Saturday, December 18, 2010

सल्ला


                            विजय रात्रीच्या वेळी निघाला होता. गाव अजून दूर होते. झपाझप झपाझप पाऊले पडत होती ... जणू काही जमिनीवरून नुकताच कात टाकलेला साप जात होता. किर्र रात्र, आवाज केल्याशिवाय ऐकू येणार नव्हता अशी वेळ. कदाचित याचीच भीती पाउलांना होती म्हणून मध्ये मध्ये पाला पाचोळा उडवून साथीचा दिलासा स्वतालाच देत होती. विजयाला काही सुचत नव्हते कुणी तरी त्याचा पाठलाग करत aahe असे त्याला निघाल्या पासून वाटत होते. मागे वळून बघायची भीती वाटत होती, म्हणून शबनम मध्ये असलेला आरसा मध्ये मध्ये समोर घेऊन मागे कुणी आहे का हे बघायचा.
                            एवढ्या कडकाच्या थंडीत पण त्याला घाम घाम फुटला. मनाच्या कल्पनेची शक्ती शरीराच्या शक्ती पेक्षा कैक पतीने जास्त असल्याचा हाच एक पुरावा होता. तो जितका जोरात चालत होता तितकेच मन मात्र गावी पोचून कधी एकदा शरीर येते आणि ते झोपते असे झाले होते. वेळ पुढे जात होती, पाला पाचोळा पण साथ देई नासा झाला. पावला मध्ये आता मातीची ढेकळ लागत होती आणि फुटत होती. क्षण भर त्याला फाटत आहेय का फुटत आहे हेच कला नव्हते. त्याचा वेग यामुळे मंदावला. कधी पासून तो याच संधीची वाट बघत होता. विजयाला एका आवाजाचा भास झाला. त्याने आरसा उचलला आणि प्रयत्न केला मागे काही आहे का बघण्याचा..... आरशात बघितले तर मागे त्याला ओलसर काही तरी दिसले. त्याला धडकीच भरली. रडावेसे वाटत होते पण, वय आणि विजन शांतता ते होऊ देत नव्हते. त्याने रुमाल काढला आणि चेरा पुसला. आता मात्र आरशात स्पष्ट मागचे दिसायला लागले. मागे तेव्हा तरी काहीच नव्हते. रुमाल मात्र ओलाचिंब झाला होता. ढेकळ पण संपली होती. पुन्हा एकदा त्याला वेग सापडला.
                               अंधाराने आता पूर्ण काळी घोंगडी पांघरली. विजयाचा धीर सुटायला लागला. त्याने ठरवले कुठेतरी विसावा घ्यावा. तो योग्य जागेची वाट बघत जात होता. तेवढ्यात एक वटवाघूळ ओरडत जवळून गेले. ढास !!! त्याला यमदूत बघून गेल्याच भास झाला. मागे न बघतच त्याला लक्षात आता वटवाघूळ काहीतरी दिसले नि ते जमिनीवर पडले. त्याला पहिल्यांदा वटवाघूळ सरळ आडवे झालेले दिसले. आता मात्र विजयची नजर वायू वेगाने आधार शोधायला लागली. भुकेल्याला आणि भीतीला देवाने तीक्ष्ण कानांचे वरदान दिलेले असते असे म्हणतात. लांब कुठे तरी कुत्रे भून्क्लेले त्याने ऐकले आणि तो जवळ पास पळतच निघाला. त्याला कुत्राची पण भीती या वेळी छोटी वाटत होती 


                              हळू हळू कुत्र्याचा आवाज जवळ आला. या आवाजामुळे त्याला जिवंत असल्या सारखे वाटले. इतर वेळेला मार्ग बदलणारा विजय आज कुत्र्याच्या दिशेने जात असलेला बघून, कदाचित तो श्वान भुंकत नसून हसत आहे असेच नियतीला वाटले असेल. आज विजयची खात्री पटली माणूस हा प्राणीच आहे. संगत नसेल तर आयुष्याची पंचापाक्वन्नाची पंगत पण उकीरड्या सारखी वाटते. तिथे एक मंदिरासारखे दिसले. विजयाला आता त्या श्वानात साक्षात गुरु भेटल्याचा आनंद झाला नि भीती पळून गेली.
                                 तो पायऱ्या चढून मंदिराच्या आवारात गेला आणि पहुडला. पायांची यंत्रे थांबल्याने त्याचा डोळा हळू हळू लागायला लागला आणि तेवढ्यात ........... त्याला कुत्र्याची आर्त किंकाळी ऐकू आली आणि तो घाबरून उतला आणि त्या कुत्र्याच्या दिशेने पाळला पण मंदिराची शेवटची पायरी ओलांडायचे धाडस त्याच्या मध्ये नव्हते. ते कुत्रे केविळवाणे आवाज काढत मरता मरता विजय कडे बघत शेवटचे ओरडले. आता मात्र विजयाचा ताबा गेला आणि तो ढसाढसा रडायला लागला. त्या अंधाऱ्या जगात कुत्रा क्षणभर नाते निभावून गेला. विजय थरथर कापायला लागला आणि तो गाभाऱ्याच्या दिशेने पळाला. तो दार उघडणार तोच दारानेच वाऱ्याच्या मदतीने त्याला वाट दिली. तो धापा टाकत आत एका दगडावर आपटला आणि तिथे एक पाटी दिसली - ' हि जागा नियोजित दशक्रियाविधीकरता राखीव आहे. तरी याचा वापर विश्रामाकरता करू नये. ' विजयचे डोळे भिरभिरायला लागले आणि त्याला अजून एक पाटी दिसली. - 'सल्ला ऐकला असता तर .........' आणि तर शब्दातील र ची रेघ फरफटत खालपर्यंत आली होती. जणू कोणी मरणप्राय वेदनेने सांगत होते - ''सल्ला ऐकला असता तर ......... '.  त्याला त्याचा बोध झाला नाही पण त्याने तो बाधला. त्याने ठरविले कि इथून पळायचे.
                                     तो जोरात सुटला, चालत म्हणा किंवा पळत म्हणा. त्याला लहानपणापासून जेवढी स्तोत्रे येत होती तेवढी तो मोठ्याने म्हणत निघाला. पहिल्यांदा त्याला बरे वाटले, पण नंतर तो स्वताच्याच आवाजाला घाबरायला लागला. अजून अंधार गुडूप होतेच. त्याच्या वेगामुळे त्याला गावाकडे जाण्यापेक्षा जणू गावच इकडे येत येत असल्याचा भास होत होता. जसे पाय हवेत आहेत नि जमीन जोरात मागे सरकती आहे. एवढ्या वेळच्या अथक भीतीपोटी तो दमला होता शरीराने पण आणि मनाने तर जास्तच.
                                    त्या डोळ्यावर झापड होती. माणसाला जेव्हा अशी झापड येते, तेव्हा अनुभव मात्र डोळ्या समोर नंगा नाच करत असतो. त्याला कळलेच नाही तो कधी झोपला आणि त्याने डोळे उघडले तेव्हा त्यांनी बायको त्याच्या डोक्यावरची दुधाची पट्टी बदलत होती. ती म्हणाली - 'धनी एवढ्या तापत कशाला यायचे. कुठे तरी आराम करायचा'.  त्याने तापतच सगळा अनुभव तिला सांगितला पण त्या अर्धवट पाटी बद्दल तो काही नाही बोलला. राहून राहून त्याच्या नजरे समोर ''सल्ला ऐकला असता तर .........' हीच अक्षरे पुन्हा पुन्हा दिसत होती. आता बायकोला ऐकून घाम फुटला. तिने प्रेमाने धन्याला भाळी चुंबन दिले आणि  म्हणाली त्यापेक्षा माझा सकाळीच येण्याचा 'सल्ला ऐकला असता तर ..........'. आणि पुन्हा विजयाला  भोवळ आली.

============================================
Vijay Albal

Thursday, December 16, 2010

खजिना (भाग ९) - शेवट

(Please don't read if you haven't read earlier 8 parts.)


       आता फक्त खजिना शोधणं एवढच बाकी राहीलं होतं. त्याच्या मार्गातला काटा तर संपल्यातच जमा होता. तो त्या सापाला दोरीसारखं गळ्यात अडकवुन तसाच पळत जिन्याकडे आला. ही बातमी कधी एकदा निशाला सांगतो असे त्याला झालं होतं. अगदी धावतच तो जिना चढायला लागला. निशा त्याच्याकडे वेड्यासारखी बघत अगदी पहिल्याच पायरीवर उभी होती.कुमार दाणदाण जिने चढत तिच्य़ा जवळच्या पायरीपर्यंत आला आणि "धडाड........." असा मोठा आवाज शांतता उध्वस्त करत गेला. निशाला फक्त धुळीचा लोट दिसला.

       त्या खचलेल्या पायऱ्यांनीच घात केला होता. आधिच मोडकळीला आलेल्या पायऱ्यांनी त्याच्या धावत चढण्याने नेमक त्याच वेळी जीव टाकला होता. तो अवजड दगडी जिना त्याच्यासकट धाडधाड कोसळला. तो त्या दगडांखाली पुरता चिरडला गेला. तिच्या हाकेला साद न आल्यामुळे तीचं तर अवसानच गळुन पडलं. ती धुळ हळुहळु खाली बसली तसं तिच्य़ासमोरचं चित्र स्पष्ट दिसु लागलं. तिची शेवटची आशा असलेला कुमार दगडाच्या जिन्याखाली ठेचुन अस्ताव्यस्त पडला होता. ती सावकाश त्या उरलेल्या एकाच पायरीवरुन मागे फिरली. नकळतच तिची पावलं तिच्या खोलीकडे वळाली. तो छिन्न विछिन्न देह तिच्या नजरेसमोरुन जात नव्हता. टेबलवर पडलेली पर्स उघडुन तिने मोबाईल काढला. नंबर दाबुन तिने फोन कानाला लावला.

"हॅलो बादशहा...मी निशा बोलतेय"
"हॅलो मेरी जान. सब कुछ ठीक ना. इस टाईम कायको फोन किया. त्याला शक येईल ना" पलीकडुन आवाज आला.
"सगळा खेळ खल्लास झालाय...हो ..अपघातच झालाय. इतका वेळ खर्चुन आपल्याला काहीच मिळालं नाही.
अं...नाही नाही. खजिन्यापर्यंत तर पोहचलोच नाही अजुन.
काय? आजची रात्र प्रयत्न करु म्हणतोस?
पण लगेच निघ रे मग.
इथे मुर्दाघरात मी जास्त वेळ एकटी नाही राहु शकत.
नाही नाही...फक्त आजची रात्रच. उद्या सकाळी बोंबाबोंब होणार आणि मग संपलच सगळं."

"आलोच मी दोन तासात. बाय." पलीकडुन फोन कट झाला.

       निशाने फोन ठेवला. तळघरात आता कसं उतरायचं आणि तो खजिना नेमका शोधायचा तरी कुठे..हेच विचारचक्र तिच्या डोक्यात सुरु होतं. तळघरातल्या नागाची तर आता काहीच भिती उरली नव्हती. पण या नादातच तिच्य़ा पायाजवळ सळसळ करत आलेली नागिण तीला दिसलीच नाही.
मघापासुन सगळं घडलंच इतक्या अचानक होतं की........ निर्मलाबाईंनी बऱ्याच वेळापुर्वी मानवी देह सोडलाय हे ती विसरुनच गेली होती.

********************************
समाप्त

-योगेश भागवत.

Monday, December 13, 2010

खजिना (भाग ८ ) - कौल


       कुमार आता सर्व पायऱ्या उतरुन तळघरात पोहचला होता. त्याने त्याच्या हातातलं बोचकं खाली ठेवलं. निशा सुद्धा त्याच्या मागे येऊन त्याला बिलगुन उभि राहीली.तीच्य़ा छातीतली धडधड त्याला स्पष्ट ऐकु येत होती. त्या कुबड वासात जास्त वेळ थांबणं त्याला शक्य नव्हतं . त्यानं खाली वाकुन पोत्याचं तोंड सोडलं. चारही पाय आणी तोंड करकचुन बांधलेल्या मुंगुसाला त्याने बाहेर काढलं. मुंगुसाला बंधनातुन मोकळं करुन तो पुन्हा जिना चढुन वर जायला लागला. निशा तर फक्त भारल्यासारखी त्याच्या मागे चालत होती.

       कुमारने कपाळावरचा घाम एकदा निथळला आणि तो खुर्चीत बसला. एक मोठं काम केल्यानंतरचा थकवा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. निर्मलाबाईंच्या धडपडीने त्याची तंद्री अचानक तुटली आणि तो त्यांच्या खोलीकडे पळाला. निशाने तर जाणुनबुजुन तिकडे दुर्लक्ष केलं. ती तशीच बसुन राहीली. निर्मलाबाईंची शेवटची धडपड चालु होती. त्यांना श्वास घेणं सुद्धा जड झालं होतं. त्यांना तशा अवस्थेत बघुन कुमारचा द्वेष अजुनच उफाळुन आला.

"मर म्हातारे आता तु....मला प्रॉपर्टी देत नाहीस काय़? तुला काय वाटलं..मी काय हातावर हात धरुन बसेन? इथे खजिना आहे हे काय मला माहीत नाही.आता मी बघतोच इथला खजिना कसा सापडत नाही ते."
तो त्यांच्या कानाजवळ जाऊन मोठ्याने ओरडत होता. तो कसल्यातरी अनामिक शक्तीने भारल्यागत झाला होता. 

"म्हातारे माझं नुकसान करतेस होय? बघतोच आता तु कशी जगतेस ते" त्याच्या या आरडाओरड्यात निर्मलाबाईंच्या ह्रुदयाची धडपड कधी थांबली हे त्याला कळाले ही नाही. 

       जेव्हा त्या त्याचे ओरडणे ऐकायच्य़ा पलीकडे गेल्या आहेत हे त्याला कळालं तेव्हा , " निशा....... ए निशा, कौल लागला बघ. गेली एकदाची म्हातारी. आता तीचा तो थेरडा..साप बनुन बसलेला आहे ना..तो सुद्धा मरणार आता. अगदी शंभर टक्के मरणार. आता खजिना आपल्याला मिळणारच.. माझी खात्रीच आहे."

       तो धावतच तळघराकडे जाणाऱ्या जिन्याकडे पोहचला. दाणदाण पायऱ्या उतरतच तो तळघरात उतरला. अंधारातच त्याने चाचपडायला सुरवात केली. त्या भयाण अंधारात मुंगुसाचं गार शरीर त्याच्या हाताला लागलं. जराही न बिचकता तो त्याच जोमाने चाचपडत राहीला आणि त्याच्या हाताला तो गिळगिळीत स्पर्श झाला. तोच गार स्पर्श...दोन तिन दिवसांपुर्वी झालेला. पण निपचित पडलेला. कुमार तर हर्षवायुने वेडा व्हायचाच बाकी राहीला.


क्रमशः
(पुढील भाग - शेवट )

Friday, December 10, 2010

खजिना (भाग ७ ) - खजिन्याचा इतिहास


       वाड्यातल्या तळघरात त्याच्या आजोबांनी खजिना लपवला आहे अशी कुणकुण त्याने लहानपणापासुनच ऐकली होती. आजोबांनी त्यांच्या नंतरच्या काळात सावकारकी करुन बरीचसा पैसा, सोनं-नाणं जमवुन ठेवलं होतं. पण ते कुठे आहे हे कधिच कुणला सापडलं नव्हतं. शेवटी ते रहस्य आजोबांबरोबरच अचानक संपलं.

       कुमार लहान असताना त्याचे वडील तळघरात सारखं काही तरी शोधायचे हे त्याला कळायचं...पण काय शोधायचे हे त्याला कळत नव्हतं. त्याला फक्त तळघरातुन त्यांच्या गड्याने त्याच्या वडीलांचं शरीर उचलुन बाहेर आणलेलं आठवत होतं...आणि आठवत होता तो त्यांच्या तोंडातुन गळ्यावर ओघळणारा फेस.
       
        त्यांना नागाने दंश केला होता हे त्याला बराच मोठा झाल्यावर कळालं. पुढे पुढे तर त्याचे आजोबा नाग होऊन तळघरात लपलेत अशी कुणकुण सुद्धा त्याला ऐकु येऊ लागली. तो साधारण बारा-तेरा वर्षाचा असताना अशीच अजुन ऐक पाहीलेली घटना त्याच्या मनात घट्ट चिकटुन बसलेली होती. त्यांच्या गड्याचा देहसुद्धा त्याच्या वडीलांसारखाच तळघरातुन उचलुन आणला होता आणि त्याच्या तोंडातुन सुद्धा ओघळत होता तसाच फेस. तो नोकर सुद्धा खजिना शोधायचाच प्रयत्न करत होता हे त्याला आजीकडुन समजलं. तेव्हापासुन त्याने खजिन्याचं जे नाव टाकलं ते अगदी आता वाड्यात परत येईपर्यंत.

       पण आता पैश्याची अडचण तर आली होतीच आणि निशाला गप्पा-गप्पांतुन सांगितलेल्य़ा गोष्टींनी तिच्या मनावर फार विलक्षण परिणाम झाला होता. तीने त्याला तळघरात जायला एका परीने भागच पाडलं होतं. दोघे दबकत दबकत दोनच दिवसांपुर्वी आत उतरले होते. तिकडे जाऊन टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी सगळीकडे पाहणी केली होती. कुठे कुठे उकरल्याच्य़ा खुणा तशाच टिकुन होत्य़ा. कुदळ-फावडं, घमेलं सगळं सामान तिथेच अस्ताव्यस्त पडलं होतं. कुबट अंधाऱ्या खोलीत गुदमरुन मरतो की काय असं वाटत असतानाच त्याच्या पायावरुन एक थंडगार स्पर्श वळवळत गेला आणि एकच शिरशिरी त्याच्या मस्तकापर्यंत गेली. ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत तो बाहेर पळाला होता.

       आपली काही आता आत जायची छाती नाही असं त्याने निशाला निक्षुन पुन्हा पुन्हा सांगीतले होतं आणि दुसऱ्याच दिवशी तीने त्याला उपाय सुचवला होता. आज तर ती तो उपाय घेवुनच आली होती.


क्रमशः
(पुढील भाग - कौल )

Tuesday, December 7, 2010

खजिना (भाग ६) - खजिना


"आता आपल्या हातात फक्त एकच गोष्ट आहे. तळघरातला खजाना. आता त्यावरच लक्ष केंद्रीत करायला हवंय.
"अरे पण तो तरी खरा आहे का? की तो सुद्धा तुझ्या प्रॉपर्टीसारखीच हुल?" निशाचा घाव त्याच्या वर्मावर लागला.
"आता आपल्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का?" तो चिडून म्हणाला. " आपण दोघही पुरतं अडकलो आहोत..आणि आता इथे जर काही डबोलं निघालं तरच आपण वाचु शकु. थोडे पैसे एकदा हातात आले की त्या बापटाला थोडे चारुन प्रॉपर्टीचं काही करता येतं का ते सुद्धा पाहु."

थोडा वेळ तणाव तसाच टिकुन होता. शेवटी न राहवुन त्याने तिने आणलेलं बोचकं उचललं आणि तो तळघराकडे निघाला. अनिच्छेनेच निशासुद्धा त्याच्या मागे आली. बोचक्य़ातली वळवळ दोन क्षण थांबुन पुन्हा सुरु झाली. कुमार सावधपणे एक एक पायरी उतरुन तळघरात जाऊ लागला. 

"आई गं..." निशाच्य़ा तोंडून एक अस्पुट आवाज निघाला.
"का गं ? काय झालं?"
"काही नाही रे. हा तुमचा जुनाट जिना. याच्या दोन-तीन पायऱ्या खचल्यात इथे. पाय ठेवला आणि अगदी तोल गेल्यासारखच झालं. संभाळुन येत जा रे इथुन." 

तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन तो तसाच उतरत राहीला. त्याच्या डोळ्यांत फक्त खजिना चमकत होता.

क्रमशः
(पुढील भाग - खजिन्याचा इतिहास )

Saturday, December 4, 2010

खजिना (भाग ५) - निराशा



      त्यांच्या या वाक्याने कुमारला तर डोक्य़ावर कुऱ्हाडंच कोसळल्यासारखं झालं. तो काही प्रतिक्रिया देणार इतक्यात निशाचा आवाज त्याच्या कानावर पडला. आता फक्त तीच एक या जखमेवर फुंकर मारु शकेल या आशेने तो बाहेर आला. तो बाहेर जाताच निर्मलाबाई खिडकीतुन बाहेर पाहू लागल्या.अचानक त्यांना खोकल्याची उबळ सुरु झाली. कुमारने ऐकुनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं..

निशाच्या हातात एक छोटसंच दहा बारा किलो वजनाचं पोतं होतं. ते तीने अलगद खाली ठेवले.. त्या पोत्यातली हालचाल त्याला दुरुनसुद्धा जाणवली.

"काम झालं का?" त्याने तिथुनच तीला विचारलं
"हो". झालं शेवटी. आता बघु कोण आपल्याला रोखतं ते?"
"आत्ता कोण रोखायचं बाकी राहीलय? आपली धाव सुरु होण्याआधीच तंगडं छाटलय"
"का रे? काय झालं? सगळं प्लॅन प्रमाणे चालु आहे ना आता."
"घंटा. म्हातारीने सगळी प्रॉपर्टी ट्रस्टच्या नावे केलीय . माझ्या हातात फक्त केळं दिलय थेरडीने. "

निर्मलाबाईंची उबळ पुन्हा उफाळुन आली. खोलीतुन बाहेर येण्याचं त्राण सुद्धा त्यांच्या अंगात उरलं नव्हतं.

"काय रे. यांना काय झालय आता? " निशाने हळु आवाजात विचारलं.
"कसलं काय? म्हातारीची नाटकं चाललीत. सालीचा गळा आवळून मारु का आजच?"
"आरे तीला मारुन आता काय मिळणार आहे ? तु फक्त नावाचा वारस. आता निदान आपल्या हातात जे आहे ते तरी करुया."

      प्रॉपर्टी कुमारच्या नावावर नाही हे ऐकुन निशाचा चेहरा तर पार पडला होता पण ती मोठ्या कष्टाने त्याला ते जाणवु न देण्याचा प्रयत्न करत होती. त्याची हिंमत टिकवुन ठेवणं तीच्या दृष्टीने त्या क्षणाला फार गरजेचं होतं. तरी तीची निराशा त्याला सुद्धा जाणवलीच.

"डार्लिंग तु नाराज होऊ नकोस. हा कुमार तुझ्यासाठी काहीही करु शकतो. भरोसा आहे ना माझ्यावर?
"हं" निशा काहीच न बोलता त्याला बिलगली.
"...पण बादशहा? त्याचं काय? त्याचा भरवसा नाही वाटत रे."
बादशहाची आठवण येताच त्याचं उसनं अवसान पुन्हा गळुन पडलं. कसं तरी धाडस करुन तो पुन्हा बोलला.

क्रमशः
(पुढील भाग - खजिना )

Wednesday, December 1, 2010

खजिना (भाग ४) -नकार


      दुसरा पर्यायच समोर दिसत नसल्यामुळे प्रॉपर्टी विकायची इच्छा नसतानाही तो गावी जायला तयार झाला होता. नाहीतरी वारस म्हणुन त्याचाच हक्क आहे हे त्याल निशाने पुर्णपणे पटवुन दिलं होतं. आणि त्यामुळेच त्याला सोबत म्हणुन निशादेखील त्याच्यासोबत गावी आली होती.

      एका जागेवर बसुन बसुन त्याचे डोळे आता तारवटले होते. दुपारपर्यंत येते असे सांगुन गेलेली निशा संध्याकाळचे सहा वाजत आले तरी घरी पोहचली नव्हती. तिचा मोबाईलही आऊट ऑफ कव्हरेज होता.

"कुमार..ऐ कुमार.." निर्मलाबाईंची हाक वाड्यातली शांतता चिरत गेली. हाक ऐकुन तो अनिच्छेनेच उठला.

"काय आहे?" थोद्याश्या तुसड्या स्वरातच त्याने दार ढकलत विचारले.
"अरे..आज मला जरा बरं वाटत नाहिये. कसलीतरी भीती वाटते आहे. छातीवर दडपण आल्यासारखं वाटतंय."
"मग ?? औषध देवु का? इथेच ठेवलीत. घ्या आणि झोपा निवांत. " त्याचा धीर सुटत होता पण त्याने मोठ्या मुश्कीलीने ताबा ठेवत औषधे दिली.

मधली पाच-दहा मिनिटे शांततेत गेली. त्याने न राहवुन बरेच दिवस सलत असलेल्या प्रश्नाला हात घालायला सुरवात केली.
"आजी, आता तुला चांगल्य़ा उपचारांची गरज आहे."
"हं"
"इथे खेड्यात मुश्कील आहे. हाकेला एक डॉक्टर देखील मिळत नाही."
"हं. बरोबर बोललास"
"आपण शहरात जाऊ. म्हणजे तुला कायम देखरेखीखाली ठेवता येईल."
"आणि तिथे राहणार कुठे? तिथे काय आपलं घर आहे?"
"काही अवघड नाही बघ. इकडची प्रॉपर्टी विकुन टाकायची आणि शहरात नविन घर घ्यायचं. नाहीतरी हा वाडा जुनाट झालाय."
" मग एक काम कर. तु आला आहेस तसाच परत जा. आत्ताच्या आत्ता. मी असेपर्यंत हा पुरेल मला एकटीला..पण हा वाडा मी कुणालाही विकु देणार नाही. "

      निर्मलाबाईंचा स्पष्ट नकार त्याला अपेक्षीत होताचं. त्याने तरीही हेका न सोडता पुन्हा विचारले.
" किती दिवस पण? किती दिवस? ..तु काय वरती घेऊन जाणार आहेस का? त्यापेक्षा मला तरी पैसे मिळु दे ना सुखाने."
त्य फक्त छद्मीपणे हसल्या. " मला माहीत होतं. कधि ना कधी तु रंग दाखवणार. पण तुझं तु बघुन घे बाबा. तुला वाटत असेल की माझ्या मागे तुझा मार्ग मोकळा होईल..पण ते चुकीचं आहे. या वाड्याची मालकी ट्रस्ट च्या नावे करुन ठेवलेली आहे. तुझ्या हातात तर इकडचा एक दगड सुद्धा विकायचा अधिकार नाही ठेवलेला रे मी."

क्रमशः
(पुढील भाग - निराशा)

Sunday, November 28, 2010

खजिना (भाग ३) -बादशहा

      कुमारने शाळेतले शिक्षण पुर्ण करुन तिथेच एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. शेवटच्या वर्षी शिकत असतानाच निशा त्याच्या आयुष्यात आली आणि तीच्या प्रेमात तो पुढे पुढे इतका भरकटला की त्याने होते नव्हते ते सर्व पैसे तीच्यापाई खर्च केले होते. त्यात त्याच्या संगती सर्व खालच्या थरातल्या लोकांशी होत्या. त्यांच्या नादाने ईझी मनीच्या मागे लागुन त्याने कर्ज काढुन सट्टा, जुगार , रेस, शेअर सगळ्यात पैसा घातला होता. शेवटी सगळे काही संपल्यावर त्याचा एके काळचा जानी दोस्त..या धंद्यातला बादशहा अचानक त्याच्या घरी आला.

"कुमार सेठ आजकल आप आतेच नही अड्डेपे."
"जरा वेळ नाही मिळत"
"अब तुम पैचानबी भुलने लगे. फोनबी उचलत नाही आमचा."
"मला आता ईटरेस्ट नाही जुगारात."
"ईंटरेस्ट नाही..नाही तर नाही. ये गलतंच काम है. आप खुषाल छोडो. पर जुगारमे मेरा हारा हुआ और बहुत ऐश्बाजी के लिये लिया हुआ एक एक पैसा वापस कर दो भाई."
      कुमारने स्पष्ट नकार दिला पण बादशहा असा थोडीच एकतोय. त्याने सुरीचं धारधार पातं जेव्हा कुमारच्या नरड्यावर टेकवलं तेव्हा त्याला सर्व काही मान्य करणं भागच होतं. त्या दिवसापासुन बादशहा त्याच्या मागे हात धुवुन लागला. त्याने दिलेल्या मुदतीचा एक महीना तर बघता बघता संपला आणि फक्त दोनंच महीने शिल्लक राहीले. त्या दिवशी कुमार काहीच मार्ग नाही म्हणुन हतबल झाला होता आणि निशा त्याला पुन्हा पुन्हा विचारत होती.

" कुमार तु काय करायचे ठरवले आहेस? " निशाने त्याची सिगारेट त्याच्या हातातुन काढुन घेत विचारलं.
"काय करुन मी आता तुच सांग? कुठलाच पर्याय उरलेला दिसत नाही." कुमार वैतागला होता.
"असं करुन कसं चालेल? त्यातुन बाहेर निघायला नको का?"
"अगं सत्तर लाखांची रक्कम आहे. माझ्यासारख्या काही न करणाऱ्या माणसाने कुठुन आणायचे इतके?" वैतागुन त्याने तेव्हा संभाषण बंद करायचा प्रयत्न केला होता.
"मी एक सुचवु का? बघ तुला पटलं तर"
"काय म्हणनं आहे? सांगुन टाक"
"बघ..मागे एकदा तुच सांगीतलं होतस मला. तुझी तुमच्या गावी बरीच ईस्टेट आहे म्हणे. त्यातली थोडीफार विकली तर?"
कुमारचे डोळे चमकले, " पण सत्तर लाख उभे राहणे मुश्कील आहे. इतकी किंमत तर नक्कीच नसेल."
"जेवढे मिळतील तेवढे देऊ..बाकीचे द्सरे कुठुन तरी उभे करता येतील.
"हं..बादशहाच्या तोंडात निदान तेवढं हाडुक तरी कोंबु. पुढचं पुढे बघता येईल.

क्रमशः
(पुढील भाग - नकार)

Thursday, November 25, 2010

खजिना (भाग २) - गावी येण्यामागचे कारण

        वाड्याची जागा आणि त्या वाड्याला चिकटुन असलेला जमिन जुमला यावर स्वतःचा काहीच हक्क नाही हे अजुन कुमारला माहीतच नव्हतं. थोडे दिवस म्हातारीच्या पुढे पुढे केल्यावर ती विरघळेल..तीला तरी त्याच्याशिवाय कोण आहे हे निशाने त्याला पुन्हा पुन्हा पटवुन दिल्यावरच त्याने गावचा मार्ग धरला होता. तसं पाहीलं तर त्याला गावी परत आणन्यासाठी निर्मलाबाईंनी आजपर्यंत दिलेली मोकळीकच कारणीभुत ठरली होती.

        कुमारने तळघरातल्या खोलीपर्यंत पुन्हा एक चक्कर मारली. त्याला निवांत बसवत नव्हतं. ती खोली त्याला सारखी खुणावत होती. तो अनिच्छेनेच पुन्हा पडवीत येवुन वाडा न्याहाळत बसला. निर्मलाबाईंचा वाडा तसा साधा पण भल्यापैकी मोठा होता. काळ्याभोर दगडांत केलेलं ते बांधकाम होतं. अंदाजे पन्नास साठ वर्षापुर्वीचा वाडा आता बराचसा झिजला होता. मध्ये मध्ये थोडा ढासळायलासुद्धा लागला होता. जमेल तशी निर्मलाबाई आणि बापट स्वतःच्या देखरेखीखाली त्याची डागडुजी करुन घ्यायचे. आता खाली मोठं तळघर आणि तळघरातुन वरच्या खोलीपर्यंत थेट पहिल्या मजल्यापर्यंत दगडी जिना होता. पहिल्या मजल्यावरच्या खोल्या बंदच असायच्या. निर्मलाबाईंना म्हातारपणात जीना चढवायचा नाही त्यामुळे त्या तिथच खालच्या एका खोलीत रहायच्या.

        संध्याकाळचे चार वाजले तरी निशाचा पत्ता नव्हता. कुमारही बसुन बसुन कंटाळला होता. त्याला काही दिवसांपुर्वीच्याच घटना किती वेगात घडल्या त्या आठवू लागल्या.
" कुमार तु काय करायचे ठरवले आहेस? " निशाने त्याची सिगारेट त्याच्या हातातुन काढुन घेत विचारलं.
"काय करुन मी आता तुच सांग? कुठलाच पर्याय उरलेला दिसत नाही." कुमार वैतागला होता.
"असं करुन कसं चालेल? त्यातुन बाहेर निघायला नको का?"
"अगं सत्तर लाखांची रक्कम आहे. माझ्यासारख्या काही न करणाऱ्या माणसाने कुठुन आणायचे इतके?" वैतागुन त्याने तेव्हा संभाषण बंद करायचा प्रयत्न केला होता.

क्रमशः
(पुढील भाग - बादशहा)

Monday, November 22, 2010

खजिना (भाग १) - गावी आगमन

         कुमारला स्वतःच्या गावी आजीकडे इतक्या तातडीने यावे लागेल असे कधीच वाटले नव्हते. त्याला त्याच्या आजीने लहानपणापासूनच घरापासुन दुर हॉस्टेलमध्ये ठेवले होते. तो लहान असतानाच त्याचे वडील वारले आणि त्याची आई त्याला निर्मलाबाईंकडे सोडून निघुन गेली. निर्मलाबाईंनी त्यानंतरच्या आयुष्यात कधी तीचे नाव सुद्धा काढले नाही की कुमारला सुद्धा कधी त्याची गरज भासली नाही. उडाणटप्पु रंगेल आयुष्यात त्याला निर्मलाबाईंचीच आठवण यायला वेळ मिळायचा नाही तिथे कधीच माया न दिलेल्या आईची काय कथा.

         कुमार आज एकटाच निर्मलाबाईंच्या सोबत होता. निशा संध्याकाळपर्यंत येणार असल्यामुळे त्याचा रिकामा वेळ त्याला खायला उठला होता. निर्मलाबाईंचाही अजुन तसा काही विशेष त्रास नव्हता. दुपारचे जेवण वगैरे आटपुन, भांडी विसळुन गडी केव्हाचाच निघुन गेला होता. कुमार गावी यायच्या आधीपर्यंत हा गडीच चोवीस तास बाईंच्या सोबत असायचा. औषधांच्या, जेवणाच्या , फिरायच्या सगळ्या वेळा तो चोख सांभाळून स्वयंपाक पाणी याकडे लक्ष पुरवायचा. पण कुमार आल्यापासुन त्याने गड्याचे काम फक्त स्वयंपाकघर आणि घरातल्या इतर कामापुरतेच मर्यादीत ठेवुन बाईंची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली होती. हा मुलगा अचानक शहरातुन येतो काय? आजीशी इतका प्रेमळ वागतो काय? निर्मलाबाईंसाठी सारेच एक कोडे होते. निर्मलाबाईंनी तसा गेल्या काही दिवसात त्याला काहीच जाणवु न देता विचारण्याचा प्रयत्न केला होता पण कुमारने थातुरमातुर उत्तरे देऊन त्यांना गप्प केलं होतं.

         बापट वकीलांकडुनच त्यांना थोडाफार सुगावा लागला होता. कुमारच्या येण्यामागचं कारणही अचानक उफाळलेली माया नसुन त्याचा कुठलातरी डाव आहे हे त्यांना पुरतं कळुन चुकलं होतं. बापट वकील हे बाईंच्या अतीशय जवळ्चे आणि त्यासुद्धा सर्व निर्णय त्यांना विचारुनच घेत असत. बापट घरी येताच थेट बाईंच्या खोलीत जात. त्या दिवशी सुद्धा नेहमीप्रमाणे ते त्यांना भेटले होते.

" का रे बापटा...सगळ काही ठीक ना?"
"सगळं काही ठीक चाललय बाई"
"तो कुमार परत का आलाय आता या म्हातारीकडे? शहराची हाव सुटली की काय?"
"काही कल्पना नाही तरीपण एक सांगेन सांगेन म्हणता राहुनच गेलं"
"मग सांगुन टाक आता"
"कुमार वाड्यात आला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच मला भेटला होता. वाड्यासकट थोडीफार जमिन आहे ती विकुन किती पैसे सुटतील हे विचारत होता".
"छान..खाणच चुकली म्हणायची. यांचा तरी काय दोष म्हणा? पण माझ्या हयातीतच यांच्या योजना सुरु झाल्या बापट"
" हो ना. मलाही तसाच संशय आला आपला म्हणुनच तुम्ही मागच्या वर्षी सगळी प्रॉपर्टी ट्र्स्टच्या नावे केलीत हे मी अजुन त्याला सांगीतलच नाहीये. "

"हे एक बरं केलत. चला जाऊ द्या...आपलच पोरगं आहे. त्याला जर वाटलच बसुन खावं तर खाऊ द्यात..पण विकुन पैसा करायचा प्रयत्न केला तर मृत्युपत्रात ठरल्याप्रमाणे त्याला ती विकु न देणे आणि सर्व प्रॉपर्टी रीतसर ताब्यात घेणे हे तुमचे काम तुम्हीच नीट करा. त्याच्या आजोबांनी पुंजी न पुंजी जमा करुन बांधलाय हो हा वाडा...हा असा फुकाफुकी विकु नाही देणार मी.." बोलता बोलताच त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. 


क्रमशः
(पुढील भाग - गावी येण्यामागचे कारण)

Thursday, November 11, 2010

Thursday, October 21, 2010

अपूर्ण

        जे जे हवे ते ते वेळेवर मिळत गेल्यामुळे कुठल्याही गोष्टीची किंमत त्या त्या वेळी कळलीच नाही. पुष्कळ गोष्टींसाठी घ्यावी लागलेली मेहनत कारणीभूत असेलच पण मेहनत घेऊनही बरेच जण यश-अपयश या द्वंद्वात फसताना पहायला मिळाले. माझ्यापुढचा मार्ग मात्र नेहमीच सुकर राहिला होता. याचे मूळ कारण म्हणजे जास्त इच्छा , जास्त अपेक्षा  कधीच नव्हत्या. जे जे पुढे येईल त्याला सामोरे जात राहणे एवढ्यातूनच प्रवास सुरु होता.

        परंतु सर्व काही सुरळीत चालले , विनासायास चालले कि जे सुरु आहे त्यापेक्षा अधिक काही तरी , किंवा वेगळे काही तरी मिळवण्याची इच्छा होते. आणि मग त्या इच्छांसाठी वेगवेगळे मार्ग शोधता शोधता माणूस त्यात इतका अडकून जातो कि  नको असलेल्या गोष्टीसुद्धा त्याला कराव्या लागतात.
मला देखील एका ठराविक वळणावर असेच वाटू लागले होते. आपण दैनंदिन जीवनातल्या त्याच त्याच गोष्टी का करतो, कशासाठी करतो असे प्रश्न पडू लागले. हा जो सर्व आटापिटा चालू आहे त्याचा नक्की काय उपयोग हेही कळत नव्हते आणि आज सुद्धा पूर्ण कळाले आहे असेहि मी म्हणणार नाही. त्या दिवसांत मी भयंकर अस्वस्थ होतो. जगण्याचे प्रयोजन कळत नव्हते. आपण सुद्धा चाकोरीतील वाट चालतो आहे आणि दुसरे काही तरी करावे असे राहून राहून वाटत होते. दुसरे काही तरी..वेगळे काही तरी. प्रत्यक गोष्टीत नैराश्य पसरत होते, नकारात्मकता  वाढत होती  आणि उत्तर मात्र मिळत नव्हते. असंच एकदा नेहमीप्रमाणे मित्राशी चर्चा झाली. त्याला बोलता बोलता सहज बोलून गेलो कि या सर्वांचे उत्तर अध्यात्माशिवाय मिळणार नाही. तेव्हा त्याने मला एक साधारण कथा सांगितली होती.

        एक गिर्यारोहक नवनवीन शिखरे चढत जातो..एक चढून झाले कि दुसरे त्याहून उंच, तिसरे त्याहून उंच. त्याला एक संन्यासी विचारतो. 'तू इतकी शिखरे का चढतोस ?'
गिर्यारोहक - पहिले सर केले कि दुसरे त्याहून उंच असलेले मला खुणावते. मग वाटत हे हि सर करावे...
संन्यासी - म्हणजे तू असंतुष्ट आहेस.
गिर्यारोहक -  असेनही. तुम्ही तप करता का?
संन्यासी - हो. अनेक प्रकारची अवघड तपे सुद्धा केली आहेत. 
गिर्यारोहक - मग पहिले तप केल्यावर तुम्हाला का वाटले दुसरे एखादे करावे म्हणून?
संन्यासी - आत्मशांतीसाठी ...परमेश्वर प्राप्तीसाठी.
गिर्यारोहक - मी हि तसेच आत्मशांतीसाठी प्रयत्न करतो आहे. . आणि ज्या दिवशी वाटेल आता कुठलेच उंच शिखर राहिले नाही त्या दिवशी ती मला नक्कीच मिळेल. जसे तुम्हाला विविध तापांची शिखरे पार केल्यावर वाटणार आहे अगदी तसेच.

          यात कोण बरोबर कोण चूक हा भाग निराळा. मात्र माझ्या शंकेचे समाधान काही झाले नाही . तेव्हा शेवटी त्याने मला श्रीमद्‍भगवद्‍गीता वाचण्याचा सल्ला दिला. त्याच्या मते गीता म्हणजे संघर्ष करण्याचा उत्कृष्ट सल्ला आणि निदान त्यामुळे तरी नकारात्मकता थोडी फार कमी होईल असे त्याला वाटले. ती चर्चा तशीच हवेत विरून गेली. वेगळे काही तरी शोधणे, वेगळे काही तरी करणे या चक्रात मी अडकतच  गेलो आणि एका टप्प्यावर मात्र प्रकर्षाने जाणवायला लागले...कि आपली कोणी तरी फरफट करीत आहे. मी हे करीन मग त्यामुळे तसे होईल असे वाटत असतानाच अचानक दुसरे काही तरी घडू लागले .

         शांत बसून विचार केल्यावर मग जाणवायला लागलं कि आपल्या हातात तसं काहीच नाही. हळू हळू 'हजारो ख्वाईशे ऐसी , के हर ख्वाईश पे दम निकले' आणि या प्रत्येक इच्छेपाई होणारी फरपट कळू लागली.
इतक्यात २-३ वेगवेगळ्या व्यक्तींची संपर्क आला आणि त्यांच्याकडून गीतेविषयी पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागले. मित्राने दिलेल्या सल्ल्याला एव्हाना ४-५ वर्ष होऊन गेली होती.

                                                                                                         

                                                                                                    ----------अपूर्ण

Tuesday, September 7, 2010

चकवा

चकवा
-------------------------

काळीभोर जमीन
हिरवीगार शेते
छोटी छोटी बैठी घरे
सगळंच जाऊन पडले प्लॉट

दूरदुरून आले आणि राहिले तिथे मजूर
इमारती पूर्ण होईतोवर.
उच्चभ्रूंच्या त्या वसाहतीत ...
ते यायच्या आधीच
नांदले मजुरांचे संसार,
मिसळली गेली सिमेंट-मातीत
तीन दगडांच्या चुलीतली राख.
खांबाना बांधलेल्या झोळीत झुलणारी मुले...
आज दुसऱ्या ठिकाणी करत आहेत हेच काम.
आणि तिथे बांधलेल्या झोळीत
आता झोके घेताहेत त्यांची मुले.

आताची उच्चभ्रू वसाहत,
मजुरांचा संसार..
कि त्या आधीचे छोटे गाव
काय जास्त चांगलं होतं?
विचार करूनही नाही सुचत भरभर.

संसाराची गरज तर सर्वांची सारखीच असेल ना?
आणि परिपुर्णता...
ती तरी कधी कुणाची झाली?
बहुधा काही परिपुर्ण नाही..
म्हणूनच तर परिवर्तन...
क्षणा क्षणाला ... मना मनाला

टाळू म्हंटलं ...
तरीही टाळता न येणारं हे परिवर्तन.
आपणही याचाच एक भाग असलो,
तरी ते.. न जाणवू देणारं हे परिवर्तन.
आणि नाही म्हंटलं...
तरीही चकव्यासारखं  फिरून फिरून..
पुन्हा तिथेच आणणारं...
हेच परिवर्तन.


~योगेश

Thursday, August 19, 2010

जाग

जाग
==============================
वृक्षजन्माचा प्रवास , डोळ्यांदेखत सायास ||१||
चिमटीने खुडीला देठ ,  झाला विशाल तो वट ||२||
नाजुकशी होती काया, अता देई अम्हा छाया ||३||
ऐसा घडुनी यावा योग , दृष्टांताने यावी जाग ||४||

Thursday, August 12, 2010

मुखी आळवूया विठ्ठल

(सर्व संतांची क्षमा मागून मित्रासोबत झालेल्या चर्चेत सुचलेल्या ओळी मांडल्या आहेत)


मुखी आळवूया विठ्ठल

हरिनामाचा झेंडा घेवूनी हाती , मुखी आळवूया विठ्ठल
चराचरी जो वसला येथे , जाणू मिळोनिया विठ्ठल  ||धृ ||

शब्दा मिळवूनी शब्द , जुळुनी यावा भाव अंगी
टाळा भिडवूनी टाळ , रंगुनी जावे पांडुरंगी
हरीचे कीर्तन श्रवण करोनी , मुखी आळवूया विठ्ठल ||१||
चराचरी जो वसला येथे , जाणू मिळोनिया विठ्ठल

पाउल जुळवुनी पाउल , चालुनी जाऊ वाट मोठी
संतांची वाणी गाऊन , अभंग खेळवू ओठी
धुलीसम राहुनी तेथे चरणी , मुखी आळवूया विठ्ठल ||२||
चराचरी जो वसला येथे , जाणू मिळोनिया विठ्ठल

आप पर भाव जावो निघोनी , दिसो तुझ्यातला विठ्ठल
सगुण निर्गुण म्हणती जयाला , कळू दे अम्हांस तो विठ्ठल
तोवर चरणी मिठी मारोनी ,  मुखी आळवूया विठ्ठल ||३||
चराचरी जो वसला येथे , जाणू मिळोनिया विठ्ठल



~योगेश

शेवटी तुकोबांच्या म्हणण्याप्रमाणे

बोलिली लेकुरे , वेडी वाकुडी उत्तरे ||
क्षमा करा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध||
नाही विचारिला , अधिकार मी आपुला ||
तुका म्हणे ज्ञानेश्वरा , राख पायापैं किंकरा ||    

Tuesday, August 3, 2010

ऑडिशन

लवकर येतो म्हणूनही तो काल उशिराच आला...
त्याची वाट बघण्यातच झालेलं जागरण...
डोळ्यांखाली काळी वर्तुळही झालीत ...
हि गर्दी अजूनही ढिम्मच...

पियुला सकाळीच कसबसं  तयार केलंय
ऐकताच नव्हती अगदी
दोन फटकेही द्यावे लागले
फारच रडत होती............
हल्ली शाळेत जाताना फारच दंगा करते
...लहान आहे अजून
होईल शांत हळूहळू
पण ......तोपर्यंत माझं काय?

सकाळी सकाळी त्याचं आवरून द्यायचं
शेवटी घाई झालीच ना...
इथे तर एवढी गर्दी जमलीय
हि ऑडिशन तरी व्यवस्थित व्हायला हवी
हि जाहिरात मिळायलाच हवी

ती तर फारच भाव खातेय
खाणारच म्हणा
अलीकडे फारच  चलती आहे तिची
पाच सहा वर्षांपूर्वी माझ्यापुढे उभी सुद्धा नसती राहिली
गर्दी काहीच कमी होत नाहीये अजून
हल्ली जी उठते ती मॉडेल व्हायला येते.


फारच उशीर झालाय आता
घाई गडबडीत काही खाल्लेलसुद्धा नाही सकाळी
पियुची शाळेतून यायची वेळ सुद्धा होत आलीये
..माझी ऑडिशन आज चांगली व्हायलाच हवी

घड्याळ काही थांबत नाही
ती आली असेल शाळेतून
काकूंना सांगितलंय
आजच्या दिवस तेवढं ठेवा तिला
त्यांनाही त्रास होतोय
पाळणाघराशिवाय पर्याय नाही
..हो.त्याला आवडत नसलं तरीही

येईलच आता माझा नंबर
एकदा फोने करावा का तिला

.....
........
छे..फारच रडते आहे.
सांगूनही काही ऐकत नाही.
'तू लवकर घरी ये' एवढंच म्हणतेय.
काकुनांही फारच त्रास....

शेवटी ज्याची भीती होती तेच झालं.
चेहऱ्यावर एक्स्प्रेशंस  येत नाहीत  म्हणे
मला तर जगणंच नको झालंय
नुसतंच अडकून पडले आहे
आता निदान घरी तरी लवकर जायला हवं.
जाहिरात काय??? तिलाच मिळणार.


लिफ्टसुद्धा नेमकी आजच बंद
काकू प्लीज दरवाजा उघडा लवकर
'पियू पियू...बाळा काय झालं?
आता आलेना मी....रडायचं नाही.
गालपण बघ किती लाल झालेत.
रडू नको बाळा ....
आता कध्धी कध्धी नाही जाणार हां तुला सोडून'

आणि बाळाच्या इवल्या मिठीत
तिच्या डोळ्यांचा बांध कधी फुटला
तिचं तिलाच कळालं नाही
अपयश , इर्षा , चिडचिड ..सगळ वाहून चाललं  होत
तिथे उरली होती फक्त एक आई .......
आपल्या बाळाच्या मिठीत.


************
 योगेश

Tuesday, July 27, 2010

लिजा रे.

लिजा रे.
-------------

        साधारण ९६-९७ च्या आसपासचा काळ. पिवळसर तपकिरी पसरलेलं वाळवंट...तेथील घरांचे 
अर्धवट अवशेष समोर दिसू लागतात. त्या वाळवंटातच राजस्थानी पेहरावात बसलेले वादक वादन सुरु 
करतात आणि उस्ताद नुसरत फतेह आली खान यांचे सुफी सूर त्या पार्श्वभूमीवर ऐकू येऊ लागतात. 
जसजसं गाणं पुढे सरकू लागतं तेव्हा परी किंवा अप्सरा यांच्या वाचलेल्या वर्णनासारखीच सुंदर स्त्री त्या  
वाळवंटात चालताना दिसू लागते. डोक्यावर बांधलेल्या लाल कपड्यात केस आणि अर्धं कपाळ झाकलेले , 
अंगाभोवती लपेटलेली लाल-पिवळी साडी आणि दूरवर वाऱ्यावर उडणारा तिचा पदर. आणि मग तिच्या 
सौंदर्याला साजेसंच ..जणू फक्त तिच्याचसाठी लिहिलेलं गाणं सुरु राहतं......   

हुस्न ए जाना कि तारीफ मुमकिन नही  
आफरीन्  आफरीन् , आफरीन्  आफरीन् 
तू भी देखे अगर तो कहे हमनशीन्  
आफरीन्  आफरीन् , आफरीन्  आफरीन्
  
ऐसा देखा नही खुबसुरत कोई
जिस्म जैसे अजंता कि मुरत कोई 
जिस्म जैसे निगाहो पे जादू कोई
जिस्म नगमा कोई, जिस्म खुशबू कोई 
जिस्म जैसे मचलती हुई रागनी 
जिस्म जैसे मेहेकती हुई चांदनी                    
जिस्म जैसे के खिलता हुआ इक चमन  
जिस्म जैसे के सूरज कि पेहली किरन  
जिस्म तरशा हुआ दिल -कश ओ दिल -नशीन्                    
संदली संदली , मरमरी मरमरी                    
आफरीन्  आफरीन् , आफरीन्  आफरीन् 
 
         नंतर हळूहळू कळालं कि हि 'लिजा रे'. आणि त्या काळापासून तिची जी छबी मनावर कोरली 
गेली ती अजूनही तशीच आहे. बहुधा बरेचजण या मताशी सहमत असतीलच किंवा अजिबातच असणार 
नाही. तो मुद्दा निराळा. पण देहाचे इतके सुंदर वर्णन करणारे दुसरे एखादे गाणे निदान आता तरी मला 
आठवत नाही.
 
        अलीकडेच असंच कुठे तरी वाचनात आलं कि लिजा रे हि सध्या कधीही बऱ्या न होणाऱ्या एका 
दुर्धर अशा कॅन्सरशी झगडत आहे. वाचून फार मोठा धक्काच बसला. वास्तविक आपला आणि तिचा 
दूरदूर संबध नाही आणि कधी येण्याचाही प्रश्न नाही. तरीही धक्का बसलाच. पुढे त्या बातमीत अजूनही 
थोडंफार लिहिलेलं होत. तिचा आजार निदान झाल्यावरचा कठीण काळ , उपचार, त्याच्या वेदना, कुरूप 
झाल्याचे दुःख , पूर्णतः गळालेले केस..
तिचा असा चेहरा प्रयत्न करूनही समोर येईनाच. 
 
         खरंच कसं वाटलं असेल तिला? एकेकाळी इतके सुंदर जोपासलेले शरीर ,त्यासाठी घ्यावे 
लागलेले कष्ट , सुंदर राहण्यासाठी केलेला आटापिटा , सौंदर्याचे सगळीकडे होणारे कौतुक...हे सगळं 
तिला नक्कीच आठवलं असेल. आणि आता..क्षणाक्षणाला विद्रूप करत मारणारा आजार , अश्या वेळी 
दूर जाणारे - संबध टाळणारे लोक , ज्या दुनियेत अधिराज्य गाजवलं तिथे आता बंद झालेले दरवाजे. 
अवघड आहे. क्षणाक्षणाला आपणही मारत आहोतच पण सुख-दुःखाच्या , काम - क्रोधाच्या , राग - 
लोभाच्या द्वंद्वात आपण इतके खोलवर पूर्णपणे अडकलो असतो कि असा कुठलाही क्षण येईपर्यंत आपण 
सुद्धा मरणार हा विचारच कधी मनात येत नाही. आपणही मरणारच आहोत हे कळायला अश्या क्षणांची 
वाट का पहावी लागते? लिजा रे तरुणपणीच मरणार म्हणून मीही हळहळ व्यक्त करणार आणि तीही 
अशा थाटात कि जणू मी अमरच आहे.

        आपल्याला जर काही चांगली गोष्ट मिळाली तर आपण कधीच म्हणणार नाही कि फक्त मलाच 
का मिळाली. दोन वेळच्या अन्नासाठी लोक महाग असताना मला इतका भरपूर पैसा का दिलास ? 
बेरोजगार होऊनही लोक भटकत असताना मलाच नोकरी का दिलीस ? असं हे यश, सुख मिळालंच तर 
ते मीच मिळवलेलं आहे , माझ्या कष्टानेच मिळवलेलं आहे असा समज नकळतच होत जातो. आणि 
अशी काही अडचण समोर उभी राहिली कि मग मात्र आपण विचारतो...रडतो.. हा आजार मलाच का 
दिलास ? माझी काहीच चूक नसताना अपघात होऊन मीच अपंग का झालो ? साखळी सुरुच राहते.

        सहजच उत्सुकता म्हणून youtube वर लिजा रेच्या  कॅन्सर निदान झाल्यानंतरच्या क्लिप्स 
शोधल्या. पूर्ण टक्कल आणि आता थोडे थोडे उगवलेले केस अशा स्थितीतही ती फार सुंदर दिसत होती.
 तिच्या चेहऱ्यावर तेच हसणं दिसलं आणि वाटलं आपण उगीचच बाऊ करतो मृत्यूचा आणि त्याच्या 
परिणामांचा. शेवटी येणारा जाणारच आणि मागे काहीच उरणार नाही. मुळात हि योजनाच अशी आहे. 
त्यामुळे आपणही असंच चेहऱ्यावर स्मित ठेवून प्रवास करायला हवा. तुमच्या आमच्यासारखीच देहा 
मांसाची काही माणसे कर्मयोग, भक्तियोग , ज्ञानयोग अंगी भिनवत जगली..आणि त्यामुळेच येणाऱ्या 
सुखात आणि दुःखात तशीच समबुद्धी कायम ठेवू शकली. म्हणूनच या सर्वांना संत म्हणले जाते आणि 
त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवण्यासाठी आपल्याला पदोपदी प्रवृत्त केले जाते. 
 
         शेवटी आपले मार्ग जरी अनेक असले आणि आपल्या गाड्या जरी वेगवेगळ्या वेगात जात 
असल्या तरी आपल्या सर्वांचा प्रवास एकाच निश्चित ठिकाणी चालला आहे...एकाच निश्चित ठिकाणी 
संपणार आहे. कुणाचा आधी ..कुणाचा नंतर. याकडे दुर्लक्ष करून आहे तसच जगत जाणं फारच सोप्पं 
आहे ..पण मान्य करून जगण्याचा चांगला प्रयत्न करत जाणं फारच अवघड आहे. 
 
मग ??? प्रयत्न करून बघायचा ना !!!    

~योगेश

Friday, July 23, 2010

रंग

मावळतीचे आकाश केशरी , केशरमय झाले
आकाशाच्या रंगपटावर , सप्त धनुही  अवतरले

बर्फाच्छादित शिखरेही हा , रंग साठवीत होती
गिरीराजाच्या खांद्यावरती , निर्झर झुलवीत होती

नभातली हि मुक्त उधळण , धरणी पाहत होती
कोसळणाऱ्या निर्झरासही ती , कवेत घेत होती

मावळतीचा हा नूर पाहुनी , पाखरे परतत होती
घरट्यात जाउनी पिलांस , अपुल्या बिलगत होती

एक अनामिक सुगंध , वाऱ्यावर पसरत होता
शिणलेल्या झाडांच्याही , पापण्या मिटवित होता

दूर तेथुनी त्यावेळी मी , काचपेटीत बंद होतो
बंद असूनही त्या चित्रातला , मी ही एक रंग होतो

~योगेश

Monday, July 19, 2010

शिकवण

शिकवण
---------------------------------------

               सकाळीच ऑफिसला येण्यासाठी बस पकडली आणि योगायोगाने बसायला जागाही लगेच मिळाली. अवघा दहा पंधरा मिनिटांचाच प्रवास करायचा होता आणि डोक्यात कुठला विचारही चालू नव्हता. अशा वेळी नेहमी करतो त्याच प्रमाणे खिडकीतून बाहेर काय सुरु आहे हे बघायला सुरवात केली. पाउस अगदी खोबर किसाव तसा पडत होता. म्हणजे थेंब जमिनीवर येण्याआधीच वरच्यावर फुटून हवेतच विखुरला जात होता. त्याच वेळी रस्त्याच्या कडेला एक रिक्षा उभी केलेली दिसली. रिक्षावाला रिक्षाच्या मागे जावून हातातल्या फडक्याने रिक्षा पुसत होता. वास्तविक हे अगदी स्वाभाविक आणि रोज नजरेस पडणार चित्र असलं तरी जे काही मला दोन क्षणात दिसलं ते नक्कीच धक्कादायक होत..विचार करायला लावण्याजोग होत.

               त्या रिक्षावाल्याने एका काखेत कुबडीचा आधार घेतला होता आणि डाव्या पायाच्या पटचा लोंबणारा भाग गुडघ्याच्या वरपर्यंत दुमडून गाठ मारून ठेवलेला होता. एका पायाने पूर्ण अधू असूनही तो इतक्या गर्दीतून रिक्षा चालवतो हि नक्कीच कौतुकास्पद बाब आहे आणि आलेल्या व्यंगावर मात करून जगण्यासाठी जो संघर्ष चालू आहे त्यातून नक्कीच काहीतरी शिकण्यासारखं आहे असं मला वाटत राहिलं. आज आजूबाजूला निराश झालेले पुष्कळजण आपण पाहतो किंवा बहुतांशी आपणसुद्धा त्या निराशेचा कधी न कधी एक बळी ठरलेलो असतो. शिकूनही नोकरी न मिळाल्याने नैराश्यग्रस्त होऊन घरीच बसून राहणारे आपल्या आजूबाजूला अगदी सहज दिसतात. पण मिळेल त्या परिस्थितीत तोडगा काढून लढत लढत पुढे जाणारे फार कमी दिसतात.

               न जाणो कधी अशी वेळ अचानक आल्यावर माणूस नक्कीच खचत असेल. निराश होत असेल....अगदी जीव द्यावा असासुद्धा विचार मनात येत असेल.  याचवेळी आधार देणारा हात फार गरजेचा असतो. याच मानसिक आधारावर हळू हळू जिद्द जोम धरू लागते ...वाढते ...फुलते. मला तरी वाटत अशा कठीण परीक्षेच्या वेळी देव नक्कीच कुठल्या ना कुठल्या रुपात आधार आपल्या पुढे उभा करत असतो..पण बऱ्याच वेळा हा हातच ओळखता येत नाही. डोळ्यांवर ओढलेल्या दुखाच्या कातड्यामुळे हे हात झिडकारले जातात आणि मग आपणच आपले दुख अजूनच गहिरे करीत जातो.  

               शाळेत असताना एक धडा होता त्याची जाणीव मात्र मला प्रकर्षाने झाली. बाळू नावाचा एक विद्यार्थी अशाच कुठल्यातरी प्रसंगात आपले दोन्ही हात गमावतो पण नंतर मात्र निराश न होता पायाच्या बोटांच्या कुंचल्यात ब्रश पकडून चित्र काढायला शिकतो. ओबढधोबढ रेषांना हळू हळू आकार येऊ लागतो आणि जिद्दीच्या जोरावर तो एक चित्रकार बनतो. हि कथा असो किंवा अगदी एक पाय नसूनही निष्णात नृत्य करणारी सुधा चंद्रन असो ...  आलेल्या दुखावरही जिद्दीने मात करून पुढे लढत जाण्याची श्रीभगवत गीतेतली शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणलेल्या या उदाहरणातून हेच तर आपल्याला शिकण्यासारखे आहे.

               जगण्याचा नवनवा अर्थ कळण्यासाठी ती वेळ दरवेळी प्रत्यक्ष यावी लागतेच असे नाही तर ती आजूबाजूला घडणाऱ्या छोट्याछोट्या गोष्टींतूनही समजून घ्यावी लागते हे मात्र अगदी खरे. 

~योगेश

Thursday, July 8, 2010

दूरदेशी

दूरदेशी
------------------------

पाउस भुलवून नेई , मनास दूरदेशी
भिजुनी वाहवत जाई , तयात ते जळाशी

अभिलाषा या माझ्या , कधी साचलेल्या
शंख शिंपले मोती , पत्थरही वेचलेल्या
भिजुनी वाहवत जाती , भिडलेल्या ज्या आकाशी
पाउस भुलवून नेई , तयांस दूरदेशी ....मनास दूरदेशी

नजरा या माझ्या , कधी बोलणाऱ्या
शुभ्र रंगीत कोडी , नितळही वाचणाऱ्या
भिजुनी वाहवत जाती , थांबलेल्या ज्या फुलांशी
पाउस भुलवून नेई , तयांस दूरदेशी ....मनास दूरदेशी

~वियोग

Friday, June 25, 2010

उगम

उगम
---------------------

शोधसी दिशा दाही , मानवा....फिरूनही ज्या तू पाही
कळला का तुज उगम दिशांचा , कि कुठेच दिसला नाही

शोधसी काळही तिन्ही , मानवा....जगुनही जे तू पाही
कळला का तुज उगम काळांचा , कि कुठेच दिसला नाही

शोधसी देवही ऐसा , मानवा...धर्मातही जो तू पाही
कळला का तुज उगम ईशाचा , कि कुठेच दिसला नाही

नकोच शोधू दूर कुठेही , मानवा... हे विश्वही पुरेच नाही
दिशा असो वा काळ असो हा , आपणातुनी देवही दूर नाही

~योगेश

Thursday, June 24, 2010

चेहरा

चेहरा
_________


रंग कुणाचा तुला न कळला, सांगतो तुझा चेहरा
संग कुणाचा तुला न रुचला, सांगतो तुझा चेहरा


गर्द निळाई, घन वनराई,
मनभर दाटे जी मनराई
अवखळ पाणी, खळखळ करुनी ,
मनभर वाहे जी तरुणाई
संग तयांचा तुला लाभला, सांगतो तुझा चेहरा


गुलाब ताजे, हवेसे ओझे ,
गुलाबी गालांवरती साजे
बोचरे काटे, तयांचे नाते,
नकळत मनास हळव्या बोचे
संग तयांचा तुला न रुचला, सांगतो तुझा चेहरा



~योगेश

Thursday, June 17, 2010

तोडगा

तोडगा

------------------------
            फार फार वर्षांपुर्वीपासुन असली तरी अगदी अलीकडची म्हणण्यासारखी सुद्धा गोष्ट आहे. आटपाट नावाच्या नगरीत घराणेशाहीशी निगडीत लोकशाही बेमालुम मिसळुन गुण्यागोविंदाने नांदत होती. राज्यात बऱ्यापैकी रस्ते बनवले होते. रस्त्याच्या दुतर्फा वड-पिंपळाची पुरातन कालापासुन आलेली झाडे जोपासण्यात आली होती. पर्यावरण मंत्र्याना अगदी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यासाठीही जागा उप्लब्ध नव्हती. त्यामुळे पर्यावरण मंत्र्याना आपले पद नष्ट होते की काय अशी भीती वाटु लागली होती. लवकरच याचा सोक्षमोक्ष तो काय लावावा म्हणुन त्यांनी आपल्या बंगल्यात पार्टी आयोजीत केली आणि त्यात त्यांच्या परम मित्रांना आंमत्रीत केले. उद्योग मंत्री , कामगार मंत्री आणि दळणवळण मंत्री यांच्यासकट त्यांची पार्टी सुरु झाली आणि थोड्या वेळातच त्यांनी मुद्द्याला हात घातला.

प.मं :- सध्या फारच गोची झाली आहे. हे पद लवकरच नष्ट होणार आहे अशी भीती निर्माण झाली आहे. तसा पद असुनही फार काही उपयोग नाहीच आहे म्हणा. चरायला मोकळे कुरण देखील उप्लब्ध नाही. उगीच झाडांची गणती करणे, फांद्या छाटणे अश्या किरकोळ कामातुन छाटछुट भागवावी लागते.

उ.मं :- अहो काय सांगायचं?? स्वतःचं दुःख तेवढं तुम्हाला मोठं दिसतं. इकडे आमची सुद्धा काही वेगळी गत नाही. उद्योग बंद व्हायच्या मार्गावर आलेत. बाहेरच्या उद्योगांच्या स्पर्धेत आपण फार मागे पडलो आहोत आणि आपल्याच मालाला बाजारपेठ मिळेनाशी झाली आहे. सगळ्या मालकांनी उद्योग बंद करायचे ठरवले आहे.

का.मं :- बरोबर आहे. कामगार सुद्धा कामाच्या बाबतीत गार पडत चालले आहेत. नुसता पगार वाढवुन हवा. सगळ्यांनी मिळुन युनियन बनवली आहे. पार झीट आणली आहे बोंबाबोंब करुन.

द.मं :- आमचं दुःखही थोडंफार हेच आहे. जुन्या काळी बनवलेले डांबरी रस्ते आजही चांगले ठणठणीत आहेत. नविन काही काम नाही. उगीच आपले कुठे पाईपलाईन करण्यासाठी कुठे रस्ता उकर, परत बुजव अशी फुटकळ कामं करण्यात मलई शोधावी लागते आहे.

                     असा सगळ्यांनी एकमेकांसमोर दुःखाचा पाढा वाचल्यानंतर त्यांच्यात बरीच चर्चा झाली. पेगवर पेग रिचवले गेले. पार्टी संपली पण थोड्याच दिवसात कामगारांच्या एक नाही तर चार पाच युनियन्स सुरु झाल्या . त्यांचे आपापसातच झगडे सुरु झाले. या झगड्यातच सध्याचे उद्योग बंद पडले आणी कामगार बेकार होऊन नगरीतले उद्योग धडाधड बंद पडले. घरी बसलेल्या कामगारंची उपासमार होऊ लागली.

                  काही दिवसांतच नविन दुचाकी गाडी बनवणारी कंपनी नगरीत सुरु होणार अशी घोषणा झाली. सगळ्यांना काम मिळेल अशी आश्वासने देण्यात आली. कंपनी सुरु झाली आणि कामगारांची नोकरी मिळवण्यासाठी रांग लागली. जागा कमी आणि लोकं फार अशी स्थिती झाली. शेवटी सगळ्या युनियन्स कडुन टेण्डर घेण्यात आले. जी युनियन कमी किंमतीत काम करुन देईल त्यांच्या कामगारांना काम. एका युनियनने टेंडर जिंकले आणि त्यांनी त्यांचे कामगार आत घुसवले. आता पगार वाटपाचा प्रश्नच नव्हता. कंपनी दर महिन्याला युनियनला ठराविक रक्कम देऊ लागली आणि युनियनच कामगारांना त्यातुन पगार वाटु लागली. हळुहळु युनियन हा शब्द नष्ट होऊन कॉन्ट्रॅक्टर हा नविन शब्द रुढ झाला. थोड्या कामगारांचा प्रश्न सुटला म्हणुन कामगार मंत्र्याचीही पाठ थोपटली गेली.पुर्विच्या काळी जिथे मोटर सायकली एक-दोनच दिसायच्या त्या आता दहा-पंधरा दिसु लागल्या. कामगारांवरचा खर्च कमी केल्यामुळे उत्पादन थोडे स्वस्त झाले होते.

                  हळुहळु एकाला दोन- दोनाला चार अश्या वेगवेगळ्या ब्रॅंडच्या दुचाकी बनवणाऱ्या कंपन्या सुरु झाल्या. नवनविन कॉन्ट्रॅक्टर उतरले. लोकांना काम मिळत गेले. स्पर्धा वाढली. दुचाकींच्या किंमती अजुनच कमी होऊ लागल्या. रस्त्यावर कुणीच चालेनासे झाले. हळुहळु चारचाकी बनवणाऱ्या कंपन्या उतरल्या. कामगार कमी पडु लागले म्हणुन दुसऱ्या नगरीतुन येऊन इथे राहु लागले. त्यांच्या राहण्याचा प्रश्न म्हणुन जंगले तुटु लागली. टेकड्या सपाट होऊ लागल्या. बकाल झोपडपट्ट्या वाढु लागल्या. सुलभ कर्ज उप्लब्ध होऊन स्वस्तात मोटर कार मिळु लागल्या. रस्ते कमी पडु लागले.

                   लवकरच सध्याचे रस्ते कमी पडतात म्हणुन नविन रस्ते बनवले गेले. सध्याचे रस्ते पुन्हा कॉंक्रीटचे बनवण्यात आले. रस्ता रुंदीकरणात बरीच झाडे कापली जाऊ लागली. रस्तेही असे की चार महीन्यात चार वेळा दुरुस्त करावे लागत. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे गाड्या लवकर खराब होऊन लोक पुन्हा नविन गाड्या घेऊ लागले.

                      इकडे झाडे कमी होऊन उष्णता भयंकर वाढली म्हणुन पर्यावरण मंत्र्यानी वृक्ष लागवडीचे काम हाती घेतले. पेपरात फोटो येऊ लागले. पुढच्या वर्षी परत त्याच खड्ड्यांत वृक्षारोपण करण्यात येऊ लागले. नद्या स्वच्छ करण्यासाठी करोडोंचे प्रोजेक्ट राबवण्यात येऊ लागले. सारे काही सुरळीत सुरु झाले. रोज या चारही मित्रांना भेटणे मुश्कील होऊन गेले. आता कधिकधीच पार्ट्या झडतात.

               आता इकडेच बघा ना. हा नगरीतला मुख्य चौक. चार दिशांना जाण्यासाठी इथुनच रस्ते फुटतात. आज यावर पोलिसांची वर्दळ दिसते आहे. सगळ्या दुचाकी आणि चारचाकी रस्त्याच्या एका कडेला अडवुन धरल्या आहेत.

हा बघा रस्ता क्रमांक एक वरुन पुर्वेकडे गाड्यांचा तांडा गेला. हा दळणवळण मंत्र्यांचा. तिकडे फार दुर नविन उड्डाणपुल बनवायचा आहे. त्याचा आज कोनशिला समारंभ.

हा बघा रस्ता क्रमांक दोन वरुन पश्चिमेकडे गाड्यांचा तांडा गेला. हा उद्योग मंत्र्यांचा. तिकडे फार दुर एक नविन कारखाना सुरु होणार आहे. त्याचे आज भुमीपुजन.

हा बघा रस्ता क्रमांक तीन वरुन उत्तरेकडे गाड्यांचा तांडा गेला. हा कामगार मंत्र्यांचा. तिकडे एक कारखान्यात चार पाच कॉन्ट्रॅक्टरच्या लेबर्समध्ये प्रोब्लेम झाला आहे. तो मिटवुन एक नविन कामगार वसाहत सुरु होणार आहे. त्याचे आज भुमीपुजन.

हा बघा रस्ता क्रमांक चार वरुन दक्षिणेकडे गाड्यांचा तांडा गेला. हा पर्यावरण मंत्र्यांचा. तिकडे फार दुर एक पर्यावरण पोषक गृहप्रकल्प सुरु होणार आहे..नेचर होम्स. त्याचे आज भुमीपुजन.
                      पोलिस आता रस्ता लगेच मोकळा करतील. चारही बाजुंनी गाड्या एकदम वेड्यावाकड्या पुढे येतील. प्रत्येकाचा अर्धा तास मोडल्यामुळे प्रत्येकाला लवकर पोहचायची घाई आहे. त्यामुळे पुन्हा वाहतुक कोंडी होणार आहे. आणि अजुन थोडावेळ तरी चित्रविचित्र हॉर्न्सच्या आवाजात मोठमोठ्या वाहनांनी सोडलेल्या काळ्या धुरात हे चित्र अदृश्य होणार आहे. प्रत्येकालाच याची सवय झाली आहे. पार्टीत काढलेला तोडगा भयंकर यशस्वी झाला आहे आणि त्या तोडग्यामुळेच या आटपाट नगरीत सारे काही सुरळीत चालु राहणार आहे.




-Yogesh Bhagwat
                      -***-

Friday, June 11, 2010

हुरहुर

         प्रेमभंग झालेली माणसे प्रेम सोडून या जगात जणू दुसरे काहीच अस्तित्वात नाही या भावनेने निदान काही दिवस तरी जगत असतात. लवकरच त्यांना त्यातला फोलपणा कळून येतो आणि ते परत भानावर येतात. परंतु 'ते' काही दिवस ते मनाने एकटेच दूरवर भटकत असतात. जुन्या आठवणींनी मध्येच त्यांच्या जखमा भळभळून येतात.

याच स्थितीचे वर्णन करणारी हि एक कविता .


हुरहुर
--------------

रानोमाळ दुर दुर
भटकतो वेडा पीर
काळजात सले त्याच्या
आठवांची हुर हुर

       ठेचाळुनी पाय कधी
       रक्ताळते भेग जुनी
       ओघळुनी थेंब थेंब
       वाहतो हा महापुर

सादळतो थेंब आणि
डागाळते वाट त्याची
पुसु पाही डाग तिथे
आसवांची भुर भुर

      प्रेम आणि प्रेमभंग
      सोडुनही आहे काही
      दिसे त्याला अजुनी ना
      डोळे जरी भिर भिर

रानोमाळ दुर दुर
भटकतो वेडा पीर
काळजात सले त्याच्या
आठवांची हुर हुर



~योगेश

Monday, June 7, 2010

कालातीत

कालातीत
--------- --------- --------- --------- ---------

              जसं खाण्यासाठी काहीही विशेष शिकवावं लागलं नाही तसं टि.व्ही पाहण्यासाठीही काही विशेष करावं लागलं नाही. अगदी लहानपणीच कमीत कमी दहा बारा जणांच्या घोळक्यात बसुन टि.व्ही. बघायला सुरुवात झाली. पुढे-मागे घरात ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट दाखल झाला. अगदी कुणालाही आवडता हिरो विचारला की फक्त अमिताभ बच्चनचं नाव घेतलं जायचं. अ‍ॅंग्री यंग मॅन व्यतिरीक्तही अजुन वेगळे बोटावर मोजण्याइतके हिरो लोकांच्या मनात होते. अगदी कुणाबरोबरही टेस्ट मॅच असली तरी सुनिल गावसकरच्या शतकाकडे डोळे लावुन बसणाऱ्यांची संख्याही तेवढीच होती. अगदी आम्हाला काहीही कळत नसताना टि.व्ही. समोर जाऊन वडीलांना गावसकरने किती रन केले हे विचारलं जायचं. गावसकर आणि कपिलदेव हे दोनच खेळाडु आम्हाला ओळखता यायचे. त्याचे कारणही तसेच होते. पामोलिव का जवाब नही..बुस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी ...किंवा दिनेश दिनेश दिनेश या सारख्या जाहीरातीतुन फक्त हे दोघेजणच दिसायचे. तीच गोष्ट अभिनेत्रींची. लक्स म्हंटलं की हेमा मालीनी किंवा श्रीदेवी हि ठरलेली होती.

               हळु हळु म्हणा किंवा लवकर म्हणा काळ बदलत गेला. ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट चा जाऊन कलरचा काळ आला. लक्स साबण लावता लावता श्रीदेवी पाठोपाठ माधुरी दिक्षीत टब मध्ये उतरली आणी तिच्यासारखीच निघुन गेली. अगदी जुही चावला , मनिषा कोईराला या सगळ्यांना दुर सारत ऐश्वर्या ही आली आणि आता ऐश्वर्या ची आंघोळ उरकायच्या आतच कटरीनाही पाण्यात उतरली. आवडता हिरो म्हणुन अमिताभ म्हणण्याचा जमाना गेला आणि खानांचा जमाना जाऊन आता शाहीद कपुर, ह्रितीक रोशन....आणि अजुनही बरेच काही पर्याय उप्लब्ध झाले. तेंडुलकरला देव मानत आमची पिढी वाढली इतकेच नाही तर त्याच्या बऱ्याचश्या खेळींची आठवण आजही ताजी आहे. मग ती शारजा मधील वादळी झंजावाती खेळी असो की अगदी अलिकडेच काढलेल्या २०० धावा असोत. तेंडुलकर पाठोपाठही नाही म्हणायला बरेच जण आले. अगदी कांबळी , जडेजा , द्रविड , गांगुली , युवराज , सेहवाग. काहीजण तर कधिच पडद्याआड गेले तर काही जण जाण्याच्या तयारीत आहेत. तेंडुलकर मात्र आजही त्याच किंवा त्याच्यापेक्षा जास्त उमेदीनेच रन्स बनवतो आहे..शतक ठोकतो आहे. विचार केला तर कळतं तोही माणुसच आहे..कधितरी त्यालाही बॅट खाली ठेवाविच लागेल.

             जर काळ त्याच्या गतीने चालतोच आहे... कालचं आज , आजचं उद्या, उद्याचं परवा जर काहीच राहत नाही तर कधि कधि वाटतं अशी कोणती गोष्ट आहे जी अजुनही टिकुन आहे. कुठली अशी गोष्ट आहे जी आजही तितकीच नवी वाटते. फार काही विचार करावा लागला नाही. माणसाची वृत्ती-प्रवृत्ती तर अजुनही तीच टिकुन आहे. काळ कितीही बदलला तरीही.. अगदी माणुस चंद्रावर पोहोचला तरीही. पण या व्यतिरीक्तही काही गोष्टी आहेत ज्या आजही तितक्याच ताज्या वाटतात.

               सुदैवाने आमच्या बालपणी आजी-आजोबांना देण्यासाठी बराच वेळ शिल्लक असायचा. व्हिडिओ गेम , केबल , किंवा ट्युशन्स यांच्या जाळ्यापासुन पिढी दुरच होती. तेव्हा पुस्तकांतुन भेटायच्या फार आधीच सर्व संत मंडळी आजोबांच्या गोष्टींमधुन भेटली होती. अगदी ज्ञानोबा, तुकोबा, मुक्ताई पासुन थेट चांगदेव, विसोबा खेचर यांच्यापर्यंत. मग ते अगदी संत गोरा कुंभाराच्या घरी कच्चे मडके -पक्के मडके तपासण्यापासुन असो किंवा संत एकनाथांच्या घरी पाणी भरणाऱ्या पांडुरंगाच्या कथेतुन असो. थोडेफार अभंग आणि रामदास स्वामींचे मनाचे श्लोकही त्यांनी आमच्याकडुन पाठ करवुन घेतले होते. पुढे पुढे फार सुंदररीत्या बनवलेल्या मराठीच्या पुस्तकातुन पद्य विभागात कायमच संताची अभंगवाणी थोडीफार वाचावयास मिळाली ..थोडीफार समजत गेली.

                आज मात्र कधी कधी जर त्या अभंगाच्या ओव्या आठवल्या तर वाढत्या अनुभवातुन अजुनच गहन अर्थ समोर येत जातो. ’नाही निर्मळ ते मन । काय करील साबण’ , ’देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या’ , ’जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले’ या म्हणण्यामागचा अर्थ थोडाफार अजुन उलगडत जातो. आणि मग यांना अभंग असे का म्हणतात हे अजुनच प्रकर्षाने जाणवायला लागतं. जे भंग होत नाही ते अभंग. या न भंगणाऱ्या ओळींंमधुन किती मोठे तत्वज्ञान या मंडळींनी आपल्यासमोर ठेवले आहे आणि ते सुद्धा आपल्या मराठी भाषेत. लोकांनी अतोनात त्रास देऊनही इतक्या सुलभतने संतानी हे तत्वज्ञान आपल्याला आपल्या भाषेत उपलब्ध करुन दिले आहे ही नक्किच आपली पुर्वपुण्याई असली पाहीजे. त्यामुळेच अगदी १२ व्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरीच काय तर हरीपाठ सुद्धा आजही बदलत्या काळात योग्य मार्ग दाखवण्याची शक्ती बाळगतो. म्हणुनच आजही जुन्या पिढीतुन आलेला दिंडीचा वारसा त्याच जोमाने सुरु आहे.


                काळ त्याच्या गतीने पुढे जातोच आहे...संदर्भ त्यांच्या गतीने बदलतच आहेत.. पण कालबाह्य न होता आजही या ओव्या..हे अभंग.. काळावर मात करुन कालातीत ठरले आहेत.


~योगेश भागवत.

Friday, May 21, 2010

गट्ट्या .......(The real story)

पार्श्वभुमी:


गट्ट्या नावाच्या एका मुलाला फार फार शिकुन वेगवेगळ्या डिग्र्या घेण्याचा भस्म्या रोग होतो.
दिसली डिग्री कि घे लगेच...दिसली डिग्री कि घे लगेच..
या सर्व प्रकारात..त्याला प्रत्येकवेळी शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रचंड टेन्शन येतं. कारण गट्ट्याला शिकवणे म्हणजे पुर्ण कॉलेजला शिकवण्याच्या तोडीचे असते.

शेवटी सगळे कंटाळुन शिक्षण मंत्र्यांकडे धाव घेतात.

पुढचे नाट्य यमक जुळवुन ...........

गट्ट्या
==============================

त्राही माम त्राही माम
म्हणुनी ऐकु आला कल्ला
कुलगुरु सगळे पळत होते
जणु झाला होता हल्ला

प्रिन्सिपल आणि शिक्षक
पळत होते सैरा वैरा
कपडे होते अस्ताव्यस्त
जीवाची झाली होती दैना

शिक्षण मंत्री डोक्याला
लावुन बसले होते अंगठा
प्रश्न पडला होता त्यांना
कसा सुटेल मोठा गुंता

पी.ए. ने त्यांच्या डोके चालवुन
वियोगला लावला लगेच फोन
"आम्हाला यातुन वाचव म्हणाला
फिटणार नाही तुमचे लोन

गट्ट्या नावाचा एक भस्म्या
घेत सुटलाय सगळ्या डिग्र्या
कसे झेलावे, त्याला शिकवावे
डोक्याच्या झाल्यात आमच्या ठिकऱ्या"

वियोग म्हणे "ऐका सल्ला,
दरवर्षी सुरु करा काम
घरपोच पाठवा दोन डिग्र्या
घेवु नका कसलेच दाम"

शिक्षण मंत्री झाले खुष
टळली डोक्यामागची पीडा
नविन नविन डिग्री पाठवु
कुलगुरुंनी घेतला लगेच विडा

जंगी झाली पार्टी मोठी
नारळ वाहीला गेला देवाला
विनामुल्य घरपोच डिग्री
टाकु लागला पेपरवाला

शिक्षक , मास्तर, गुरुजी सगळे
निवांत होऊन करु लागले कार्य
डिग्र्या सगळ्या ठेवण्यासाठी मात्र,
गट्ट्याला... घर घेणे झाले अपरीहार्य


~वियोग

Friday, May 14, 2010

बिच्चारी राखी (Public Demand)

बिच्चारी राखी

---------------------------

एकदा सहज लावला टी.व्ही.
चॅनेल लागला एक निनावी
नाचत होती राखी सावंत
एका गुंडास पडली पसंत
तो ही लगेच .. गेला तिजपाशी
आश्चर्य ती ही.. भ्यायली जराशी

राखी पळाली .. झाला आक्रांत
गुंडही बसला नाही निवांत
साथीदारांस दिधली हाळी
म्हणाला हिच अपुल्या भाळी
धावले सर्व उचलुनी त्याला.
हातात त्याच्या भरलेला प्याला

राखी पळाली इथुन तिथुन
एवढ्यात तेथे आला मिथुन
गुंडाने त्याच्यावर रोखली बंदुक
मिथुनने त्याच्यावर फेकले मंडुक
घाबरुन पडला गुंडाचा देह
तत्काळ सुटला राखीचा मोह

एवढ्यात तेथे आला रजनीकांत
नारी रक्षा हा त्याचाही प्रांत
रजनी ने लगेच गॉगल घातला
मिथुनने वेगळ्या पोजेस घेतल्या
लाथा बुक्क्या आणि मारुन पंचेस
गुंडांची दोघात झाली सँडविचेस

गुंडांचे मग संपले उपाय
पळाले सर्व लावुन पाय
राखीला वाटले हेच खरे हिरो
यांच्यापुढे तर सारेच झिरो
वाटले व्हावे यांचीच नायिका
नकोच ते स्वयंवर.. आणि तो मिका

हसले दोघे.. तिला म्हणाले, आहेस का तु वेडी
नायिका म्हणवुन आमची, काढु नकोस तु खोडी
नायिकांचे वय आमच्या , अठराच आहे रास्त
तुझे तर नक्किच, त्याहुनी केवढे जास्त
राखी उरली एकटी म्हणाली, नशिबच माझे फुटले
नाही तेल नाही तुप, येथे धुपाटने सुद्धा फुटले


~य़ोगेश

Monday, April 26, 2010

शेवटपर्यंत..

शेवटपर्यंत..

================


तु आणि मी..
खरं तर दोन बाजु
एकाच नाण्याच्या..
तरीही का दिसतो ??
भिन्न भिन्न ...

नाणं वर उडवल्यावर..
बदलत राहते बाजु
अधांतरीच
छापा येईल कि काटा
याची लागली असते बोली.
खरं तर छापा किंवा काटा
दोघांची शक्यता जरी समान...
तरी तितकीच अनाकलनीय..
शेवटपर्यंत.

आपण मात्र वाहत राहतो
एकमेकांचे ओझे
एकमेकांच्याच पाठीवर
शेवटपर्यंत..

कारण..
आपल्याला किंमत नाहीच.
एकमेकांशिवाय...
शेवटपर्यंत..
 
~योगेश

Thursday, April 15, 2010

एका अ‍ॅप्रेजल नंतर ...... एक सामान्य (रड)गाणे

एका अ‍ॅप्रेजल नंतर ...... एक सामान्य (रड)गाणे


स्थळ : आय. टी. ऑफीस . एका बाजुस मॅनेजरची केबिन आणि दुसऱ्या बाजुस कामगारांचे डेस्क. ( ए.सी. चालु असल्यामुळे थोडे ’काम’ करता करता जास्त ’गार’ पडलेले कामगार अपेक्षीत आहेत.
वेळ : सकाळ असो वा संध्याकाळ दिवसभर ऑफीसच्या लाईट्स चालू असल्यामुळे वाचकांच्या सोईनुसार.
दृश्य : मॅनेजरच्या केबिनमधुन एक तरुण थोडासा खट्टु होवुन बाहेर आला आहे.

------------------------------------------------

चरफडत निघुन ये
जळफळत बघुन घे
पगारवाढ ही अशी .. दिली तुजला

        इतुके केले काम जे
        कवडीसम मोल ते
        या दिनाचसाठी किती .. राती मोजल्या

हाजी हाजी करत जे
डोक्यात जरी दगड रे
पाय त्यांनीच हळु हळु .. पुढे रोवला

      ना कामना मनात उरे
      फिरुन फिरुन ये पिसे
      या परीस इथुन अता .. बुड उचला

लगोलग टाईप केला
भला बुरा माल दिला
बायोडाटा क्षणात साऱ्या ... मित्रांस धाडला

(आणि हे  रडगाणे सुरुच राहीले)



- योगेश