Tuesday, July 27, 2010

लिजा रे.

लिजा रे.
-------------

        साधारण ९६-९७ च्या आसपासचा काळ. पिवळसर तपकिरी पसरलेलं वाळवंट...तेथील घरांचे 
अर्धवट अवशेष समोर दिसू लागतात. त्या वाळवंटातच राजस्थानी पेहरावात बसलेले वादक वादन सुरु 
करतात आणि उस्ताद नुसरत फतेह आली खान यांचे सुफी सूर त्या पार्श्वभूमीवर ऐकू येऊ लागतात. 
जसजसं गाणं पुढे सरकू लागतं तेव्हा परी किंवा अप्सरा यांच्या वाचलेल्या वर्णनासारखीच सुंदर स्त्री त्या  
वाळवंटात चालताना दिसू लागते. डोक्यावर बांधलेल्या लाल कपड्यात केस आणि अर्धं कपाळ झाकलेले , 
अंगाभोवती लपेटलेली लाल-पिवळी साडी आणि दूरवर वाऱ्यावर उडणारा तिचा पदर. आणि मग तिच्या 
सौंदर्याला साजेसंच ..जणू फक्त तिच्याचसाठी लिहिलेलं गाणं सुरु राहतं......   

हुस्न ए जाना कि तारीफ मुमकिन नही  
आफरीन्  आफरीन् , आफरीन्  आफरीन् 
तू भी देखे अगर तो कहे हमनशीन्  
आफरीन्  आफरीन् , आफरीन्  आफरीन्
  
ऐसा देखा नही खुबसुरत कोई
जिस्म जैसे अजंता कि मुरत कोई 
जिस्म जैसे निगाहो पे जादू कोई
जिस्म नगमा कोई, जिस्म खुशबू कोई 
जिस्म जैसे मचलती हुई रागनी 
जिस्म जैसे मेहेकती हुई चांदनी                    
जिस्म जैसे के खिलता हुआ इक चमन  
जिस्म जैसे के सूरज कि पेहली किरन  
जिस्म तरशा हुआ दिल -कश ओ दिल -नशीन्                    
संदली संदली , मरमरी मरमरी                    
आफरीन्  आफरीन् , आफरीन्  आफरीन् 
 
         नंतर हळूहळू कळालं कि हि 'लिजा रे'. आणि त्या काळापासून तिची जी छबी मनावर कोरली 
गेली ती अजूनही तशीच आहे. बहुधा बरेचजण या मताशी सहमत असतीलच किंवा अजिबातच असणार 
नाही. तो मुद्दा निराळा. पण देहाचे इतके सुंदर वर्णन करणारे दुसरे एखादे गाणे निदान आता तरी मला 
आठवत नाही.
 
        अलीकडेच असंच कुठे तरी वाचनात आलं कि लिजा रे हि सध्या कधीही बऱ्या न होणाऱ्या एका 
दुर्धर अशा कॅन्सरशी झगडत आहे. वाचून फार मोठा धक्काच बसला. वास्तविक आपला आणि तिचा 
दूरदूर संबध नाही आणि कधी येण्याचाही प्रश्न नाही. तरीही धक्का बसलाच. पुढे त्या बातमीत अजूनही 
थोडंफार लिहिलेलं होत. तिचा आजार निदान झाल्यावरचा कठीण काळ , उपचार, त्याच्या वेदना, कुरूप 
झाल्याचे दुःख , पूर्णतः गळालेले केस..
तिचा असा चेहरा प्रयत्न करूनही समोर येईनाच. 
 
         खरंच कसं वाटलं असेल तिला? एकेकाळी इतके सुंदर जोपासलेले शरीर ,त्यासाठी घ्यावे 
लागलेले कष्ट , सुंदर राहण्यासाठी केलेला आटापिटा , सौंदर्याचे सगळीकडे होणारे कौतुक...हे सगळं 
तिला नक्कीच आठवलं असेल. आणि आता..क्षणाक्षणाला विद्रूप करत मारणारा आजार , अश्या वेळी 
दूर जाणारे - संबध टाळणारे लोक , ज्या दुनियेत अधिराज्य गाजवलं तिथे आता बंद झालेले दरवाजे. 
अवघड आहे. क्षणाक्षणाला आपणही मारत आहोतच पण सुख-दुःखाच्या , काम - क्रोधाच्या , राग - 
लोभाच्या द्वंद्वात आपण इतके खोलवर पूर्णपणे अडकलो असतो कि असा कुठलाही क्षण येईपर्यंत आपण 
सुद्धा मरणार हा विचारच कधी मनात येत नाही. आपणही मरणारच आहोत हे कळायला अश्या क्षणांची 
वाट का पहावी लागते? लिजा रे तरुणपणीच मरणार म्हणून मीही हळहळ व्यक्त करणार आणि तीही 
अशा थाटात कि जणू मी अमरच आहे.

        आपल्याला जर काही चांगली गोष्ट मिळाली तर आपण कधीच म्हणणार नाही कि फक्त मलाच 
का मिळाली. दोन वेळच्या अन्नासाठी लोक महाग असताना मला इतका भरपूर पैसा का दिलास ? 
बेरोजगार होऊनही लोक भटकत असताना मलाच नोकरी का दिलीस ? असं हे यश, सुख मिळालंच तर 
ते मीच मिळवलेलं आहे , माझ्या कष्टानेच मिळवलेलं आहे असा समज नकळतच होत जातो. आणि 
अशी काही अडचण समोर उभी राहिली कि मग मात्र आपण विचारतो...रडतो.. हा आजार मलाच का 
दिलास ? माझी काहीच चूक नसताना अपघात होऊन मीच अपंग का झालो ? साखळी सुरुच राहते.

        सहजच उत्सुकता म्हणून youtube वर लिजा रेच्या  कॅन्सर निदान झाल्यानंतरच्या क्लिप्स 
शोधल्या. पूर्ण टक्कल आणि आता थोडे थोडे उगवलेले केस अशा स्थितीतही ती फार सुंदर दिसत होती.
 तिच्या चेहऱ्यावर तेच हसणं दिसलं आणि वाटलं आपण उगीचच बाऊ करतो मृत्यूचा आणि त्याच्या 
परिणामांचा. शेवटी येणारा जाणारच आणि मागे काहीच उरणार नाही. मुळात हि योजनाच अशी आहे. 
त्यामुळे आपणही असंच चेहऱ्यावर स्मित ठेवून प्रवास करायला हवा. तुमच्या आमच्यासारखीच देहा 
मांसाची काही माणसे कर्मयोग, भक्तियोग , ज्ञानयोग अंगी भिनवत जगली..आणि त्यामुळेच येणाऱ्या 
सुखात आणि दुःखात तशीच समबुद्धी कायम ठेवू शकली. म्हणूनच या सर्वांना संत म्हणले जाते आणि 
त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवण्यासाठी आपल्याला पदोपदी प्रवृत्त केले जाते. 
 
         शेवटी आपले मार्ग जरी अनेक असले आणि आपल्या गाड्या जरी वेगवेगळ्या वेगात जात 
असल्या तरी आपल्या सर्वांचा प्रवास एकाच निश्चित ठिकाणी चालला आहे...एकाच निश्चित ठिकाणी 
संपणार आहे. कुणाचा आधी ..कुणाचा नंतर. याकडे दुर्लक्ष करून आहे तसच जगत जाणं फारच सोप्पं 
आहे ..पण मान्य करून जगण्याचा चांगला प्रयत्न करत जाणं फारच अवघड आहे. 
 
मग ??? प्रयत्न करून बघायचा ना !!!    

~योगेश

Friday, July 23, 2010

रंग

मावळतीचे आकाश केशरी , केशरमय झाले
आकाशाच्या रंगपटावर , सप्त धनुही  अवतरले

बर्फाच्छादित शिखरेही हा , रंग साठवीत होती
गिरीराजाच्या खांद्यावरती , निर्झर झुलवीत होती

नभातली हि मुक्त उधळण , धरणी पाहत होती
कोसळणाऱ्या निर्झरासही ती , कवेत घेत होती

मावळतीचा हा नूर पाहुनी , पाखरे परतत होती
घरट्यात जाउनी पिलांस , अपुल्या बिलगत होती

एक अनामिक सुगंध , वाऱ्यावर पसरत होता
शिणलेल्या झाडांच्याही , पापण्या मिटवित होता

दूर तेथुनी त्यावेळी मी , काचपेटीत बंद होतो
बंद असूनही त्या चित्रातला , मी ही एक रंग होतो

~योगेश

Monday, July 19, 2010

शिकवण

शिकवण
---------------------------------------

               सकाळीच ऑफिसला येण्यासाठी बस पकडली आणि योगायोगाने बसायला जागाही लगेच मिळाली. अवघा दहा पंधरा मिनिटांचाच प्रवास करायचा होता आणि डोक्यात कुठला विचारही चालू नव्हता. अशा वेळी नेहमी करतो त्याच प्रमाणे खिडकीतून बाहेर काय सुरु आहे हे बघायला सुरवात केली. पाउस अगदी खोबर किसाव तसा पडत होता. म्हणजे थेंब जमिनीवर येण्याआधीच वरच्यावर फुटून हवेतच विखुरला जात होता. त्याच वेळी रस्त्याच्या कडेला एक रिक्षा उभी केलेली दिसली. रिक्षावाला रिक्षाच्या मागे जावून हातातल्या फडक्याने रिक्षा पुसत होता. वास्तविक हे अगदी स्वाभाविक आणि रोज नजरेस पडणार चित्र असलं तरी जे काही मला दोन क्षणात दिसलं ते नक्कीच धक्कादायक होत..विचार करायला लावण्याजोग होत.

               त्या रिक्षावाल्याने एका काखेत कुबडीचा आधार घेतला होता आणि डाव्या पायाच्या पटचा लोंबणारा भाग गुडघ्याच्या वरपर्यंत दुमडून गाठ मारून ठेवलेला होता. एका पायाने पूर्ण अधू असूनही तो इतक्या गर्दीतून रिक्षा चालवतो हि नक्कीच कौतुकास्पद बाब आहे आणि आलेल्या व्यंगावर मात करून जगण्यासाठी जो संघर्ष चालू आहे त्यातून नक्कीच काहीतरी शिकण्यासारखं आहे असं मला वाटत राहिलं. आज आजूबाजूला निराश झालेले पुष्कळजण आपण पाहतो किंवा बहुतांशी आपणसुद्धा त्या निराशेचा कधी न कधी एक बळी ठरलेलो असतो. शिकूनही नोकरी न मिळाल्याने नैराश्यग्रस्त होऊन घरीच बसून राहणारे आपल्या आजूबाजूला अगदी सहज दिसतात. पण मिळेल त्या परिस्थितीत तोडगा काढून लढत लढत पुढे जाणारे फार कमी दिसतात.

               न जाणो कधी अशी वेळ अचानक आल्यावर माणूस नक्कीच खचत असेल. निराश होत असेल....अगदी जीव द्यावा असासुद्धा विचार मनात येत असेल.  याचवेळी आधार देणारा हात फार गरजेचा असतो. याच मानसिक आधारावर हळू हळू जिद्द जोम धरू लागते ...वाढते ...फुलते. मला तरी वाटत अशा कठीण परीक्षेच्या वेळी देव नक्कीच कुठल्या ना कुठल्या रुपात आधार आपल्या पुढे उभा करत असतो..पण बऱ्याच वेळा हा हातच ओळखता येत नाही. डोळ्यांवर ओढलेल्या दुखाच्या कातड्यामुळे हे हात झिडकारले जातात आणि मग आपणच आपले दुख अजूनच गहिरे करीत जातो.  

               शाळेत असताना एक धडा होता त्याची जाणीव मात्र मला प्रकर्षाने झाली. बाळू नावाचा एक विद्यार्थी अशाच कुठल्यातरी प्रसंगात आपले दोन्ही हात गमावतो पण नंतर मात्र निराश न होता पायाच्या बोटांच्या कुंचल्यात ब्रश पकडून चित्र काढायला शिकतो. ओबढधोबढ रेषांना हळू हळू आकार येऊ लागतो आणि जिद्दीच्या जोरावर तो एक चित्रकार बनतो. हि कथा असो किंवा अगदी एक पाय नसूनही निष्णात नृत्य करणारी सुधा चंद्रन असो ...  आलेल्या दुखावरही जिद्दीने मात करून पुढे लढत जाण्याची श्रीभगवत गीतेतली शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणलेल्या या उदाहरणातून हेच तर आपल्याला शिकण्यासारखे आहे.

               जगण्याचा नवनवा अर्थ कळण्यासाठी ती वेळ दरवेळी प्रत्यक्ष यावी लागतेच असे नाही तर ती आजूबाजूला घडणाऱ्या छोट्याछोट्या गोष्टींतूनही समजून घ्यावी लागते हे मात्र अगदी खरे. 

~योगेश

Thursday, July 8, 2010

दूरदेशी

दूरदेशी
------------------------

पाउस भुलवून नेई , मनास दूरदेशी
भिजुनी वाहवत जाई , तयात ते जळाशी

अभिलाषा या माझ्या , कधी साचलेल्या
शंख शिंपले मोती , पत्थरही वेचलेल्या
भिजुनी वाहवत जाती , भिडलेल्या ज्या आकाशी
पाउस भुलवून नेई , तयांस दूरदेशी ....मनास दूरदेशी

नजरा या माझ्या , कधी बोलणाऱ्या
शुभ्र रंगीत कोडी , नितळही वाचणाऱ्या
भिजुनी वाहवत जाती , थांबलेल्या ज्या फुलांशी
पाउस भुलवून नेई , तयांस दूरदेशी ....मनास दूरदेशी

~वियोग