हणायला बरेच जण आले. अगदी कांबळी , जडेजा , द्रविड , गांगुली , युवराज , सेहवाग. काहीजण तर कधिच पडद्याआड गेले तर काही जण जाण्याच्या तयारीत आहेत. तेंडुलकर मात्र आजही त्याच किंवा त्याच्यापेक्षा जास्त उमेदीनेच रन्स बनवतो आहे..शतक ठोकतो आहे. विचार केला तर कळतं तोही माणुसच आहे..कधितरी त्यालाही बॅट खाली ठेवाविच लागेल.

             जर काळ त्याच्या गतीने चालतोच आहे... कालचं आज , आजचं उद्या, उद्याचं परवा जर काहीच राहत नाही तर कधि कधि वाटतं अशी कोणती गोष्ट आहे जी अजुनही टिकुन आहे. कुठली अशी गोष्ट आहे जी आजही तितकीच नवी वाटते. फार काही विचार करावा लागला नाही. माणसाची वृत्ती-प्रवृत्ती तर अजुनही तीच टिकुन आहे. काळ कितीही बदलला तरीही.. अगदी माणुस चंद्रावर पोहोचला तरीही. पण या व्यतिरीक्तही काही गोष्टी आहेत ज्या आजही तितक्याच ताज्या वाटतात.

               सुदैवाने आमच्या बालपणी आजी-आजोबांना देण्यासाठी बराच वेळ शिल्लक असायचा. व्हिडिओ गेम , केबल , किंवा ट्युशन्स यांच्या जाळ्यापासुन पिढी दुरच होती. तेव्हा पुस्तकांतुन भेटायच्या फार आधीच सर्व संत मंडळी आजोबांच्या गोष्टींमधुन भेटली होती. अगदी ज्ञानोबा, तुकोबा, मुक्ताई पासुन थेट चांगदेव, विसोबा खेचर यांच्यापर्यंत. मग ते अगदी संत गोरा कुंभाराच्या घरी कच्चे मडके -पक्के मडके तपासण्यापासुन असो किंवा संत एकनाथांच्या घरी पाणी भरणाऱ्या पांडुरंगाच्या कथेतुन असो. थोडेफार अभंग आणि रामदास स्वामींचे मनाचे श्लोकही त्यांनी आमच्याकडुन पाठ करवुन घेतले होते. पुढे पुढे फार सुंदररीत्या बनवलेल्या मराठीच्या पुस्तकातुन पद्य विभागात कायमच संताची अभंगवाणी थोडीफार वाचावयास मिळाली ..थोडीफार समजत गेली.

                आज मात्र कधी कधी जर त्या अभंगाच्या ओव्या आठवल्या तर वाढत्या अनुभवातुन अजुनच गहन अर्थ समोर येत जातो. ’नाही निर्मळ ते मन । काय करील साबण’ , ’देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या’ , ’जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले’ या म्हणण्यामागचा अर्थ थोडाफार अजुन उलगडत जातो. आणि मग यांना अभंग असे का म्हणतात हे अजुनच प्रकर्षाने जाणवायला लागतं. जे भंग होत नाही ते अभंग. या न भंगणाऱ्या ओळींंमधुन किती मोठे तत्वज्ञान या मंडळींनी आपल्यासमोर ठेवले आहे आणि ते सुद्धा आपल्या मराठी भाषेत. लोकांनी अतोनात त्रास देऊनही इतक्या सुलभतने संतानी हे तत्वज्ञान आपल्याला आपल्या भाषेत उपलब्ध करुन दिले आहे ही नक्किच आपली पुर्वपुण्याई असली पाहीजे. त्यामुळेच अगदी १२ व्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरीच काय तर हरीपाठ सुद्धा आजही बदलत्या काळात योग्य मार्ग दाखवण्याची शक्ती बाळगतो. म्हणुनच आजही जुन्या पिढीतुन आलेला दिंडीचा वारसा त्याच जोमाने सुरु आहे.


                काळ त्याच्या गतीने पुढे जातोच आहे...संदर्भ त्यांच्या गतीने बदलतच आहेत.. पण कालबाह्य न होता आजही या ओव्या..हे अभंग.. काळावर मात करुन कालातीत ठरले आहेत.


~योगेश भागवत.