Monday, March 16, 2015

माती

माती
--------------------

माणसाची माती
आणि मातीचा माणूस
नातं तसं जुनंच
… युगायुगांपासून एकत्र .

पाहू गेलं , तर कधी माणूस
देशावरची माती
कोरडी , काळी  दूरवर पसरलेली
कुणी खुशाल बसावं , झोपावं
झटकून टाकावं मग कपड्यावरून
कसलाही लवलेश मागे न ठेवता
पण ,
थोडी जरी ओल मिळाली
तरी बराच काळ राहते उरात
साधा पाय पडला तरीही
धरून राहते घट्ट.

उन्हाच्या झळा सोसत
होते कोरडी रुक्ष
आणि आतून तितकीच सुपीक

कधी माणूस मुरमाड , खडकाळ , रेताड.
कधी रस्त्यावर दुभाजकाच्या पायथ्याला साचलेल्या …
धुळीच्या थरासारखा दुर्लक्षित.
तर कधी कोकणातल्या लाल माती सारखा

वेगळी माती
वेगळा धर्म
वेगळं कर्म
सारच निराळं .

शेवटी माणूस असला , तरी मातीच
संपला … तरीही मातीच

 ~ योगेश