Sunday, November 28, 2010

खजिना (भाग ३) -बादशहा

      कुमारने शाळेतले शिक्षण पुर्ण करुन तिथेच एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. शेवटच्या वर्षी शिकत असतानाच निशा त्याच्या आयुष्यात आली आणि तीच्या प्रेमात तो पुढे पुढे इतका भरकटला की त्याने होते नव्हते ते सर्व पैसे तीच्यापाई खर्च केले होते. त्यात त्याच्या संगती सर्व खालच्या थरातल्या लोकांशी होत्या. त्यांच्या नादाने ईझी मनीच्या मागे लागुन त्याने कर्ज काढुन सट्टा, जुगार , रेस, शेअर सगळ्यात पैसा घातला होता. शेवटी सगळे काही संपल्यावर त्याचा एके काळचा जानी दोस्त..या धंद्यातला बादशहा अचानक त्याच्या घरी आला.

"कुमार सेठ आजकल आप आतेच नही अड्डेपे."
"जरा वेळ नाही मिळत"
"अब तुम पैचानबी भुलने लगे. फोनबी उचलत नाही आमचा."
"मला आता ईटरेस्ट नाही जुगारात."
"ईंटरेस्ट नाही..नाही तर नाही. ये गलतंच काम है. आप खुषाल छोडो. पर जुगारमे मेरा हारा हुआ और बहुत ऐश्बाजी के लिये लिया हुआ एक एक पैसा वापस कर दो भाई."
      कुमारने स्पष्ट नकार दिला पण बादशहा असा थोडीच एकतोय. त्याने सुरीचं धारधार पातं जेव्हा कुमारच्या नरड्यावर टेकवलं तेव्हा त्याला सर्व काही मान्य करणं भागच होतं. त्या दिवसापासुन बादशहा त्याच्या मागे हात धुवुन लागला. त्याने दिलेल्या मुदतीचा एक महीना तर बघता बघता संपला आणि फक्त दोनंच महीने शिल्लक राहीले. त्या दिवशी कुमार काहीच मार्ग नाही म्हणुन हतबल झाला होता आणि निशा त्याला पुन्हा पुन्हा विचारत होती.

" कुमार तु काय करायचे ठरवले आहेस? " निशाने त्याची सिगारेट त्याच्या हातातुन काढुन घेत विचारलं.
"काय करुन मी आता तुच सांग? कुठलाच पर्याय उरलेला दिसत नाही." कुमार वैतागला होता.
"असं करुन कसं चालेल? त्यातुन बाहेर निघायला नको का?"
"अगं सत्तर लाखांची रक्कम आहे. माझ्यासारख्या काही न करणाऱ्या माणसाने कुठुन आणायचे इतके?" वैतागुन त्याने तेव्हा संभाषण बंद करायचा प्रयत्न केला होता.
"मी एक सुचवु का? बघ तुला पटलं तर"
"काय म्हणनं आहे? सांगुन टाक"
"बघ..मागे एकदा तुच सांगीतलं होतस मला. तुझी तुमच्या गावी बरीच ईस्टेट आहे म्हणे. त्यातली थोडीफार विकली तर?"
कुमारचे डोळे चमकले, " पण सत्तर लाख उभे राहणे मुश्कील आहे. इतकी किंमत तर नक्कीच नसेल."
"जेवढे मिळतील तेवढे देऊ..बाकीचे द्सरे कुठुन तरी उभे करता येतील.
"हं..बादशहाच्या तोंडात निदान तेवढं हाडुक तरी कोंबु. पुढचं पुढे बघता येईल.

क्रमशः
(पुढील भाग - नकार)

Thursday, November 25, 2010

खजिना (भाग २) - गावी येण्यामागचे कारण

        वाड्याची जागा आणि त्या वाड्याला चिकटुन असलेला जमिन जुमला यावर स्वतःचा काहीच हक्क नाही हे अजुन कुमारला माहीतच नव्हतं. थोडे दिवस म्हातारीच्या पुढे पुढे केल्यावर ती विरघळेल..तीला तरी त्याच्याशिवाय कोण आहे हे निशाने त्याला पुन्हा पुन्हा पटवुन दिल्यावरच त्याने गावचा मार्ग धरला होता. तसं पाहीलं तर त्याला गावी परत आणन्यासाठी निर्मलाबाईंनी आजपर्यंत दिलेली मोकळीकच कारणीभुत ठरली होती.

        कुमारने तळघरातल्या खोलीपर्यंत पुन्हा एक चक्कर मारली. त्याला निवांत बसवत नव्हतं. ती खोली त्याला सारखी खुणावत होती. तो अनिच्छेनेच पुन्हा पडवीत येवुन वाडा न्याहाळत बसला. निर्मलाबाईंचा वाडा तसा साधा पण भल्यापैकी मोठा होता. काळ्याभोर दगडांत केलेलं ते बांधकाम होतं. अंदाजे पन्नास साठ वर्षापुर्वीचा वाडा आता बराचसा झिजला होता. मध्ये मध्ये थोडा ढासळायलासुद्धा लागला होता. जमेल तशी निर्मलाबाई आणि बापट स्वतःच्या देखरेखीखाली त्याची डागडुजी करुन घ्यायचे. आता खाली मोठं तळघर आणि तळघरातुन वरच्या खोलीपर्यंत थेट पहिल्या मजल्यापर्यंत दगडी जिना होता. पहिल्या मजल्यावरच्या खोल्या बंदच असायच्या. निर्मलाबाईंना म्हातारपणात जीना चढवायचा नाही त्यामुळे त्या तिथच खालच्या एका खोलीत रहायच्या.

        संध्याकाळचे चार वाजले तरी निशाचा पत्ता नव्हता. कुमारही बसुन बसुन कंटाळला होता. त्याला काही दिवसांपुर्वीच्याच घटना किती वेगात घडल्या त्या आठवू लागल्या.
" कुमार तु काय करायचे ठरवले आहेस? " निशाने त्याची सिगारेट त्याच्या हातातुन काढुन घेत विचारलं.
"काय करुन मी आता तुच सांग? कुठलाच पर्याय उरलेला दिसत नाही." कुमार वैतागला होता.
"असं करुन कसं चालेल? त्यातुन बाहेर निघायला नको का?"
"अगं सत्तर लाखांची रक्कम आहे. माझ्यासारख्या काही न करणाऱ्या माणसाने कुठुन आणायचे इतके?" वैतागुन त्याने तेव्हा संभाषण बंद करायचा प्रयत्न केला होता.

क्रमशः
(पुढील भाग - बादशहा)

Monday, November 22, 2010

खजिना (भाग १) - गावी आगमन

         कुमारला स्वतःच्या गावी आजीकडे इतक्या तातडीने यावे लागेल असे कधीच वाटले नव्हते. त्याला त्याच्या आजीने लहानपणापासूनच घरापासुन दुर हॉस्टेलमध्ये ठेवले होते. तो लहान असतानाच त्याचे वडील वारले आणि त्याची आई त्याला निर्मलाबाईंकडे सोडून निघुन गेली. निर्मलाबाईंनी त्यानंतरच्या आयुष्यात कधी तीचे नाव सुद्धा काढले नाही की कुमारला सुद्धा कधी त्याची गरज भासली नाही. उडाणटप्पु रंगेल आयुष्यात त्याला निर्मलाबाईंचीच आठवण यायला वेळ मिळायचा नाही तिथे कधीच माया न दिलेल्या आईची काय कथा.

         कुमार आज एकटाच निर्मलाबाईंच्या सोबत होता. निशा संध्याकाळपर्यंत येणार असल्यामुळे त्याचा रिकामा वेळ त्याला खायला उठला होता. निर्मलाबाईंचाही अजुन तसा काही विशेष त्रास नव्हता. दुपारचे जेवण वगैरे आटपुन, भांडी विसळुन गडी केव्हाचाच निघुन गेला होता. कुमार गावी यायच्या आधीपर्यंत हा गडीच चोवीस तास बाईंच्या सोबत असायचा. औषधांच्या, जेवणाच्या , फिरायच्या सगळ्या वेळा तो चोख सांभाळून स्वयंपाक पाणी याकडे लक्ष पुरवायचा. पण कुमार आल्यापासुन त्याने गड्याचे काम फक्त स्वयंपाकघर आणि घरातल्या इतर कामापुरतेच मर्यादीत ठेवुन बाईंची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली होती. हा मुलगा अचानक शहरातुन येतो काय? आजीशी इतका प्रेमळ वागतो काय? निर्मलाबाईंसाठी सारेच एक कोडे होते. निर्मलाबाईंनी तसा गेल्या काही दिवसात त्याला काहीच जाणवु न देता विचारण्याचा प्रयत्न केला होता पण कुमारने थातुरमातुर उत्तरे देऊन त्यांना गप्प केलं होतं.

         बापट वकीलांकडुनच त्यांना थोडाफार सुगावा लागला होता. कुमारच्या येण्यामागचं कारणही अचानक उफाळलेली माया नसुन त्याचा कुठलातरी डाव आहे हे त्यांना पुरतं कळुन चुकलं होतं. बापट वकील हे बाईंच्या अतीशय जवळ्चे आणि त्यासुद्धा सर्व निर्णय त्यांना विचारुनच घेत असत. बापट घरी येताच थेट बाईंच्या खोलीत जात. त्या दिवशी सुद्धा नेहमीप्रमाणे ते त्यांना भेटले होते.

" का रे बापटा...सगळ काही ठीक ना?"
"सगळं काही ठीक चाललय बाई"
"तो कुमार परत का आलाय आता या म्हातारीकडे? शहराची हाव सुटली की काय?"
"काही कल्पना नाही तरीपण एक सांगेन सांगेन म्हणता राहुनच गेलं"
"मग सांगुन टाक आता"
"कुमार वाड्यात आला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच मला भेटला होता. वाड्यासकट थोडीफार जमिन आहे ती विकुन किती पैसे सुटतील हे विचारत होता".
"छान..खाणच चुकली म्हणायची. यांचा तरी काय दोष म्हणा? पण माझ्या हयातीतच यांच्या योजना सुरु झाल्या बापट"
" हो ना. मलाही तसाच संशय आला आपला म्हणुनच तुम्ही मागच्या वर्षी सगळी प्रॉपर्टी ट्र्स्टच्या नावे केलीत हे मी अजुन त्याला सांगीतलच नाहीये. "

"हे एक बरं केलत. चला जाऊ द्या...आपलच पोरगं आहे. त्याला जर वाटलच बसुन खावं तर खाऊ द्यात..पण विकुन पैसा करायचा प्रयत्न केला तर मृत्युपत्रात ठरल्याप्रमाणे त्याला ती विकु न देणे आणि सर्व प्रॉपर्टी रीतसर ताब्यात घेणे हे तुमचे काम तुम्हीच नीट करा. त्याच्या आजोबांनी पुंजी न पुंजी जमा करुन बांधलाय हो हा वाडा...हा असा फुकाफुकी विकु नाही देणार मी.." बोलता बोलताच त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. 


क्रमशः
(पुढील भाग - गावी येण्यामागचे कारण)

Thursday, November 11, 2010