Wednesday, February 25, 2015

धागा

---------------


डावा म्हणवणारा लोकनेता 

जास्तीत जास्त घ्यायचा काळजी 

अधिकाधिक डावं दिसण्याची 

बंद , आंदोलन , असहकार 

नाही बोलला तो पुन्हा पुन्हा 

तर लोकांनाच वाटायचं

काहीतरी चुकल्यासारखं 


आणि एक दुसऱ्या टोकाचा प्रतिनिधी 

ज्याला चिकटलं बिरुद उजव्या बाजूचं 

पुन्हा पुन्हा केलं जायचं अधोरेखित 

त्याच्या बोलण्यातील काही निवडक संदर्भ 

त्याला अधिकाधिक उजवं ठरविणारे 


एक धागा मात्र 

कायम त्या दोघांमध्ये समान 


हातात आरसा घेवून 

यांच्या आजूबाजूस कुणी दिसलं 

तर त्वरित मागे खेचायचा हा धागा 


कारण त्याला भीती सतत 

या आरश्याची 

ज्यात प्रतिमा जरी राहते तीच 

तरी क्षणात होतं 

डाव्याचं उजवं 

आणि उजव्याचं डावं 



योगेश

Monday, February 2, 2015

नशा



मोहक अदा , मन झाले फिदा 
भिरभिरतो श्वास तुजभोवती सदा 
बांधुनी चाळ , फुलांची माळ 
मज वेड लाविते काय ही नशा

पदराचा रंग अजून खुलतो , 
वाऱ्यास ही ना हाती लागतो
नाद मंजुळ करीत कंकण , 
हृदयास माझ्या साद घालतो 
थिरकतो ताल , आरक्त गाल
भिरभिरतो श्वास तुजभोवती सदा
बांधुनी चाळ , फुलांची माळ 
मज वेड लाविते काय ही नशा

पाउले ना जरा ठहरती 
विजांचे कल्लोळ उमलती 
रुणझुण घुंगुर मिळून सारे
जणू माझेच गीत बोलती 
एक अंगार , ल्याला शृंगार 
भिरभिरतो श्वास तुजभोवती सदा
बांधुनी चाळ , फुलांची माळ 
मज वेड लाविते काय ही नशा

        

                                                                                       - योगेश