Sunday, June 25, 2017

स्वरा

स्वरा
---------------

                संध्याकाळच्या धूसर उजेडात तो स्वप्नशिल्पं शेजारच्या लेडीज हॉस्टेलसमोर उभा होता. गेल्या पंचवीस एक वर्षात एवढा आतुर तो कधीच झाला नव्हता. बराच वेळ हॉस्टेल मधून आत बाहेर जाणाऱ्या मुलींना बघून तो कंटाळला. आता गेटवरचा  सिक्युरिटीदेखील त्याच्याकडे टक लावून पहायला लागला. गेटबाहेर रस्त्याकडेला दुचाक्या लावून काहीजण हॉस्टेलमधून येणाऱ्या मैत्रिणीसाठी थांबले होते तर काहीजण आपआपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत उभे होते. त्या मुलीसुद्धा मान वळवून याच्याकडे पाहून फिदीफिदी हसायला लागल्या . शेवटी धाडस एकवटून आत जायच्या तयारीत असणाऱ्या एका मुलीला त्याने गाठलंच.

" एक्स्क्यूज मी ... स्वरा राहते ना इथे?"
"ओह्ह सॉरी .. मी कालच आलेय इथे रहायला"
एवढं माफक बोलून ती मुलगी पटकन गेट मधून आत शिरली.

निराश होऊन तो दोन पावलं मागे आला आणि मग एकदम सिक्युरिटीजवळ जाऊन उभा राहिला.
"भाईसाब ..स्वरा नाम कि लडकी रहती ना है यहाँ ?"
"हमको किसीका नाम नही पता. हम तो बस अपनी ड्युटी करते है."
"वो हैं ना ..जिसके कँधेतक बाल है और इतनी लंबी है " स्वतःच्या कानाच्या उंचीएवढा हात नेवून त्याने विचारलं.
"ऐसे बताना तो मुश्किल है साब. और हम कुछ ज्यादा बताभी नही सकते. हमारी नौकरी चली जायेगी. "
थोडंसं खटटू होऊन तो पुन्हा गेटसमोर पहिल्या जागेवर येऊन उभा राहिला.

                आता तसं पाहिलं तर या गोष्टीसाठी मीच ठिणगी टाकली होती. तो कुठे कामाला जायचा माहित नाही पण कुठल्यातरी आय टी कंपनीत असावा आपला . संध्याकाळी ऑफिस सुटलं कि पटकन घरी येऊन तयार व्हायचा आणि त्याची बुलेट घेऊन चौकात आडोशाला उभा रहायचा. "बझटेक" आय टी कंपनीची बस आली की कावरा बावरा असलेला तो पटकन अलर्ट होऊन तिची वाट पहायचा. बस मधून दोघे तिघे जण उतरले कि त्यांच्या मागोमाग नाजुक पावलं टाकत ती उतरायची आणि काही कळायच्या आत रस्ता ओलांडून नाहीशी व्हायची. दूर तिचा ठिपका होईपर्यंत हा तिला पाहत रहायचा.  याचा आपला न चुकता रोजचा एकच दिनक्रम. शनिवार रविवार बिचाऱ्याला जीवावर यायचा.

                 मध्ये सलग दोन तीन दिवसांपासून तो असाच यायचा आणि बसमधून उतरताना ती दिसली नाही म्हणून खटटू होऊन जायचा. आता खोटं कशाला बोला ? मी सुद्धा नेमका त्याच बसमधून त्याच चौकात रोज उतरायचो. ती त्याच्याकडे तसं अजिबातच पाहायची नाही पण मला मात्र तो तिच्याकडे पाहताना स्पष्ट दिसायचा.

                शेवटी एक दिवस खटटू झालेला तो मला पाहवला नाही म्हणून मग मीच एका संध्याकाळी त्याच्या जवळ गेलो. कुणाला शोधतोय विचारलं तर उडवाउडवी करायला लागला.
"अरे बसमधून उतरणारी ती मुलगी ना ? तिलाच शोधतोयस ना तू ?"
".."
"अरे ताकाला जाऊन भांडं लपवलं तर कसं व्हायचं?"
त्याने फक्त माझ्याकडे पाहिलं.
"स्वरा ... तिचं नाव"
"ओह्ह .. आणि आडनाव ?"
"आधी आडनाव .. मग त्यावरून जात आणि मग त्यावरून उद्या इथे यायचं कि नाही ते ठरणार असं दिसतंय"
"नाही तसं नाही "
"बरं पण मला आडनाव वगैरे माहित नाही कारण ..मी ते कधीच विचारत नाही"
"नाही तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण ती दिसली नाही दोन तीन दिवस. "
" ऑनसाईट जाणार असं म्हणत होती ५-६ महिन्यांसाठी. बहुतेक गेली असावी यूएसला "
"ओह्ह... " आणि तो खांदे पाडून बसला ना लगेच बुलेटचा सहारा घेऊन.
"अरे काय तुम्ही आजकालची तरुण पोरं ? इतक्या लगेच नर्व्हस होता ? आणि नुसतं रोज इकडे तिला पाहून काय होत असतंय? "
"अं.. "
"अरे तिला तर तू माहीतसुद्धा नसशील"
"असं म्हणताय"
"मग काय ? अरे गाडी चालायची म्हणजे फर्स्ट गियर , सेकंड गिअर करत हळू हळू पुढे न्यावी लागते. नुसतीच न्युट्रलला ठेवून कसं चालेल ? "
"मग काय करू आता ?"
"वा आता ते सुद्धा मीच सांगायचं ?"
त्याचं तोंड इतकं पडलं ना.. मलाच राहवलं नाही.
"अरे ती कुठे राहायची माहित आहे ना ?"
"स्वप्नशिल्प जवळच्या लेडीज हॉस्टेलवर"
"गुड... मग जा तिकडे . डायरेक्ट चौकशी कर . नाव मिळव , नंबर मिळव किंवा इमेल आय डी तरी मिळव आणि शोध तिला. अजून सहा महिने थांबणार काय ?"
त्याच्या डोळ्यांत आशा चमकली आणि तो थँक यु वगैरे बोलून निघून गेला.


              नंतर कधी बसमधून उतरताना तो मला दिसला नाही . कसा दिसणार. साहेबांना नक्कीच लेडीज हॉस्टेल मधून क्लू मिळाला असणार. बहुधा नशीब फळफळलं बेट्याचं.


              पण प्रत्यक्षात झालं होतं काही वेगळंच. त्या दिवशी तो लेडीज हॉस्टेल समोर धाडस जमवून उभा राहिला तर खरा पण अजून काही बिचाऱ्याला यश आलं नव्हतं . येणाऱ्या जाणाऱ्या मुलींनी तर त्याला कोलवलाच पण सिक्युरिटीनेसुद्धा कोलवला.
आता पुन्हा त्याला एक मुलगी येताना दिसली. खांद्याला बॅग वगैरे अडकवून ती जवळ आली तशी याने तिची वाट अडवली.
"माफ करा तुम्ही गैरसमज नका करून घेऊ पण मला थोडी मदत हवीय"
"अं .. " तिला याचा गरीबासारखा चेहरा पाहून दया आली आणि अंदाज घेत ती म्हणाली " ओके "
"थँक्स हां. ते स्वरा नावाची मुलगी राहते ना इथे"
"अच्छा स्वरा , काय तिचं ?"
"तिचा काही नंबर किंवा इमेल आय डी वगैरे मिळेल काय ?"
"ओह्ह .. ते तर अवघडच दिसतंय कारण ती काही कुणाशी इतकी मिक्स नव्हती होत. आणि आय गेस २-३ दिवसांपूर्वीच गेली ती हॉस्टेल सोडून. काहीतरी बाहेर जायचं चाललं होतं तिचं  . बहुतेक मग हॉस्टेलचं भाडं कशाला भरायचं म्हणून गेली असावी आधीच.
त्याच्या सगळया आशा खळ्ळकन फुटल्या.


ती पुढे जायला निघाली आणि गेटमधून आत पाऊल टाकणार इतक्यात याला काय झालं माहित नाही पण याने विजेच्या वेगाने तिचा हात झटकन पकडला.
"प्लिज द्या ना शोधून तिचा नंबर"
आणि त्या वेळेस आजूबाजूचे बघे मंडळी , मुली , सिक्युरिटी जे धावून आले म्हणता ना ..  चांगलाच चोप बसला असणार.  खरं तर नेमकं त्यानंतर पुढे काय झालं हे मला कधी कळालंच नाही.


पुढे तर मी ती कंपनी सोडली आणि ती बस सुद्धा. हिरोचं आणि स्वराचं काय झालं काय माहित.


            त्या दिवशी असाच एका रविवारी मी आपलं सिनेमा पहायचा म्हणून तिकीट काढायच्या रांगेत उभा होतो . तर शेजारीच तो येऊन उभा राहिला आणि सोबत एक मुलगी सुद्धा. मी आपलं न बघितल्यासारखं केलं तर त्यानेच मला ओळखलं. हाय हॅल्लो करून त्या मुलीशी ओळख देखील करून दिली.


"हि रागा.. तुम्ही ते लेडीज हॉस्टेलला जायची आयडिया दिली ना. आणि तिथेच हिची गाठ पडली"
"अच्छा"
"आणि ते फर्स्ट सेकंड काही नाही .. डायरेक्ट पाचवाच गिअर पडला"
"म्हणजे काय रे? " रागाने त्याला लाडिकशा आवाजात विचारलं.
" म्हणजे काही नाही  .. स्वराला शोधत शोधत हा थेट रागापाशीच पोहचला. भल्याभल्याना गायकांना देखील नाही जमलं हो" मी आपलं पटकन एक चोरटी धाव वसूल केली आणि त्यांचं काय झालं हे न बघता सिनेमाच्या गर्दीत शिरून गेलो.


             त्यांचं पुढे चांगलंच झालं असेल पण .. तेवढं स्वराचं पुढे काय झालं ते कधी तुम्हांला कळालंच तर मला देखील कळवा.



- योगेश भागवत